Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

पुणे - साताऱ्यात साथ नियंत्रण कायदा लागू
राज्यात ‘स्वाइन फ्लू’ चे १५७ रुग्ण, पुण्यात सर्वाधिक
पुणे, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

 

‘स्वाइन फ्लू’ने देशातील पहिला बळी पुण्यातील शाळकरी मुलीचा गेल्याने राज्याचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून याचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याने पुणे आणि सातारा जिल्ह्य़ांत ‘साथरोग नियंत्रण कायदा’ लागू करण्याचा निर्णय आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी जाहीर केला. या कायद्याची अंमलबजावणीचे अधिकार हे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाच्या संचालकांना असून परिस्थितीनुसार निर्णय ते घेतील, असे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव शर्वरी गोखले यांनी येथे सांगितले. राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये सहा खाटांचा स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात येणार आहे, असे आरोग्य राज्यमंत्री डॉ. बच्छाव यांनी सांगितले.
पुणे व सातारा जिल्ह्य़ांमध्ये साथरोग नियंत्रण कायदा लागू केल्याने स्वाइन फ्लूचा उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणेला देण्यात आले आहेत. या माध्यमातून कोणत्याही संशयित रुग्णाची आरोग्य तपासणी यंत्रणा करू शकते. तसेच या जिल्ह्य़ात शाळांमध्येही विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या आजाराने प्रभावित झालेल्या रुग्णांची देशातील संख्या ५१७ इतकी झाली असल्याचे डॉ. बच्छाव म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत १३ हजार ६७० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रत्येक जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्याची व्यवस्था केली जात आहे. स्वाइन फ्लूच्या यादीत नाशिकचा एक रुग्ण दिसत असला, तरी तो सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे.