Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

प्रादेशिक

प्रेक्षकांकडून लुबाडलेले दीड कोटी ‘फेम अ‍ॅडलॅब्ज’ला पचले नाहीत!
अजित गोगटे , मुंबई, ४ ऑगस्ट

अंधेरी येथील ‘फेम अ‍ॅडलॅब्स’ या मल्टिप्लेक्स चित्रपटगृहाने जून २००५ ते जानेवारी २००६ या सहा महिन्यांत प्रेक्षकांकडून घेतलेली परंतु शासनाकडे जमा न केलेली करमणूक कराची सुमारे दीड कोटी रुपयांची रक्कम राज्य सरकारने या वसूल करावी आणि ही रक्कम समाजाच्या दुर्बल वर्गासाठी व विशेषत: महिला आणि बालकल्याणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी अथवा धर्मादाय संस्थेस द्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. वसूल होणाऱ्या या रकमेचा पूर्णाशाने, योग्यपणे व परिणामकारकपणे वापर व्हावा यासाठी या कामाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वत: घ्यावी, अशी विनंतीही न्यायालयाने केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
संदीप प्रधान , मुंबई, ४ ऑगस्ट

उत्तन येथील ज्युडीशियल अकादमीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा ठपका ठेवत सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी तसेच कंत्राटदार किंजल कन्स्ट्रक्शन यांच्यावर दिवाणी व फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देणारे पत्र उच्च न्यायालयाने खात्याच्या सचिवांना पाठवले आहे.

‘नॉनस्टॉप सुपरफास्ट’ ११ तासांत कापणार मुंबई-नागपूरदरम्यानचे अंतर
मुंबई, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

मध्य रेल्वेकडून या आठवडय़ाच्या अखेरीस सीएसटी-नागपूरदरम्यान ‘नॉन स्टॉप सुपरफास्ट’ विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. अवघ्या ११ तासांत दोन्ही शहरांदरम्यानचे अंतर कापणारी ही विशेष गाडी म्हणजे दोन्ही शहरांदरम्यान भविष्यात सुरू करण्यात येणाऱ्या नॉनस्टॉप सुपरफास्ट एक्स्प्रेसची ‘ट्रायल रन’ असल्याचे मानले जाते. ही नॉनस्टॉप सुपरफास्ट विशेष गाडी येत्या ७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.१५ वाजता सीएसटीहून निघेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१५ वाजता ती नागपूरला पोहोचेल.

आर. के. लक्ष्मण यांच्या ‘स्ट्रोक’ मध्ये प्रचंड ताकद- राज्यपाल
मुंबई, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या ‘स्ट्रोक’मध्ये प्रचंड ताकद असून अग्रलेखातील हजारो शब्द जे सांगू शकणार नाहीत, तो आशय लक्ष्मण आपल्या एका व्यंगचित्रातून व्यक्त करतात, असे प्रतिपादन राज्यपाल एस. सी. जमीर यांनी आज राजभवन येथे केले.डॉ. धर्मेंद्र भंडारी यांनी आर. के. लक्ष्मण यांच्यावर लिहिलेल्या ‘आर. के. लक्ष्मण-द अनकॉमन मॅन’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते झाले.

अंध युवतीची परवड; ‘रुजू व्हा’ असे पत्र पाठवूनही रेल्वेने कामावर घेतले नाही..
मुंबई, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी

‘कामावर रुजू व्हा’ असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून आलेले पत्र चार बंगला, अंधेरी (प.) येथे राहणाऱ्या वैशाली कांबळे या अंध युवतीस आले तेव्हा तिला आनंद झाला कारण रेल्वेने सुमारे सहा महिन्यांपूर्वी दिलेल्या नियुक्तीपत्रानुसार आता त्यांना हे ‘पोस्टिंग’ दिले होते. परंतु रेल्वेच्या कार्यालयात जाऊन तेथे आज दिवसभर थांबूनही प्रत्यक्षात रुजू करून न घेता संबंधित अधिकाऱ्यांनी ‘खरे तर तुमच्यासाठी आमच्याकडे पदच रिकामे नाही’ असे सांगून बोळवण केली तेव्हा मात्र कांबळे यांना गेले ११ महिने रेल्वेकडून आपल्या केल्या जात असलेल्या फरफटीचाच हा पुढील अंक होता याचा दारुण अनुभव आला.

विधानसभेसाठी शिवसेनेच्या ‘वाघां’ची सिद्धता
मुंबई, ४ ऑगस्ट/ प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत मनसेकडून जोरदार आव्हान मिळालेल्या शिवसेनेने येत्या विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्ते कोणत्याच स्तरावर गाफील राहू नयेत यासाठी सिद्धता सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून कार्यकर्ते मेळावे आणि शिबिरांचा धडाका शिवसेनेने खास मुंबई व ठाण्यात लावला आहे.

सनी देओल भडकला
९२.७ बिग एफएमला नोटीस

मुंबई, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

९२.७ बिग एफएम या रेडिओ वाहिनीवरील ‘सन सन्नी’ या नकलांच्या कार्यक्रमाद्वारे मर्यादेबाहेर जाऊन थिल्लर पद्धतीने मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी आणि माझे कुटुंबीय यांची कमालीची टिंगल केली जात असून त्यामुळे आमची बदनामी होतेय. म्हणूनच या रेडिओ वाहिनीला कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्याचे अभिनेता सनी देओल याने आज येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

तिसऱ्या यादीनंतरही तक्रारी कायम
ऑनलाईन प्रवेश
मुंबई, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी
शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाची तिसरी यादी काल जाहीर केली असून या यादीत ६६ हजार ३९७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. आता केवळ आठ हजार विद्यार्थ्यांच्याच प्रवेशाचा प्रश्न उरला असल्याचे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयातून सांगण्यात येत आहे. मात्र, तिसऱ्या यादीनंतरही अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला नाही.

‘स्वाईन फ्ल्यू’चा सामना करण्यासाठी पालिका सज्ज
मुंबई, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी
पुण्यात ‘स्वाईन फ्ल्यू’मुळे शालेय विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्यानंतर ‘स्वाईन फ्ल्यू’चा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज असल्याचे अतिरिक्त आयुक्त मनीषा पाणटकर - म्हैसकर यांनी सांगितले. पुण्याचा अनुभव लक्षात घेऊन मुंबईत खासगी रुग्णालये, नर्सिग होम्स यांच्यासोबत पालिकेच्या आरोग्य खात्याचा संपर्क असून लवकरच त्यांची एक बैठकही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.मुंबईच्या दोन्ही विमानतळावर पालिकेच्या आरोग्य खात्याचे पथक २४ तास तैनात करण्यात आले असून संशयितांची ताबडतोब वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. एखाद्या प्रवाशाबाबत शंका आली तर त्याला कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात येत आहे. विमानतळावर रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे. विमानतळावर ‘स्वाईन फ्ल्यू’साठी खास विभाग सुरू करण्यात आला आहे. २४ तासांत रक्त तपासणीचा अहवाल पुण्यावरून मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे, असेही मनीषा पाटणकर - म्हैसकर यांनी सांगितले. या आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेकडे पुरेसा औषधसाठाही आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची पालिका रुग्णालयात कधीच कमतरता नव्हती. ‘स्वाईन फ्ल्यू’चा सामना करण्यासाठीही डॉक्टरांची खास नेमणूक करण्यात आली आहे, अशीही माहिती मनीषा पाटणकर - म्हैसकर यांनी दिली.

बीएसएनएलची तरुणांना लक्ष्य करून ‘कॅम्पस बझ’ नावाने सेवा
मुंबई, ४ ऑगस्ट/ प्रतिनिधी

भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने युवा-विद्यार्थी घटकांना लक्ष्य करून आपल्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळात ‘कॅम्पस बझ’ नावाने नवीन प्रीपेड मोबाईल सिम प्रस्तुत केला आहे. १८० दिवसांची वैधता असलेला हा नवीन सिम रु. ९९ शुल्कात दाखल करण्यात आला आहे.
याची एकत्रितरीत्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक समूह बनविता येईल आणि त्यांच्या दरम्यानच्या सर्व लोकल कॉल्सना प्रत्येकी ३० पैसे प्रति मिनिट दर आकारला जाईल. तर या सिमवरील अन्य लोकल कॉल्सना एक रुपया तर एसटीडी कॉल्सना दीड रुपया प्रति मिनिट दर पडेल. लोकल एसएमएससाठी १० पैसे शुल्क तर राष्ट्रीय स्तरावरील एसएमएससाठी एक रुपया शुल्क आकारला जाईल. ठराविक कालावधीसाठी ‘कॅम्पस बझ सिम’ विक्रेत्यांकडे उपलब्ध करण्यात आला आहे.

पाच वर्षांच्या मुलीचा छळ करणाऱ्या आई-वडिलांना अटक
मुंबई, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी
पाच वर्षे वयाच्या मुलीच्या गुप्तांगावर चटके देऊन तिचा गेले महिनाभर छळ करणाऱ्या आई-वडिलांना धारावी पोलिसांनी आज अटक केली. सदर मुलीच्या वैद्यकीय तपासणीत तिच्या गुप्तांगावर गरम चाकूने, नेलकटर तसेच पिनांनी जखमा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.सदर मुलीचा छळ होत असल्याची माहिती धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांना काही व्यक्तींनी दिली होती. त्यानुसार त्यांनी चौकशी केल्यानंतर सदर मुलीच्या तक्रारीवरूनच संजय व नीलम रामूगडे या आईवडिलांना अटक केली. नीलम ही या मुलीची सावत्र आई असून तीन वर्षांंपूर्वी संजयची पहिली पत्नी अनिता सोडून गेली होती. सोबत ती मुलीला घेऊन गेली होती.

केईएम रुग्णालयात तरुणाची आत्महत्या
मुंबई, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

आजाराला कंटाळेल्या तरुणाने आज सायंकाळी परळ येथील के.ई. एम. रुग्णालयाच्या नवव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, शैलेश विश्वनाथ रणखांबे (२९) असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा परभणी जिल्यातील गंगाखेड गावचा रहिवाशी आहे. शैलेशला पोटदुखी आणि रक्ताच्या जुलाबाचा त्रास होत होता. त्यामुळे उपचारासाठी त्याच्या नातेवाईकांनी त्याला गेल्या महिन्यात मुंबईला आणले होते. १५ जुलै रोजी त्याला के. ई. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची आई आणि भाऊ त्याच्यासोबत मुंबईला आले होते. मात्र रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही आजार आणखीच बळावल्याने शैलेश मानसिकरीत्या खचला होता व त्याच तणावाखाली त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.