Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

रंकाळय़ात उभारणार नयनरम्य उद्यान
कोल्हापूर, ४ ऑगस्ट/विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर शहराचे प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रंकाळा तलावाला जलपर्णी आणि गाळाने मुक्त केल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेने या तलावाचे रूप पालटण्याचा निर्णय घेतला आहे. रंकाळ्याच्या पर्यावरणाला कोणताही धक्का न लावता तलावाच्या सभोवताली एक नयनरम्य असे उद्यान विकसित करण्यात येणार असून, यासाठी सुमारे ३२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती महापौर उदय साळोखे व महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादीत कोंडीनंतर अण्णा डांगे सक्रिय राजकारणातून दूर
सांगली, ४ ऑगस्ट/ गणेश जोशी

आधीपासूनच राजकारणात निष्क्रिय असलेले ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यापुढे सक्रिय न राहण्याचा निर्णय घेऊन कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकले आहे. गृहमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असणाऱ्या इस्लामपूरच्या नगराध्यक्षपदी अ‍ॅड. चिमण डांगे यांची नुकतीच वर्णी लागली असल्याने अण्णासाहेब डांगे हे अन्य पक्षात प्रवेश करणार नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

लाखोंचा गंडा घालणारा विमा अधिकारी गजाआड
कोल्हापूर, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी
एच.डी.एफ.सी.च्या जीवन विमा विभागाच्या खातेदारांची लाखो रुपयांची रक्कम परस्पर हडप करून फरारी झालेल्या आनंदा ऊर्फ रघुनाथ श्रीपती तापेकर याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज सायंकाळी कळंबा रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात पकडले. त्याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गेल्या महिन्यात तसेच गेल्यावर्षी फसवणुकीचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

‘अतिरेक्यां’नी धरलीकोल्हापूरची शाळा ओलीस!
कोल्हापूर, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी

मुंबईत झालेल्या ‘२६/११’ची पुनरावृत्ती कोल्हापूरसारख्या शहरातही होऊ शकते. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ओलीस ठेवून अतिरेकी आपले इप्सित साध्य करू शकतात ही शक्यता गृहीत धरून कोल्हापूर पोलिसांनी आज अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीला आम्ही किती समर्थपणे तोंड देऊ शकतो याची रंगीत तालीमच करवीरवासीयांना करून दाखवली. सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा घेऊन अशा प्रकारची केलेली रंगीत तालीम परिसरात घबराट पसरवून गेली, तर शहरात अफवांना जन्म देऊन गेली.

सोलापूर जिल्ह्य़ात खरीप पिके धोक्यात
सोलापूर, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्य़ाला यंदा पावसाने दगा दिल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर होत असून येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास आहेत ती खरिपाची पिके वाया जाण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्य़ात सध्या ३५ गावे आणि १३९ वाडय़ा-वस्त्यांना ४८ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. उजनी धरणातही जेमतेम ४० टक्के एवढाच पाणीसाठा झाला आहे.

जकातविरोधात आजपासून व्यापाऱ्यांचे राज्यभर आंदोलन
कोल्हापूर, ४ ऑगस्ट / विशेष प्रतिनिधी
राज्यातील जकातीविरुद्ध र्सवकष लढा म्हणून उद्या दिनांक ५ ऑगस्टपासून व्यापारी व वाहतूकदारांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाला प्रश्नरंभ करण्यात येणार आहे. या आंदोलनांतर्गत उद्यापासून राज्यातील ड वर्ग महापालिका क्षेत्रातील व्यापारी व वाहतूकदार काळ्या फिती लावून आंदोलनाला प्रश्नरंभ करणार असून टप्प्याटप्प्याने व्याप्ती वाढविण्यात येणाऱ्या या आंदोलनामध्ये राज्यकर्त्यांनी योग्य निर्णय घेतला नाही तर १९ ऑगस्ट रोजी व्यापारी व वाहतूकदारांचे प्रतिनिधी मुंबईत मंत्रालयासमोर आत्मदहनाने या आंदोलनाचा शेवट करतील असा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूर पालिकेत दुसरे उपायुक्त दिवटे
कोल्हापूर, ४ ऑगस्ट/विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर महानगरपालिकेचे दुसरे उपायुक्त म्हणून ओमप्रकाश दिवटे यांनी मंगळवारी सूत्रे स्वीकारली. दिवटे हे यापूर्वी मीरा भाईंदर महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी यापूर्वी वेंगुर्ला, दापोली, दौंड, चंद्रपूर येथे नगरपालिका मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
कोल्हापूर शहराचा विस्तार आणि नव्याने हाती घेण्यात आलेली विकासकामे या पाश्र्वभूमीवर महानगरपालिकेत उपायुक्तपदाची आणखी एक जागा वाढविण्याचा आणि सहायक आयुक्तपदासाठी दोन अधिकारी प्रतिनियुक्तीवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार पालिकेचे प्रशासन चालविण्यासाठी आता आयुक्त विजय सिंघल आणि उपायुक्त गणेश देशमुख यांच्या सोबतीला ओमप्रकाश दिवटे दाखल झाले आहेत.

कोकण गौरव पुरस्कार मुगुटराव कदम यांना
फलटण, ४ ऑगस्ट/वार्ताहर

येथील इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक व वृत्तपत्रलेखक मुगुटराव कदम यांना कोकण गौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील सिद्धिविनायक ट्रस्टमार्फत हा पुरस्कार दिला जातो. या वेळी चिपळूणचे आ. रमेशराव कदम, सुनील फडतरे, डॉ. महेश विहुळे, चिपळूण पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

कराड वकील संघटनेच्या अध्यक्षपदी काकासाहेब जाधव
कराड, ४ ऑगस्ट / वार्ताहर

कराड वकील संघटनेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत अ‍ॅड. काकासाहेब जाधव विजयी झाले. उपाध्यक्षपदी अ‍ॅड. भीमराव शिंदे व सचिवपदी अ‍ॅड. अमीर खान यांची बिनविरोध निवड झाली आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मावळत्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला.

शिष्यवृत्ती परीक्षेत फलटण विभागात प्रज्ञा पवार प्रथम
फलटण, ४ ऑगस्ट/वार्ताहर

महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या प्रश्नथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत मालोजीराजे प्रश्नथमिक विद्यालयातील विद्यार्थिनी प्रज्ञा अनिल पवार ही ३०० पैकी २७६ गुण मिळवून फलटण विभागात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
पवार हिला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मुख्याध्यापिका जयश्री देशपांडे, वर्गशिक्षिका सुमन खोले यांनी मार्गदर्शन केले.

सोलापुरात ‘इस्कॉन’तर्फे नव्या मंदिराचे उद्घाटन
सोलापूर, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या (इस्कॉन) सोलापूर शाखेच्या वतीने दि. ७ ते १५ ऑगस्टपर्यंत ९ दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अक्कलकोट रस्त्यावरील संस्थेच्या नूतन मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. दि. ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान दररोज सकाळी ७.३० ते ९ आणि सायंकाळी ६ ते ८.३० पर्यंत इस्कॉनचे आचार्य लोकनाथ स्वामी यांचा श्रीमद् भागवत कथा सप्ताह संपन्न होणार आहे. दि. १४ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त पहाटे ४.३० पासून रात्री १२ वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी नव्या मंदिराचे उद््घाटन होणार आहे. याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष इष्टदेवदास यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. शांतियज्ञ, १०८ कलशांद्वारे महाभिषेक, भजन, कीर्तन, कथा-प्रवचन आदी कार्यक्रम होणार आहेत. उज्जनहून आणलेल्या नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

‘‘यूपीएससी’सारख्या परीक्षेत उतरून करीअर घडवावे’
माळशिरस, ४ ऑगस्ट/वार्ताहर

समाजातील हुशार विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगासारख्या आव्हानात्मक परीक्षेत उतरून स्वत:चे करीअर घडवावे, असे मत मराठा सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उत्तमराव माने शेंडगे यांनी व्यक्त केले. अकलूजलगतच्या आनंदमूर्ती मंगल कार्यालयात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड माळशिरस तालुका शाखेच्या वतीने समाजातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, तसे प्रश्नथमिक व पूर्व प्रश्नथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ८० टक्केपेक्षा जादा गुण मिळवणाऱ्या १० विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जीपखाली सापडून बालक जागीच ठार
सांगली, ४ ऑगस्ट/ प्रतिनिधी

महिंद्रा जीपखाली चिरडून दोनवर्षीय बालक ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी नऊ वाजता सांगलीवाडी येथे घडली. श्रीवर्धन अविनाश शिसाळे असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. सांगलीवाडी येथील त्रिशूल चौकाजवळ प्रदीप वसंत पाटील हे आपल्या घरातील पार्किंगमधून महिंद्रा जीप मागे घेत असताना श्रीवर्धन हा अचानक खेळत खेळत आल्याचे त्यांना दिसले नाही. जीप मागे घेत असताना हे बालक जीपच्या चाकाखाली सापडून ठार झाले. या घटनेने श्रीवर्धनचे वडील अविनाश शिसाळे यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्रीवर्धन हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता.

डॉ. वसंत काळे यांचे सोलापुरात निधन
सोलापूर, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

सोलापुरातील ज्येष्ठ त्वचारोग तज्ज्ञ डॉ. वसंत मारुती काळे (वय ७०) यांचे दीर्घ आजारानंतर मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. काळे हे त्वचारोग तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकात प्रसिद्ध होते. वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी भरीव कार्य केले होते. २५ वर्षापूर्वी येथील वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलमधील मतभेदानंतर अनेक नामवंत डॉक्टर मंडळींनी बाहेर पडून अश्विनी सहकारी रुग्णालयाची उभारणी केली होती. त्यात डॉ. वसंत काळे यांचा महत्त्वाचा पुढाकार होता. एवढेच नव्हेतर अश्विनी रुग्णालय नावारूपास आणण्यासाठी त्यांनी बरेच कष्ट घेतले होते. त्यांच्या निधनामुळे केवळ सोलापूरच्या नव्हेतर महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.