Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

खासगी रुग्णालयांवर खटला - आझाद
नवी दिल्ली ४ ऑगस्ट/पीटीआय

 

उशिरा करण्यात आलेल्या निदानामुळे पुण्यात देशातील स्वाईन फ्लूचा पहिला बळी गेला असे केंद्रीय आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद यांनी आज सांगितले. आरोग्य मंत्रालय स्वाईन फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी लवकरच नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करील, असेही ते म्हणाले. काल पुण्यात रिदा शेख या चौदा वर्षांच्या मुलीचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला होता, त्या मुलीला जेथे दाखल केले होते त्या खासगी रूग्णालयावर निष्काळजीपणाच्या आरोपाखाली खटला दाखल करण्यात येईल, असे मृत मुलीच्या कुटुंबीयांनी आज पुण्यात सांगितले.
दरम्यान गुलाम नबी आझाद यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक आज झाली. आझाद यांनी सांगितले की, या मुलीची चाचणी उशिरा केल्याने तिचा मृत्यू झाला. ते म्हणाले की, आतापर्यंत देशात ५५८ रूग्णांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यातील ४७० जणांवर उपचार करण्यात आले आहेत. याचा अर्थ औषधे शंभर टक्के लागू पडत आहेत.
लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे आवाहन करताना आझाद म्हणाले की, सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे कोटय़वधी लोकांना सर्दी, खोकला होत असतो याचा अर्थ सर्वानीच जाऊन स्वाईन फ्लूची चाचणी करून घेण्याची गरज नाही कारण प्रत्येक चाचणीला दहा हजार रूपये खर्च होतो. यासाठीची सगळी सामुग्री ही परदेशातून आयात करण्यात आलेली आहे.