Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

लोकमानस

जातीय दलदल भारतीय राजकारणात जुनीच

 

‘दलितांचा दलदलित पराभव’ या लेखात (५ जुलै) श्रीनिवास हेमाडे म्हणतात की, भारतात मतदारसंघाची विभागणी वर्ण, जात, वर्ग वर्चस्ववादी असली तरच निवडणुकीत उमेदवार निश्चित यश मिळवू शकतो. लोकसभेतील रामदास आठवलेंचा पराभव व त्यामागची कारणे यांचे विश्लेषण करताना त्यांनी ‘दलित’ शब्दाची व्युत्पत्ती आणि अन्वयार्थ त्यांच्या मते लावला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो Broken Men हा शब्द वापरला त्याविषयी म्हणता येईल की, ‘महाभारताच्या युद्धामध्ये कौरवांकडून ‘यादव’ सैन्य लढत होते, श्रीकृष्ण पांडवांकडून होते. महाभारत युद्धाची परिणती सर्वाना माहीत आहे. त्या युद्धानंतर ‘यादवी माजली’ म्हणजे विफलतेमुळे यादव सैन्यांत आपसांत लढाया झाल्या आणि त्या टोळ्या भारतभर पांगल्या. वेगवेगळ्या ठिकाणच्या समाजात त्या सामावल्या गेल्या. महाराष्ट्रात आलेल्या टोळ्या कदाचित भिन्न भाषिक आणि परके, उपरे या नात्याने कदाचित ‘महार’ म्हणून येथील समाजात मिसळल्या गेल्या असाव्यात.’
भारतात पाच हजारांहून जास्त दलित जाती शोधल्या गेल्या आहेत. सर्वच भारतीयांना या सगळ्या दलित जाती ज्ञात असू शकत नाहीत आणि स्थलांतरांनंतर त्या समजूही शकत नाहीत. अशा तऱ्हेने त्या जाती समाजामध्ये खपून गेल्या. भारतीयांना आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील जनतेला ‘महार’ म्हणजेच केवळ ‘दलित’ असे अभिप्रेत आहेत, त्याची खालील कारणे आहेत.
(१) संबंध भारत देशात अस्पृश्यतेविरुद्ध रणशिंग फुंकून महारांनीच लढा दिला आणि तो डॉ. बाबासाहेबांच्या पुढाकारात. त्यामुळे संबंध देशात ‘महार’ म्हणजेच ‘दलित’ असे ठसले. वास्तविक देशात पाच हजार किंवा त्याहूनही जास्त दलित जाती असून किंवा त्याहूनही तथाकथित निम्न जाती आहेत.
(२) चर्मकार, ढोर, मेहतर प्रत्येकी १ टक्केवारी आणि महार १३ टक्केवारी त्यातही संख्याबळाने प्रामुख्याने समाजात महारच जास्त आहेत. चर्मकार, ढोर प्रामुख्याने शेतीला उपयोगी पडणाऱ्या वस्तू बनवायचे. शेतीव्यवसायात मराठय़ांना मोट, नाडय़ासाठी चर्मकारांची जरूर असायची, त्यामुळे जवळीक इतकी वाढली की ते स्वत:ला मराठा समजू लागले आणि महारांना ‘दलित’ संबोधू लागले. समाज प्रबोधनाची आणि अस्मितेचीही अशी गंमत आहे.
(३) पूर्वापार ‘महार’ ही लढवय्यी जमात. असा दुसरा दलित समाज न लगे. ‘पेशवाई’ आली तेव्हा सगळेच भट पूजा अर्चेसाठी बाहेर पडायचे.. दलितांची सावली आपल्यावर पडू नये म्हणून किंवा एका लढवय्या समाजाला वेळीच नेस्तनाबूत करण्यासाठी म्हणजे कोणी ‘शत्रू’ उरणार नाही आणि आपण अव्याहत राज्य करू शकू- या इच्छेपोटी महारांवर जाचक र्निबध घातले गेले, हा इतिहास सर्वच जाणतात. या अपमानाचे उट्टे महार सैनिकांनी १८१८ च्या युद्धात केवळ ५०० महारांनी पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडविला हेही इतिहास सांगतो.
पुण्यामध्ये ‘ब्राह्मणी राज्य’ असल्यामुळे ‘महारांची विटंबना’ केली गेली. इतरत्र ती नसावी. कारण की प्रत्येक मराठा सरदाराकडे महार पलटण असायची. लढाईचे तोंड फोडण्यासाठी फक्त महार पलटणच उपयोगी पडायची. उदगीरच्या मराठय़ांच्या निजामाविरुद्ध लढाईच्या वेळी मराठा सैनिकांनी महारांच्या राहुटय़ांकडून वारा येतो या सबबी पुढे करून पेशवे माधवरावांकडे तक्रार केली, त्या वेळी माधवरावांनी सांगितले की, हे लढाईचे मैदान आहे. इथे भेदभाव नाही. याचा अर्थ पेशव्यांकडेदेखील महार पलटणी होत्या. म्हणूनच पुण्यातील महारांवर अत्याचार हे स्थानिक ब्राह्मणांसाठी असावेत असे वाटते.
धनगर हे जातींच्या उतरंडीमध्ये मागासवर्गीयच परंतु मल्हारराव होळकर पेशव्यांच्या जेवणाच्या पंक्तींना शनिवारवाडय़ात असायचेच. म्हणजे ताकदीच्या जोरावर ते उच्च ठरले. चर्मकार, ढोर जाती आवश्यक सेवेच्या नावाखाली जवळ केलेल्या असल्याने स्वत:ला उतरंडीमध्ये स्वत:ला उच्च समजू लागल्या. त्या अहंकारात ‘महार’ हे वेस राखायचे, लढवय्ये होते आणि शेती करायचे, हे सामाजिक सत्य नाकारले जात राहिले.
श्रीनिवास हेमाडे यांचे, ‘वाकचौरे यांच्या विजयाला खतपाणी मिळाले ते नवबौद्धांनी सहज मिळविलेल्या जीवनव्यवस्थेने’ हे विधान मात्र आक्षेपार्ह वाटते. महान कष्टाने, प्रयासाने, संघर्षांने शिक्षण घेणाऱ्या या वर्गाबाबत असुयाच यातून दिसते. (नवबौद्धांसाठी आरक्षण कधीही पूर्णत: लागू केले गेले नाही- याचे सरकारी रिपोर्ट आहेत, तरी प्रत्येक बाबतीत सरळसरळ ब्राह्मणांबरोबर सामना करणारा वर्ग हाच होता.)
‘गर्वसे कहो हम हिंदू है’च्या धर्तीवर त्यांनी निवडणुकांच्या वेळी प्रदर्शन केले नसेल. शिक्षण, नोकरी, हुद्दा यामुळे महारांच्या राहणीमानात जर चांगले परिवर्तन आले असेल तर स्तुत्य आहे, त्याविषयी असुया का असावी? जोपर्यंत या देशात सवर्ण समजल्या जाणाऱ्या जातींची मानसिकता बदलत नाही किंवा राजकीय पक्षाच्या वेठीला नसलेला दलित नेता निवडणुकीला उभा राहत नाही, तोपर्यंत राखीव मतदारसंघाचा काहीही उपयोग नाही.
जगन्नाथ अहिरे, मुलुंड, मुंबई

शासन अस्वस्थ की ‘स्वस्थ?’
डॉक्टरांविषयीचा संदीप आचार्य यांचा लेख (१३ जुलै) चुकीच्या माहितीवर आधारित व पूर्वग्रहदूषित वाटला. डॉक्टरांवरील हल्ल्याला डॉक्टरांचा रुग्णांशी सुसंवाद नसणे हे कारण चुकीचे आहे. मला निवासी डॉक्टर म्हणून आलेले अनेक अनुभव सांगता येतील. एखादा रुग्ण हा अमूक साहेबांच्या ओळखीचा, त्याला लगेच उपचार पाहिजेत, तपासत असलेल्या रुग्णांना तसेच सोडून आधी या साहेबाच्या माणसाकडे धावा, असा प्रकार बऱ्याचदा करावा लागतो. काही दिवसांपूर्वी विटा येथील एका पत्रकाराने, ‘रांगेत या,’ असे सांगणाऱ्या डॉक्टरला अ‍ॅट्रॉसिटीखाली अटक केली, हे उदाहरण अशाच प्रकारातले. सरकारी व पालिका रुग्णालयात एकाच वेळी अनेक अत्यवस्थ रुग्ण येत असतात. तेव्हा ‘माझी गरज दुसऱ्यांपेक्षा जास्त महत्त्वाची’ असे म्हणून चालत नाही.
डिस्चार्ज लवकर मिळविण्यासाठी अशीच अरेरावी होते. पोस्ट मॉर्टेम करू नये म्हणून जमावाकडून डॉक्टरांना हत्याराचा धाक दाखवण्याच्या घटना घडलेल्या आहेत. मुळात मृतदेह शवविच्छेदनाला पाठविणे, अमूक औषध उपलब्ध नसल्याने बाहेरून आणणे वगैरेंसारखी उपचारापलीकडची कामे कुणी करायची, हेच अजून स्पष्ट नाही. जेव्हा एखादी महिला स्वत:हून आपल्या बाळाला अनोळखी महिलेच्या स्वाधीन करते आणि तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला निलंबित करा असे न्यायालय म्हणते कारण कुणाचे कर्तव्य काय आहे, याविषयी संभ्रम आहे.
काही रुग्ण स्थानिक पुढाऱ्यांना चुकीची माहिती पुरवितात. उदा. मी जर एखाद्याला सांगितले की तुम्ही ५० रु. भरून केस पेपर काढा तर लगेच ‘साहेबांना’ बातमी दिली जाते की, डॉक्टरांनी माझ्याकडे ५० रुपये मागितले. काही वेळा तर ग्रामीण रुग्णालयाप्रमाणे लाच देण्याचा प्रयत्न होतो व भांडणाला तोंड फुटते. एच.आय.व्ही. तपासणी करायला सांगितले तर रुग्ण वाद घालतात की आम्ही तुम्हाला ‘फालतू’ वाटलो का?
ठाण्यातील सिंघानिया हॉस्पिटल जाळले तेव्हा कोणता ‘सुसंवाद’ झाला नव्हता? लेखात म्हटल्याप्रमाणे मार्डने २००० सालापासून १२ वेळा संप केला. पण सरकारने त्यांच्या मागण्यांचे काय केले? आज निवासी डॉक्टर्स ज्या वसतिगृहांमध्ये राहतात त्यांची अवस्था गोठय़ापेक्षा वाईट आहे. मात्र आचार्य यांना सरकारला याबाबत प्रश्न विचारावासा वाटला नाही. उलट ‘वसतिगृहा’चा उल्लेख करताना त्यांनी ‘निवासस्थान’ असा शब्दप्रयोग केला आहे.
बातमीत पुढे प्रांतवादही आहे. आचार्य यांच्या म्हणण्यानुसार परप्रांतीय डॉक्टरांना इथल्या रुग्णालयांबद्दल आस्था नसते. हे साफ चुकीचे आहे. तीन वर्षे एकही सुट्टी न घेता हे विद्यार्थी अहोरात्र राबत असतात. ना जेवणाचा पत्ता ना आंघोळीला वेळ. सलग तीन तास झोप मिळणे दुर्मिळ असते. काही वेळा हॉस्पिटलचा ग्लोव्ह्जचा साठा संपतो तेव्हा हे लोक हाताला प्लॅस्टिकच्या पिशव्या बांधून आपले काम सुरू ठेवतात..
निवासी डॉक्टर एका भाजलेल्या महिलेला आंघोळ घालत असतो किंवा सडलेल्या जखमेतून किडे वेचत असतो तेव्हा तो त्याची जात, लिंग किंवा प्रांत याचा कधीही विचार करत नसतो. रुग्ण हा रुग्णच असतो मग तो के.ई.एम.चा असो वा लीलावतीचा.
राहिला प्रश्न अधिष्ठाता (Dean) काय म्हणतात याचा. ते बिचारे सरकारी नोकर. खुर्ची टिकविण्यासाठी सरकारची बाजू घेणे ही त्यांची लाचारी असते. पण एखाद्या समस्येच्या सर्व बाजू मांडण्याचे काम पत्रकारांनी करायला हवे.
डॉ. संदीप देसाई, ठाणे