Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

काँग्रेसमधील मतभेदांवर मुख्यमंत्र्यांचा तोडगा काय?
नगर, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पहिल्याच आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर होत असलेल्या जिल्हा दौऱ्याबाबत जिल्ह्य़ात उत्सुकता व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आलेल्या पक्षांतर्गत गटबाजीच्या वातावरणात मुख्यमंत्री काय पवित्रा घेतात याचेच राजकीय वर्तुळात कुतूहल आहे.

पदोन्नतीस ६७९ प्राथमिक शिक्षकांचा नकार
नगर, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नती नाकारण्याच्या प्रवृत्तीविषयी शालेय शिक्षणमंत्र्यांनी नाराजी प्रकट केली. तथापि त्यानंतरही ६७९ शिक्षकांनी पदोन्नती स्वीकारण्यास काल नकार दिला. शिक्षण समितीच्या ठरावानुसार आता या शिक्षकांना यानंतर एकच संधी पदोन्नतीसाठी मिळेल.

अपंगांच्या बचतगटांसाठी पाच लाखांची तरतूद अचानक रद्द!
नगर, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने तीन महिन्यांपूर्वीच मंजूर केलेली अपंगांच्या बचतगटांना अर्थसाहाय्य देण्याची पाच लाख तरतुदीची योजना आज अचानक समाजकल्याण समितीने रद्द करून ही तरतूद मंजूर नसलेल्या साहित्यखरेदीकडे वळवली. आचारसंहितेपूर्वी समितीच्या योजना मार्गी लावण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांतही सदस्यांनी मोठा अडथळा निर्माण करून ठेवला.

पंधाडे, लोंढे यांचा आज ‘मनसे’त प्रवेश
नगर, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी

आमदार अनिल राठोड यांच्यावर आरोप करून शिवसेनेतून बाहेर पडलेल्या अंबादास पंधाडे व सुभाष लोंढे यांनी अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाट धरली. त्यांच्यासह जिल्ह्य़ातील विविध पक्षांतील सुमारे २५ पदाधिकाऱ्यांचा उद्या (बुधवारी) मुंबईत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश होईल.

काळविट शिकारप्रकरणी पिता-पुत्रास वन कोठडी
कर्जत, ४ ऑगस्ट/वार्ताहर

तालुक्यातील चिलवडी येथे काळविटांची शिकार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रमेश शंकर व सचिन रमेश या भोसले पिता-पुत्राला ५ दिवस वन कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. देशमुख यांनी दिला. या दोघांनी तीन काळविटांची शिकार केल्याचे वनक्षेत्रपाल दगडू कापसे यांना सोमवारी छाप्यात आढळून आले.

सोयाबीन-कापसाची ‘ऑनलाईन ग्रोथ’!
जिल्ह्य़ातील ११ हजार शेतकरी नेटमध्ये

प्रदीप राजगुरू ,नगर, ४ ऑगस्ट
सोयाबीन-कापूस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना या पिकांवरील कीड, रोगाबाबत सल्ला व मार्गदर्शन आता थेट नवी दिल्लीहून मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळणार आहे. पिकामध्ये दर आठवडय़ात केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणानंतर दोन दिवसांत शेतकऱ्यांना प्रथमच या प्रकारे हायटेक मार्गदर्शन सुरूही झाले आहे. जिल्ह्य़ातील सुमारे १० ते ११ हजार शेतकऱ्यांना या नेटवर्कमध्ये सामावून घेतले जात आहे.

विसापूर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू
श्रीगोंदे, ४ ऑगस्ट/वार्ताहर

विसापूर तलावाच्या मुख्य दरवाजाची दुरुस्ती करताना धरणातील पाण्यात पडून पिंपळगाव पिसे येथील कारागीर सतीश भाऊसाहेब भालके (वय ४०) मृत्युमुखी पडला, अशी पोलिसात नोंद झाली असतानाही पाटबंधारे विभाग मात्र याप्रकरणी कानावर हात ठेवत असून, त्या मृत व्यक्तीला आम्ही बोलावलेच नव्हते, असे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.

गाडीलगावला दरोडेखोरांच्या हल्ल्यात दांपत्य जखमी
५२ हजारांचा ऐवज चोरीस

निघोज, ४ ऑगस्ट/वार्ताहर

पारनेर तालुक्यातील गाडीलगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले. दरोडेखोरांनी ५२ हजारांचा ऐवज चोरून नेला. मध्यरात्री दोन वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावण निर्माण झाले आहे. गाडीलगाव परिसरातील गोविंद तात्याबा गाडीलकर (वय ५५) यांच्या घरावर ५ ते ६ दरोडेखोरांनी हल्ला केला.

जकातचोरांना धडा!
बिअरची गाडी पकडली; दहापट दंड
नगर, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी
महापालिकेच्या जकात चोरांना जकातीचा ठेका घेतलेल्या सहकार एजन्सीने इंगा दाखविण्यास सुरुवात केली आहे. बिअरची ७५ खोकी जकात चुकवून आणणारी गाडी या एजन्सीच्या पथकाने आज पकडली. उपायुक्त अच्युत हंगे यांनी या गाडीला ३७ हजार ५०० रुपयांचा दहापट दंड ठोठावला. विजय हॉटेलची ही गाडी होती. ३ हजार ४०० रुपयांची जकात चुकवून मनमाड नाक्यावरून ही गाडी शहरात आणली जात होती.

पालिका कर्मचाऱ्यांचा संप मागे
मुख्यमंत्र्यांकडून चर्चेचे आश्वासन
नगर, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी
नगरपालिका व महापालिका कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याने न.पा. व म.न.पा. कर्मचाऱ्यांचा काल (सोमवार)पासून सुरू झालेला बेमुदत संप आज मिटला.
संघटनेचे पदाधिकारी आनंदराव वायकर यांचा मुंबईहून तसा निरोप मिळाल्याने मनपा कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला.

‘एटीकेटी’च्या विद्यार्थ्यांसाठी पुरेशा जागा
शिक्षण विभागाचा दावा

नगर, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी

जिल्हय़ातील ११वी प्रवेशाच्या एकूण ५८ हजार ३६० जागांपैकी ७ हजार २५५ जागा अद्याप रिक्त आहेत. त्यामुळे १०वी तील दोन विषयांच्या एटीकेटीच्या आधारावर प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या ४ हजार ६५९ विद्यार्थ्यांना अडचण भासणार नाही, असा दावा माध्यमिक शिक्षण विभागाने केला.

विनयभंगप्रकरणी आरोपीस अटक
कोपरगाव, ४ ऑगस्ट/वार्ताहर
तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गौतम सोपान खरात याला पोलिसांनी अटक केली. शाळेतून घरी परतत असताना आरोपीने तिचा विनयभंग केला. मुलींची छेड काढण्याच्या कारणावरून यापूर्वी खरात याला घरात डांबून ठेवून मारहाणीचा प्रकार घडला होता. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठाण मांडल्यानंतर जेऊर कुंभारी येथील धर्मा जाधव, रोहिदास जाधव, विठ्ठल आव्हाड, नितीन इंगळे, किरण वक्ते या पाचजणांविरुध्द गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक साहेबराव जाधव अधिक तपास करीत आहेत.

पारगावसुद्रिक सेवा संस्थेला ४२ लाखांचा नफा
श्रीगोंदे, ४ ऑगस्ट / वार्ताहर
राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या पारगावसुद्रिक सेवा संस्थेला २००८-०९ या आर्थिक वर्षांत ४२ लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जगताप यांनी दिली. ते म्हणाले की, संस्थेचे भागभांडवल ७१ लाख १४ हजार रुपये आहे. संस्था शेतकरी सभासद व ग्राहकांसाठी रासायनिक खते, शेती औषधे, कापड विभाग चालविते. आर्थिक शिस्त व प्रामाणिक व्यवस्थापनामुळे संस्थेने आर्थिक वर्षांत नफा मिळविला. संस्थेकडे प्रशासकीय इमारत व गोदाम असून बँक पातळीवर १०० टक्के कर्ज वसुली आहे.

नेवाशाला शुक्रवारपासून अखंड हरिनाम सप्ताह
नेवासे, ४ ऑगस्ट/वार्ताहर
श्रावण मासानिमित्त येथील संत ज्ञानेश्वर मंदिरात शुक्रवारपासून (दि. ७) अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.बन्सी महाराज तांबे यांनी सुरू केलेल्या या सोहळ्याचे हे ५२ वे वर्ष आहे. मंदिराचे मठाधिपती शिवाजी महाराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या सोहळ्यात पहाटे ४ वा. काकडा भजन व आरती, सकाळी ७ वा. ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण दुपारी ४ वा. प्रवचन, संध्याकाळी ५ वा. हरिपाठ, रात्री ८ वा. हरिकीर्तन व रात्री ११.३० वा. जागर इ. दैनंदिन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १३ ला दुपारी ४ वा. दिंडी, मिरवणूक व रात्री १० वा. तुळशीराम महाराज काकडे यांचे कीर्तन होईल. दि. १४ ला सकाळी ८ वा. शिवाजी महाराज देशमुख यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होईल.

विकासाबाबत नागरिकांनी मार्गदर्शन करावे - महापौर
नगर, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी
उपनगरांचा विकास ही शहराची गरज असून, त्यात नागरिकांनीही मनपाला मत, सल्ला व मार्गदर्शन करून आपला सहभाग द्यावा, असे आवाहन महापौर संग्राम जगताप यांनी केले.प्रभाग १६ मधील रस्ता डांबरीकरणाच्या कामास डॉ. रावसाहेब अनभुले यांच्या हस्ते व महापौर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. ज्येष्ठ नगरसेवक अरुण जगताप, स्थायीचे सभापती संजय गाडे, सभागृहनेते अरिफ शेख, महिला बालकल्याण सभापती सोनाबाई शिंदे, तसेच डॉ. बापूसाहेब कांडेकर, नज्जू पेहेलवाल आदी या वेळी उपस्थित होते. स्थानिक नगरसेविका डॉ. क्रांतिकला अनभुले यांनी प्रास्ताविक केले.

‘अभय आगरकर यांनी सत्ताधारी आघाडीत जावे’
व्यापारी, उद्योजकांचा सल्ला
नगर, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिलेल्या माजी नगराध्यक्ष अभय आगरकर यांनी विद्यमान सत्ताधारी आघाडीतील पक्षात प्रवेश करावा, असा सल्ला शहरातील काही व्यापारी व उद्योजकांनी आज दिला.सर्वश्री कांतिलाल गुगळे, राजकुमार भंडारी, महादेव शेळके, हिरालाल भंडारी, किशोर मिठूलाल, रितेश पारख, मनोज काटेचा आदींनी याबाबतचे निवेदन आगरकर यांनाच आज दिले.केवळ दबावगट तयार करण्याऐवजी सत्ताधारी आघाडीत प्रवेश करावा. शहरातील सामाजिक अस्थिरता, गुन्हेगारी, खुटलेला विकास या समस्यांवर त्यातून उपाय सापडेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अपंगत्व आलेल्या कामगारांना भरपाई
नगर, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी
एमआयडीसीतील सोहम इंडस्ट्रीजमध्ये काम करीत असताना झालेल्या अपघातात अपंगत्व आलेल्या चार कामगारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नामुळे नुकसानभरपाई मिळाली.विष्णू आदिनाथ वडालेक, प्रभाकर गवजीनाथ अभंग, नितीन ज्ञानदेव जाधव, भागचंद भानुदास भापकर अशी या कामगारांची नावे आहेत. वकील सादिक सय्यद यांच्या हस्ते चौघांना नुकसान भरपाईचे धनादेश देण्यात आले. मनसेचे जिल्हा संघटक सचिन डफळ, मनसे कामगार सेनेचे चंद्रकांत ढवळे, रावसाहेब खरमाळे, कामगार प्रतिनिधी हसन राजे, मनोज राऊत आदी या वेळी उपस्थित होते.अनेक कारखान्यांत कामगारांना नुकसान भरपाई देणे टाळले जाते. हा अन्याय दूर व्हावा, कामगार कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी, यासाठी मनसे कामगार सेना प्रयत्नशील आहे. अन्यायग्रस्त कामगारांनी संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन ढवळे यांनी या वेळी केले.

काळी फीत लावून व्यापाऱ्यांचे जकातीच्या विरोधात आंदोलन
नगर, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

जकातीच्या विरोधात शहरातील सर्व व्यापारी व उद्योजकांनी आजपासून खिशाला काळी फीत लावून काम करण्यास सुरुवात केली. दि. ९ ऑगस्टपासून राज्यातील सर्व ड वर्ग मनपांमध्ये व्यापारी बेमुदत बंद पुकारणार असून, त्यात सहभागी होण्याचा निर्णयही येथील व्यापारी संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.आडत बाजार र्मचट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पोखर्णा यांच्या अध्यक्षतेखाली र्मचट हॉलमध्ये ही बैठक झाली. पोखर्णा यांनी दिल्ली भेटीत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी जकात बंद करण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची माहिती दिली.शहरातील २५ व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. कोल्हापूर येथे झालेल्या राज्य जकात बंद समितीच्या निर्णयाप्रमाणे आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहतूकदार संघटनेच्या प्रतिनिधींनीही जकातीच्या विरोधातील ‘बंद’मध्ये सहभागी होण्याबद्दल सहमती दर्शवली.

अविहास इलेक्ट्रीकल्सचा १५ वा वर्धापनदिन उत्साहात
नगर, ३ ऑगस्ट/प्रतिनिधी
अविहास इलेक्ट्रीकल्स कंपनीचा १५ वा वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी कंपनीचे प्रणेते भास्कर तथा काका मुळे, टेक्नोट्रॅक (पुणे) कंपनीचे संचालक अरुण उंदिरवाडकर यांचा कंपनीचे संचालक मिलिंद गंधे व अविनाश बोपर्डीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कंपनीच्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कंपनीचे संचालक सुहास मुळे या वेळी उपस्थित होते. आभार सुहास कुलकर्णी यांनी मानले.

कराळे, पोखरकर यांचा मराठा पतसंस्थेतर्फे सत्कार
नगर, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी
आदर्श कर्मचारी पुरस्कार मिळाल्याबद्दल सुभाष कराळे यांचा तर सेवानिवृत्त झाल्याबद्दल कार्यकारी अभियंता जी. डी. पोखरकर यांचा जिल्हा मराठा सेवा नागरी पतसंस्थेतर्फे अध्यक्ष प्रा. पोपटराव काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कराळे हे मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत.या वेळी संस्थेचे संचालक बबन खिलारी, रामकृष्ण कर्डिले, संपत साठे, सुभाष वाघ, यशवंत ओव्हाळ, ज्ञानदेव पांडुळे, सचिव प्रकाश कराळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सोपान गुळे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गांगर्डे आदी उपस्थित होते.

अण्णा भाऊ साठे पुरस्कार दिलीप सकट यांना प्रदान
नगर, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे दिला जाणारा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार दिलीप सकट यांना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते नुकताच पुणे येथे प्रदान करण्यात आला. या वेळी समाज कल्याणमंत्री चंद्रकांत हंडोरे, हृषिकेश शेंडगे आदी उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल सकट यांचे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष भानुदास कोतकर, शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, नगरसेवक अनिल शेकटकर आदींनी अभिनंदन केले.

चंद्रभागाबाई बोरुडे यांचे वृद्धापकाळाने निधन
नगर, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी

येथील रहिवासी श्रीमती चंद्रभागाबाई बोरुडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जुने हॉटेल व्यावसायिक (कै.) रखमाजी बोरुडे (रामभरोसे) यांच्या त्या पत्नी होत. चंद्रभागाबाई यांच्यावर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.