Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘विर्क यांची मुदतवाढ वा रॉय यांच्या नियुक्तीशी पवार यांचा संबंध नाही’
मुंबई, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

 

राज्याचे पोलीस महासंचालक एस. एस. विर्क यांना दिलेल्या मुदतवाढीविरोधात याचिका करणारे मुंबई पोलीस दलातील निरीक्षक सर्जेराव शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पािठबा असल्याचे पोलीस दलात बोलले जात असले तरी प्रत्यक्षात या याचिकेत अनामी रॉय यांना महासंचालकपदी नेमू नये, अशी विनंती न्यायालयाला केल्याचे दिसून येते. अशा वेळी रॉय यांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील मंडळींनी शिंदे यांना याचिका दाखल करायला लावली, असे म्हणणे हास्यापद आहे. विर्क यांची मुदतवाढ वा रॉय यांची नियुक्ती या घटनांशी शरद पवार यांचा काडीचाही संबंध नाही, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात आला आहे.
‘विर्क यांना मुदतवाढ मिळाल्यामुळे पवारांना दणका’ (लोकसत्ता : ३१ जुलै २००९) या वृत्तासंदर्भात हा खुलासा करण्यात आला आहे. विर्क यांना मुदतवाढ मिळू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे आग्रही होते, असेही बातमीतून ध्वनित होत आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही, असेही खुलाशात स्पष्ट करण्यात आले आहे.
निरीक्षक शिंदे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यांनी हे धाडस राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंडळींच्या पाठिंब्यामुळे दाखविले, असे म्हणणे विपर्यास्त आहे. या वृत्तात विर्क यांच्याबरोबर पवार यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे. त्यामुळे आणि पवार यांच्यावरील संदर्भहीन टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला, असे स्पष्ट करून खुलाशात म्हटले आहे की, अनामी रॉय यांची महासंचालकपदी नियुक्ती करण्यासंदर्भातील पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचा उल्लेखही चुकीचा आहे.