Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९


स्वपक्षीयांनीच जाळले ‘अर्थसंकल्पीय पुस्तक’
औरंगाबाद, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी

स्थायी समितीचे सभापती अब्दुल साजेद यांनी अंदाजपत्रक तयार करताना पक्षपातीपणा केला आणि मुद्दाम माझ्या प्रभागात एक दमडीच्याही कामाचा समावेश केला नाही, असा आरोप करत विरोधी पक्षनेते संजय जगताप, नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनी भर सभागृहात अंदाजपत्रकाची प्रत जाळली. त्यांच्यापाठोपाठ नासेर नाहदी चाऊस यांनीही त्यांचेच अनुकरण केले.

धार्मिक कार्यक्रमात गोंधळ; पोलिसांवर कारवाईची मागणी
परभणी, ४ ऑगस्ट/वार्ताहर
शहरातील मध्यवस्तीत असलेल्या देशमुख गल्ली येथे धार्मिक कार्यक्रम चालू असताना दोन युवकांनी येऊन गोंधळ घातल्याने बराच तणाव निर्माण झाला. धार्मिक कार्यक्रमाच्या पंगती चालू असताना दुचाकीवर आलेल्या या दोन युवकांनी पुन्हा आपल्यासोबत चार पोलिसांना घेऊन घटनास्थळी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यात युवकांकडील दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.शहरातील महत्त्वपूर्ण आणि जागृत देवस्थान मानल्या जाणाऱ्या देशमुख गल्लीतील मोठय़ा मारुतीजवळ धार्मिक कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून चालू आहे.

राम प्रधान समितीचा अहवाल दडवून ठेवला
-उद्धव ठाकरे

औरंगाबाद, ४ ऑगस्ट/खास प्रतिनिधी
२६/११ मुंबई हल्ल्याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या राम प्रधान समितीचा अहवाल राज्यातील आघाडी सरकारने आपल्या चुका लपविण्यासाठी दडवून ठेवला आहे, असा आरोप शिवसेनेचे कार्यकारीप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैजापूरमध्ये शिवसंवाद दौऱ्यात केला. वैजापूरच्या पंचायत कार्यालयासमोर सोमवारी दुपारी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार टीका केली. या आघाडी सरकारचा बेबंदशाहीचा कारभार चालू आहे. मताच्या लाचारीसाठी ही मंडळी वाटेल ते करायला तयार आहे. मराठवाडय़ात सर्वत्र दुष्काळाचे सावट असताना मराठवाडय़ाचेच मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांना पॅकेजचे तुकडे फेकले. रोख स्वरूपात नुकसानभरपाई द्या, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.

गाळ चोरीप्रकरणी अकरा हजाराचा दंड वसूल
बीड, ४ ऑगस्ट/वार्ताहर
शेतीच्या नावाखाली वीटभट्टी व्यवसायासाठी तलावातील गाळ चोरीप्रकरणी चार वाहने जप्त करून त्यांच्याकडून अकरा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या प्रकाराने दिंद्रुड परिसरात मोठय़ा प्रमाणात गौण खनिजाची चोरी होत असल्याचेच पुन्हा एकदा उघड झाले आहे.

परभणी जिल्ह्य़ात दुष्काळ जाहीर करण्याची डाव्या लोकशाही आघाडीची मागणी
१४ ऑगस्टला जिल्हाभर चक्काजाम आंदोलन
परभणी, ३ ऑगस्ट/वार्ताहर
परभणी जिल्ह्य़ात सरासरीच्या निम्म्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे. पावसाअभावी दुबार पेरणीही वाया गेली आहे. सध्या जनावराचा चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्य़ात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी नव्याने स्थापन झालेल्या डावी लोकशाही आघाडीच्या नेत्याने संयुक्तपणे पत्रकार परिषदेत केली. या मागणीसाठी १४ ऑगस्टला जिल्हाभर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असे या वेळी जाहीर करण्यात आले.

भोकरदनमध्येही परिणाम
भोकरदन, ४ ऑगस्ट/वार्ताहर
सहावा वेतन आयोग इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे विनाअट लागू करावा या व इतर मागण्यांसाठी भोकरदन पालिकेचे कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत. दरम्यान, पालिकेत एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने या संघाचे आयोजन केले असून सहाव्या वेतन आयोगासोबतच राज्यातील नगरपालिकामधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन शासनाने द्यावे, आस्थापना खर्चाची अट शिथिल करावी, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १०० टक्के अनुदान शासनाने द्यावे यांसह एकूण २१ मागण्यांसाठी हे कर्मचारी संपावर गेले असून पालिकेत कुणीही कर्मचारी उपस्थित नसल्याने दैनंदिन कामासाठी गेलेल्या सामान्य नागरिकांचे हाल झाले.

विवाहिता बेपत्ता
बोरी, ४ ऑगस्ट/वार्ताहर
भांगापूर येथील प्रतिभा किसन बोडखे (वय २२) ही विवाहिता एक महिन्यापासून बेपत्ता झाली आहे. रमेश गणेशराव बोडखे याने या संदर्भात बोरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. प्रतिभा ७ जुलैला रात्री दहाच्या सुमारास कुणास काही न सांगता निघून गेली. तिच्या अंगावर सोन्याचे दागिने असून १८ हजार रुपये तिने नेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेस एक महिना लोटला मात्र तिचा तपास लागला नाही.

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांची आज निवड
परभणी, ४ ऑगस्ट/वार्ताहर
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड उद्या (दि. ५) होणार असून आमदार रामप्रसाद बोर्डिकर यांची अध्यक्षपदासाठी निवड होण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. यापूर्वी जिल्हा बँकेवर आमदार बोर्डिकर यांचे वर्चस्व होते. यावेळीही आमदार बोर्डिकर, आमदार सुरेश देशमुख यांच्या गटाला जास्त जागा मिळाल्या आहेत. बिनविरोध संचालकांच्या निवडीतही बोर्डिकर गटाने बाजी मारली होती. संचालकपदाच्या निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतरही बोर्डिकर गटाला निर्णायक बहुमत मिळाले. आमदार बोर्डिकरांच्या गटाचे १७ तर कृषी राज्यमंत्री सुरेश वरपूडकरांच्या गटाचे आठ संचालक आहेत

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा बीडमध्ये मोर्चा
बीड, ४ ऑगस्ट/वार्ताहर
शासन निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पूर्णवेतन द्यावे असे आदेश असतानाही कर्मचाऱ्यांना वेठबिगारासारखे वागवले जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या गलथान कारभाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी कॉ. नामदेव चव्हाण यांनी केली.
बीड जिल्ह्य़ातील ग्रामपंचायत कर्मचारी युनियन संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. कॉ. नामदेव चव्हाण, सुरेश निकाळजे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे शंभर टक्के वेतन द्यावे, नमुना नं. २४ अद्यावत असावे याबाबत स्पष्ट आदेश आहेत. मात्र जिल्हा परिषदेत शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. तर जिल्हाधिकारी या प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी बैठक घेण्याची सूचना देऊन बैठक घेत नाहीत. कर्मचाऱ्यांचे वेतन परस्पर उचलून अपहार केला जातो. म्हणून जि.प.च्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. तर पूर्वसूचना देऊनही मोर्चाला सामोरे जाण्यासाठी एकही जबाबदार अधिकारी उपस्थित राहिला नाही याचा निषेध करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराव घालण्याचा इशारा कॉ. चव्हाण यांनी दिला.

बचत गटाच्या महिलांचा मोर्चा
बिलोली, ४ ऑगस्ट/वार्ताहर
रॉकेल व स्वस्त धान्य दुकानाचे परवाने बचत गटांना देण्यात यावे, धान्य, तेलांचा पुरवठा वेळेवर व्हावा, आहार पुरविणाऱ्या बचत गटांना गॅस सिलेंडर देण्यात यावे, चार टक्के दराने कर्जपुरवठा व्हावा,आदी मागण्यांसाठी बचत गटाच्या महिलांनी तहसीलवर मोर्चा काढला.

दारुडय़ाकडून दोघेजण जखमी
गंगाखेड, ४ ऑगस्ट/वार्ताहर

येथील संत जनाबाईच्या दर्शनासाठी अहमदपूरहून येत असलेल्या दिंडीवर शहरातील बसस्थानकासमोर एका मद्यपीने अचानक बिअरची भरलेली बाटली फेकल्याने दोन भाविक जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजता घडली. अहमदपूर तालुक्यातील मुकुंदवाडी येथील भाविकांची दंडी सोमवारी गंगाखेड येथे संत जनाबाईंच्या दर्शनासाठी येत होती. दिंडीमध्ये सुमारे दोनशे भाविक सामील झाले होते. ही दिंडी गंगाखेड शहरातील बस स्थानकासमोरून रात्री आठच्या सुमारास जात असताना अचानक बस स्थानकासमोरील विजय बिअर बारच्या परिसरातून अचानक एक बाटली दिंडीवर येऊन पडली. यामध्ये दिंडीतील महादेव बालाजी घुले व भागवत फड (दोघेही रा. कावळवाडी, ता. अहमदपूर) हे दोन भाविक जखमी झाले, तर काही वेळासाठी िदडीतील भाविक सैरभैर झाले होते. ही बाब तात्काळ पोलिसांना कळताच ते घटनास्थळी रवाना झाले. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे

अनंतराव भोसले यांचे निधन
उस्मानाबाद, २ ऑगस्ट/वार्ताहर
हैदराबाद मुक्तिसंग्राम लढय़ातील स्वातंत्र्यसेनानी अनंतराव बळीराम भोसले यांचे निधन झाले. ते ८० वर्षाचे होत.हैदराबाद मुक्तिलढय़ात गौडगाव, ता. बार्शी येथील छावणीवर त्यांनी बहुमोल काम केले. मराठवाडय़ाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ते कार्यरत होते. गावसूद,येथे त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

स्वरमय गीतगुंजन कार्यक्रम आज
औरंगाबाद, ४ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

बाल निरीक्षणगृहातील अनाथ निराधार मुलांसाठी डॉ. तुकाराम वांढरे निर्मित स्वरमय गीतगुंजन या गीतांचा कार्यक्रम उद्या (बुधवारी) सकाळी १० वाजता होणार आहे. आशीष शहा याच्या वाढदिवसानिमित्त शहा परिवाराच्या वतीने या बाल निरीक्षणगृहातील ३०० मुलांना भोजन दिले जाणार आहे. या कार्यक्रमास डॉ. तुकाराम वांढरे, प्रश्न. ज्ञानेश्वर वांढरे, राहुल कवडे, भूमिका रोडे, प्रियंका फलके व श्रृती कुलकर्णी हे गायक गीत सादर करणार आहेत.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत मिलिंद देशमुख व अभिजीत फुले
औरंगाबाद, ४ ऑगस्ट/खास प्रतिनिधी
हैदराबाद येथे १० ते १६ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत येथील राष्ट्रीय पंच मिलिंद देशमुख आणि अभिजीत फुले यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सचिव दिनकर तेलंग यांनी त्या दोघांचेही अभिनंदन केले आहे.

विकास बडे रुजू
औरंगाबाद, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी
महापारेषणच्या औरंगाबाद परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी विकास बडे हे रुजू झाले आहेत. त्यांचे स्वागत राष्ट्रीय वीज ड्रायव्हर व क्लिनर संघातर्फे करण्यात आले.

कोद्रीच्या सरपंचपदी लटपटे यांची फेरनिवड
गंगाखेड, ४ ऑगस्ट/वार्ताहर

तालुक्यातील क्रमांक दोनची मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कोद्री ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गोविंद लटपटे यांचीच बिनविरोध फेरनिवड झाली आहे. राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या या आजच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. आज सोमवारी नूतन सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायतीचे विशेष सभा निवडणूक निर्णय अधिकारी माधव सलगर यांनी काम पाहिले. नऊ सदस्य संख्या असलेल्या या बैठकीस पाच सदस्य उपस्थित होते. सरपंचपदासाठी विद्यमान सरपंच गोविंद लटपटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध आल्याचे जाहीर करण्यात आले. याबाबतची अधिक पाश्र्वभूमी अशी की एक वर्षापूर्वी ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच गोविंद लटपटे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता.

पत्नीच्या खुनाबद्दल पतीस अटक
जिंतूर, ४ ऑगस्ट/वार्ताहर
चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा खून करणाऱ्या मच्छिंद्र सूर्यवंशी याला जिंतूर सहायक पोलीस निरीक्षक स्वामी यांनी अटक करून दौलताबाद पोलिसांच्या स्वाधीन केले.
जिंतूर तालुक्यातील मौजे गडदगव्हाण येथील मच्छिंद्र सूर्यवंशीने आपली पत्नी गंगा हिला आपण फिरायला जाऊ, असे सांगून ७ जुलैला जिंतूरहून दौलताबादला नेले आणि तेथे स्वत: दारू पिऊन तिलाही दारू पाजली आणि रस्त्यावरील एका पुलाखाली तिच्यासोबत शारीरिक संबंध करून तिच्या डोक्यात दगड मारून तिचा खून केला आणि तेथून गडदगव्हाण येथे परतला. याप्रकरणी मृत गंगाची बहीण सूर्यकांता भीमराव जमदाडे (रा. पिंपरीलिंग, ता. सेनगाव) हिने आपली बहीण गंगा बेपत्ता झाल्याची माहिती जिंतूर पोलिसांना दिली. गंगाचा पती मच्छिंद्रने तिला कुंटणखान्यात विकल्याचा संशय तिने व्यक्त केला. पोलिसांनी मच्छिंद्रला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने माहिती दिली.

पत्नीच्या छळाच्या आरोपावरुन गुन्हा दाखल
मानवत, ४ ऑगस्ट/वार्ताहर
तालुक्यातील सावरगाव येथील मदन अवचार याने एक लाख रुपयांसाठी पत्नीचा छळ केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. फिर्यादी शांताबाई अवचार यांचा विवाह १६ वर्षापूर्वी मदन अवचार यांच्यासोबत झाला. लग्नानंतर दोघेही मुंबईला गेले. काही दिवसानंतर आईकडून सुतारकामासाठी लागणाऱ्या अवजार खरेदीसाठी एक लाख रुपये घे म्हणून मारहाण व जिवे मारण्याची धमकी मदन शांताबाईला देऊ लागला. शांताबाईच्या तक्रारीवरून मानवत पोलीस ठाण्यात मदनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जनावरांच्या चाऱ्यासाठी आंदोलनाचा इशारा
गंगाखेड, ४ ऑगस्ट/वार्ताहर
तालुक्यावर दुष्काळाचे संकट उभे असताना जनावरांची अवस्थाही भयावह होणार आहे. परिणामी तहसील प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा. अन्यथा ही जनावरे १२ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर आणून बांधू, असे निवेदन आज बाजार समितीचे सभापती रविकांत चौधरी, जिल्हा परिषद सदस्य गोविंद राठोड, पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद सातपुते, पंचायत समिती सदस्य ब्रह्मदेव पवार, गुंजेगाव सोसायटीचे चेअरमन नारायण कदम यांच्यासह ३४ सरपंच, चेअरमन तसेच शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले.

मोरे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर
औसा, ४ ऑगस्ट/वार्ताहर

औसा बाजार समितीचे उपसभापती तानाजी मोरे यांच्याविरुद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव ११ विरुद्ध शून्य मतांनी विशेष सभेत मंजूर झाला. बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा या पक्षांची आघाडी करून निवडणूक लढविली होती आणि बाजार समितीत वर्चस्व मिळविले होते. पहिले अडीच वर्षे उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसला आणि यानंतर युतीला, असे सर्वानुमते ठरले होते. ठरल्याप्रमाणे अडीच वर्षे निघून गेली तरी उपसभापती तानाजी मोरे यांनी पद सोडले नाही. यामुळे सभापती चंद्रकांत कापसे यांच्यासह ११ संचालकांनी मोरे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव २७ जुलैला दाखल केला होता.पिठासीन अधिकारी स्मृती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल ३ वा. विशेष सभा झाली. या वेळी १२ संचालक उपस्थित होते. यापैकी ११ जणांनी मतदान केले. यानंतर ११ विरुद्ध शून्य मतांनी मोरे यांच्याविरुद्ध मंजूर करण्यात आला.

‘पालिका कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार’
लोहा, ४ ऑगस्ट/वार्ताहर
नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरूच राहील, असे संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष वैजनाथ स्वामी यांनी सांगितले. सहावा वेतन आयोगसाठी पालिका कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही संप सुरू होता. या संपास आज उपनगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, रिपाइंचे मराठवाडा संघटक बबन निर्मले, नगरसेवक नामदेव फुलपगार, छत्रपती धुतमल आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला. या संपामुळे शहरातील घाणीचे साम्राज्य वाढले आहे. राज्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी (दि.६) सह्य़ाद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत पालिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे, अशी माहिती वैजनाथ स्वामी यांनी दिली.

मोईज शेख यांना क्रीडा पुरस्कार प्रदान
लातूर, ४ ऑगस्ट/वार्ताहर
माजी उपनगराध्यक्ष मोईज शेख यांना २००६-०७चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार राज्यपाल एस. सी. जमीर यांच्या हस्ते करण्यात देण्यात आला. क्रीडा व युवक संचालनालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या २००६-०७ वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्राच्या सभागृहात झाले. या कार्यक्रमात राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री दिलीपराव देशमुख, राज्यपाल एस. सी. जमीर, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण सचिव संजय कुमार, संचालक वसंत वैद्य आदी उपस्थित होते.

मुंडे यांचा शुक्रवारी परळीत सत्कार
परळी, ४ ऑगस्ट/वार्ताहर

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गोपीनाथराव मुंडे यांची लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक विक्रमी मतांनी निवड झाल्याबद्दल जवाहर शिक्षण संस्थेच्या व वैद्यनाथ महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी (दि.७) त्यांचा जाहीर सत्कार होणार आहे. संस्थेचे उपाध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांची परळीच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व तसेच ज्येष्ठ संचालक अशोकसेठ सामंत यांच्या एकसष्ठीनिमित्त त्यांच्याही सत्कार करण्यात येणार आहे. या सत्काराच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संस्थापक संचालक व माजी नगराध्यक्ष एन. के. देशमुख हे असतील. ज्येष्ठ संचालक राजेश्वरराव देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सत्काराच्या आयोजनासंदर्भात संस्थेचे पदाधिकारी, संचालक व महाविद्यालयातील प्रश्नध्यापकांची बैठक आज सकाळी सचिव दत्ताप्पा ईटके (गुरुजी) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात विविध समित्यांची स्थापना करण्यात आली.

कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण
परतूर, ४ ऑगस्ट/वार्ताहर

सहावा वेतन आयोग लागू करावा या व इतर मागण्यांसाठी नगरपालिकेचे कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही त्यांचा संप सुरूच होता. त्यामुळे पालिकेचे कामकाज थंडावले आहे. नागरिकांची कामे मोठय़ा प्रमाणावर खोळंबली आहेत. उपोषणास बसलेल्यांमध्ये कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश जोशी, हेमंत राखे, संतोष सोनवणे, मनोहर तुंगनवार, शिवदास चव्हाण आदींचा समावेश आहे.

जुन्या पिढीतील व्यापारी दमकोंडावार यांचे निधन
लोहा, ४ ऑगस्ट/वार्ताहर
जुन्या पिढीतील व्यापारी किशन व्यंकम दमकोंडावार यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. त्यांच्या मागे सहा मुली, दोन मुलगे, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे. वेळेवर धान्यपुरवठा करणारे, गरजवंतांना सहकार्य करणारे सावकार म्हणून त्यांची ओळख होती.

बिलोलीत धानोरकर यांचे प्रवचन
बिलोली, ४ ऑगस्ट/वार्ताहर
येथील विठ्ठल मंदिरात श्रावण मासानिमित्त हरिभाऊ महाराज धानोरकर यांचा हरिविजय कथेवर दररोज सायंकाळी प्रवचनाचा कार्यक्रम आयोजिला आहे. सकाळी ६ ते ७ काकडा आरती गायनाचार्य ताडलिंबेकर बंडू व राजाभाऊ ताडलिंबेकर, सायं. ६ ते ७ हरिपाठ, तद्नंतर ७.३० ते ९.३० हरिभाऊ महाराज यांचे प्रवचन होत आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन लक्ष्मीकांत आलूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

त्र्यंबक तेललवार यांचे निधन
लोहा, ४ ऑगस्ट/वार्ताहर
ज्येष्ठ व्यापारी त्र्यंबकराव गणपतराव तेललवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. शोकाकूल वातावरणात दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्र्यंबकराव तेललवार यांच्या मागे सहा मुलगे, तीन मुली, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे.

चारा महाग; जनावरे स्वस्त
तुळजापूर, ४ ऑगस्ट/वार्ताहर

पावसाने दडी मारल्याने चाऱ्याची तीव्र टंचाई व दरवाढीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे. दावणीच्या जनावरांना बाजार दाखविण्याच्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. तथापि जनावरास ग्राहक नसल्याने नाममात्र किमतीत जनावरे विकण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवला आहे. जनावरांसाठी राखलेल्या चाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी, चोऱ्या होण्याचे प्रकार वाढू लागल्याने शेतकऱ्यांना रानात तळ ठोकून बसण्याची वेळ आली आहे.

राजू शेट्टी यांची ‘नॅचरल शुगर’ला भेट
लातूर, ४ ऑगस्ट/वार्ताहर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी नुकतीच नॅचरल शुगर उद्योग समूहास भेट देऊन नॅचरल शुगरच्या विविध उपपदार्थ प्रकल्पाची पाहणी केली. आदर्श व्यावसायिक दृष्टिकोन ठेवल्यास जनता आणि व्यवसाय दोघांचाही फायदा होतो, हे नॅचरल शुगरमध्ये दिसून आले, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. यावेळी सदाभाऊ खोत, आमदार पाशा पटेल उपस्थित होते.

भरतीपूर्व प्रशिक्षण
बीड, ४ ऑगस्ट/वार्ताहर

राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या वतीने चालू वर्षी पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक संघटक सचिव कलंदर पठाण यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग मुंबई यांच्यामार्फत यावर्षी पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेअंतर्गत इच्छुक उमेदवारांना पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

शंभूमहादेव रस्त्याची दुर्दशा
परतूर, ४ ऑगस्ट/वार्ताहर

श्रीक्षेत्र शंभूमहादेवकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने भाविकांचे हाल होत आहेत. तालुक्यातील यदलापूर पाटीपासून उत्तरेस १५ किलोमीटर अंतरावर भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र शंभूमहादेव हे जागृत देवस्थान आहे. या देवस्थानी श्रावण महिन्यात दर सोमवारी मोठी यात्रा भरते. कढाळा ते शंभूमहादेव या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. खडी उखडली आहे.

शिवरायांच्या पुतळ्याला अभिषेक
लोहा, ४ ऑगस्ट/वार्ताहर
कलंबर सहकारी साखर कारखान्यात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांच्या नेतृत्वाखाली आज अभिषेक करण्यात आला.कारखाना बंद झाल्यानंतर कारखान्यातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची दुरावस्था झाली होती. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवा नरंगले यांच्या नेतृत्वाखाली राजेश अन्नदाते, गजानन सूर्यवंशी, भगवान राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

नवीन मतदार अर्जाबद्दल आक्षेप
जालना, ४ ऑगस्ट/वार्ताहर

जालना विधानसभा मतदारसंघात नव्याने नावनोंदणी करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या २७ हजार अर्जाविषयी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटय़ाल यांनी संशय व्यक्त केला आहे. नव्याने नोंदणीसाठी दाखल झालेल्या सर्व अर्जाची छाननी काटेकोरपणे करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे अन्य संबंधित अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

अखंड हरिनाम सप्ताह
गंगाखेड, ४ ऑगस्ट/वार्ताहर

वैराग्यमूर्ती सोपानकाका महाराज इसादपूर यांच्या गोडजेवण व समाधी स्थापन सोहळ्यानिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक माणिकराव केंद्रे व माजी नगराध्यक्ष डॉ. मधुसुदन केंद्रे यांनी दिली आहे.सोपानकाकांचे निर्वाण २५ जुलैला झाल्यानंतर सतत तेरा दिवस हरिनाम सप्ताह करण्याचा संकल्प त्यांच्या राज्यभरातील शिष्यांनी केला होता. त्याचाच भाग म्हणून समाधी स्थापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

वसतिगृहांच्या निरीक्षकपदी डॉ. कासराळीकर
बिलोली, ४ ऑगस्ट/वार्ताहर

सरकार व स्वयंसेवी संस्थांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या मुला-मुलींकरिता वसतिगृहांच्या तालुका निरीक्षकपदी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते डॉ. खाकय्या अप्पा कासराळीकर यांची नियुक्ती सरकाराने केली आहे. या समितीत शिवाजी पाटील यांचीही अशासकीय सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.

साठे यांच्या जयंतीदिनी साडय़ांचे वाटप
परळी वैजनाथ, ४ ऑगस्ट/वार्ताहर

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भाजयुमो प्रदेशाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय मुंडेहस्ते मोंढा भागात १०१ गरीब वृद्ध महिलांना साडी-चोळीचे वाटप करण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

‘पेनूर पुनर्वसनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करणार’
लोहा, ४ ऑगस्ट/वार्ताहर
गोदावरी काठालगतच्या पूर प्रवण क्षेत्रातील पेनूर या गावाच्या पुनर्वसनासाठीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आहे. अंतेश्वर येथील भूसंपादन संमतीपत्र घेऊन या गावचा व जागा निश्चिती झाल्यानंतर मारसावडा येथील पुनर्वसन प्रस्ताव सादर केला जाईल असे तहसीलदार संतोष गोरड यांनी सांगितले. गोदाकाठावरील पेनूर, अंतेश्वर, भारसावडा, चित्रावाडी या गावात पूर आल्यानंतर गावचा संपर्क तुटतो. २७ जुलै २००५ रोजी ही गावे पाण्याने वेढली होती. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या गावांच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. पेनूर येथील पूर रेषेतील सर्व घरांचे पुनर्वसन करण्यासाठी गोरड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला. अंतेश्वर येथील पुनर्वसनासंदर्भात दोन-चार दिवसांत प्रस्ताव वरिष्ठांकडे जाणार आहे.

चिमुकल्यांनी बनविलेल्या राख्यांचे प्रदर्शन
बोरी, ४ ऑगस्ट/वार्ताहर

जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेतील मीना मंचाच्या विद्यार्थिनींनी खास राखी पौर्णिमेनिमित्त तयार केलेल्या राख्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष भास्करराव चौधरी यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. ग्रामशिक्षण समितीचे सदस्य नेमीनाथ जैन, रामकिशन सर्जे, माणिक रासवे, दीपक राजूरकर, नरहरी चौधरी, विष्णू तायडे, अशोक टाक या वेळी उपस्थित होते. मुख्याध्यापक बी. एन. पानझाडे यांनी प्रश्नस्ताविकातून मीना मंचातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. मंचाच्या मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती गऊळकर, श्रीमती झोडपे यांनी राख्या बनविण्यासाठी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे उद्घाटन कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत हार-तुऱ्यांनी न करता विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या देऊन करण्यात आले. याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन कलगुंडे सरांनी केले.