Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘रिदा शेखचा मृत्यू निष्काळजीपणामुळेच’

 

‘आमची मुलगी तर आम्ही गमावली आहे. पण अन्य कुणालाही असा त्रास होऊ नये, यासाठी आम्ही जहांगीर, रुबी या रुग्णालयांना आता धडा शिकविणार आहोत..’’ असा निर्धार रिदाच्या काकी आयेशा शेख यांनी या वेळी व्यक्त केला. स्वाइन फ्लूने पुण्यातील सेंट अ‍ॅन्स शाळेतील नववीतील रिदा साजीद शेख हिला काल प्राण गमवावे लागले. त्या पाश्र्वभूमीवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. रुबी आणि जहांगीर रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच रिदाचा मृत्यू झाल्याचा आरोप अ‍ॅड. असीफ लॅम्पवाला यांनी केला. ‘जहांगीर व रुबी हॉल क्लिनिक या दोन्ही खासगी रुग्णालयांचे संगनमत आहे. रिदावर प्रारंभीपासून तिला न्यूमोनिया झाला म्हणूनच उपचार केले जात होते. मात्र शंका आल्यानंतर त्यांनी तिच्या काही चाचण्या करण्यास आम्हाला सांगितले. या चाचण्या रुबी हॉल क्लिनिककडून करून घेतल्या. त्यांच्याकडून चाचण्यांचा अहवाल अवघ्या एका तासातच आला. ती निगेटिव्ह असल्याचा अहवाल त्यांनी दिला होता. त्यानंतर उपचार सुरू झाल्यानंतर तिच्या रक्तासह लाळेचे नमुने हे राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पुन्हा पाठविण्यात आले. त्यांच्याकडून आलेल्या अहवालात तिला स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. त्याची माहिती रुग्णालयाने आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. रवींद्र कट्टी यांना दिली. डॉ. कट्टी यांनी आम्हाला पूर्णत: सहकार्य केले’, असे अ‍ॅड. लॅम्पवाला यांनी सांगितले.