Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

कृत्रिम पावसाचा प्रयोगही लांबणीवर
पाणीटंचाईचे संकट वाढले
मुंबई, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने मुंबईकरांवरील पाणी टंचाईचे संकट वाढण्याची शक्यता आहे. येत्या शुक्रवारी पाणीसाठय़ाचा आढावा घेण्यात येणार असून त्यानंतर पाणीकपातीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
गेल्या २३ जुलै रोजी मोडकसागर तलाव पूर्ण भरला होता. मात्र इतर तलावांत फारसा पाऊस झालेला नाही. आता मोडकसारगमधील साठाही कमी होत आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी टंचाईचे संकट वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या आठवडय़ात कृत्रिम पाऊसाचा प्रयोग करण्याची तयारी पालिकेने केली होती. मात्र अजूनही हवाई वाहतूक खात्याने पालिकेला परवानगी दिली नाही शिवाय सध्या या क्षेत्रात ढग नसल्यामुळे हा प्रयोग करता येणार नाही, असे हवामान खात्याने पालिकेला कळविले आहे. त्यामुळे कृत्रिम पासवाचा प्रयोगही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी स्थायी समितीची बैठक होणार असून या बैठकीत पाणीसाठय़ाबाबत आढावा घेण्यात येणार आहे. पंधरा दिवसांपूर्वी सर्व नगरसेवकांनी जोरदार मागणी केल्यामुळे प्रशासनाने पाणीकपात ३० टक्क्यांवरून १५ टक्के करण्यात आली होती. राजकीय दबावाला बळी न पडता प्रशासनाने पाणीपुरवठय़ाबाबत धोरण ठरवावे, अशी मागणी होत आहे. त्यामुळे शुक्रवारी स्थायी समितीच्या सदस्यांनी विरोध केला तरी प्रशासन पाणीकपात करण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. सध्या मोडकसागरमध्ये १६२.६७ मीटर, तानसा १२५.५२, विहार ७५.७८, तुलसी १३७.११, अप्पर वैतरणा ५९९.०३ आणि भातसामध्ये १२६.२५ मीटर पाणीसाठा आहे.