Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

गेटवे ऑफ इंडिया, झवेरी बाजार स्फोटप्रकरण
शिक्षा उद्या सुनावणार
मुंबई, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

 

गेट वे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार येथे २५ ऑगस्ट २००३ मध्ये बॉम्बस्फोट घडविल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी आग्रही मागणी आज अभियोग पक्षाच्या वतीने पोटा न्यायालयात करण्यात आली. दरम्यान, येत्या गुरुवारी म्हणजे ६ ऑगस्ट रोजी त्यांना शिक्षा ठोठाविण्यात येणार आहे. एका दाम्पत्यासह तीन आरोपींना न्यायालयाने या बॉम्बस्फोटप्रकरणी गेल्या आठवडय़ात दोषी ठरविले होते.
या स्फोटांप्रकरणी हनीफ सय्यद अनिस, त्याची पत्नी फहमिदा आणि अर्षद अन्सारी यांना पोटा न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्यापैकी हनीफ आणि फहमिदा यांनी कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती न्यायालयास केली. तर अन्य आरोपी अर्षद याने तो निर्दोष असल्याचे सांगून त्याला दोषी ठरविण्यात आल्याचे नामंजूर असल्याचे न्यायालयास सांगितले. आरोपींचा गुन्हा हा विरळाच असल्याने त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी अभियोग पक्षाने केली. गेट वे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजारात झालेल्या स्फोटात ५२ जण ठार तर २४४ जण जखमी झाले होते. सदर तीन आरोपींनी जुलै २००८ मध्ये घाटकोपर येथे बेस्ट बसमध्ये घडवून आणलेल्या स्फोटात दोन जण ठार झाले होते. पोटा कायद्यान्वये प्रथम एका दाम्पत्याला दोषी ठरविण्याची ही पहिलीच वेळ आहे. न्या. एम. आर. पुराणिक यांनी आरोपींना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली असता अन्सारी म्हणाला की, मुझे यह मंजूर नही है. तर फहमिदा म्हणाली की, मी कोणताही गुन्हा केलेला नाही. एक औरत को आतंकवादी ठहराया जा रहा है, मेरी बच्ची लावारिस हो जाएगी.
दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींनी लष्कर-ए-तोयबाची योजना कृतीत आणली. मुंबईत विविध ठिकाणी स्फोट घडवून भारतामध्ये दहशतीचे वातावरण पसरविणे हा उद्देश असल्याने या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली. घडविण्यात आलेले स्फोट अत्यंत अमानुषपणाचे होते व त्यामध्ये निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले. फहमिदा महिला असूनही गुन्ह्यांत सहभागी झाली, पतीला त्याच्या गुन्ह्यांमध्ये सहकार्य करण्याची तिच्यावर कोणीही जबरदस्ती केली नव्हती, असे निकम म्हणाले. फहमिदा ही आर्थिकदृष्टय़ा समाजातील अत्यंत खालच्या वर्गातील असून तिच्यावर मुलांची जबाबदारी आहे. ती पारंपरिक मुस्लिम कुटुंबातील असून तेथे पुरुषांचे वर्चस्व आहे. फहमिदाला तिच्या पतीला सहकार्य करण्यावाचून अन्य पर्याय राहिला नव्हता. त्यामुळे तिला कमी शिक्षा द्यावी, असे बचाव पक्षाचे वकील सुदीप पासबोल म्हणाले.