Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

नवनीत

जी व न द र्श न
बासरी

 

श्रावणसरींचे आणि बासरीचे नाते आहे. बासरीचा कृष्ण श्रावणात आला. हिरव्याकंच सळसळतेपणाला त्याने सूर दिला. तसा तो मेघाचाच होता. त्याची मोरपिसे, त्याची घोंगडी, त्याची फुले, त्याची निळाई श्रावणाने जपली. हवेतही तो सुरेल असे. ब्रह्मगिरीवरून सुटलेल्या प्रवाहांच्या रांगोळय़ात तो गुणगुणे. खडकांच्या सांद्रसंध्या त्याने सांभाळल्या. या साऱ्यात कधीकधी सूर्याला वाटे; आपण सामील व्हावे. तेवढय़ापुरता सूर्य बाल होई. पण मेघ त्याला अधूनमधून यायला सांगे. पानापानांची शुद्धलेखनी भाषा बासरीत होती. फांद्यांचे कडाका छंद बासरी बघे. यमुनेच्या चढत्या पुरातही बासरीने त्याचा अंगठा यमुनेला लावला नि यमुना स्वरात वाहिली. बासरीतून त्याने राधेला हाकांच्या पौर्णिमा घातल्या. राधेची वाट सुरात होती. अनवट सुरांनी राधेला कोडय़ात टाकले. ती सैरभैर झाली. पण तिने पायाखालची जमीन भक्कम धरून ठेवली. कुब्जेला जमीनच नव्हती. खरेतर ती ऐहिकात नव्हती. वास्तवाचे वर्ख तिला कधीही भावले नाहीत. तिला जन्मही आठवेना. त्यामुळे संचिताचा प्रश्नच नव्हता. राधेला मागचे जन्म लख्ख दिसत. बासरी कधीकधी तिच्या जगण्याचे प्रश्नचिन्ह होई. कुब्जेला प्रश्नच नव्हते. कारण ती कधीही उत्तरात जगली नाही. तिचे जगणे प्रवाहणे होते. तीच सूर होती. तिने फक्त एवढेच जाणले; आपण सतत सुरेलच राहायचे. कणसूर व्हायचे नाही. ती मन ओतून हे जपत होती. देवकीला बासरी माहीत नव्हती. वसुदेवाने पाटीत बासरी ठेवून ती डोक्यावर घेऊन तो यमुना पार करून गोकुळात आला. यशोदेला बासरीपेक्षा त्याच्या खोडय़ा आवडायच्या. गोपींना त्याच्या बासरीचे वेड लागले. त्या सप्तसूर झाल्या नि गोप वंश झाले. बासरीतून गायींचा हंबर प्रकाश होई. बछडे नक्षत्र होत. यमुना स्थिर बने नि अवघा श्रावण घनकृष्ण होई. सुरांचा आणि रंगांचा महोत्सव गोकुळअष्टमीस दिसे. म्हणून हिला बासरीअष्टमी म्हणावेसे वाटते. आजही तो कृष्णमेघ अस्साच दिसतो नि मन मोर होऊन नाचते. बासरीच्या वाटेवर राधा होती. बासरीच्या फुंकणीत कुब्जा होती. सोन्याच्या पिंपळावर बासरी संजीवन सूर देत होती.
मन मुरे मग जे उरें। तें तूं कां रे सेविसी ना।।
दिसतें परीं न धरवे हातें। तें संतांते पुसावें।।

तेथींची खूण विरळा जाणें। निवृत्ती-प्रसादें ज्ञानदेवो म्हणे।। ल्ल यशवंत पाठक

कु तू ह ल
सापेक्षतावाद
विशिष्ट सापेक्षतावादाच्या आणि प्रचलित सापेक्षतावादातील तर्कशास्त्रातील मूलभूत फरक कोणते व ते असण्याचं कारण काय?
न्यूटनने अवकाश आणि काळ हे निरपेक्ष मानले. अवकाश म्हणजे आपल्या आजूबाजूचे सर्व काही ज्यात वसलं आहे, ती पोकळी. अवकाश आणि काळाच्या या निरपेक्षतेमुळे या पोकळीतील ‘बिंदूं’च्या सापेक्ष, एखाद्या वस्तूचा ‘खरा’ किंवा निरपेक्ष वेग काढता येणं शक्य असायला हवं. आईन्स्टाईनने मात्र आपल्या विशिष्ट सापेक्षतावादाद्वारे अवकाश आणि काळ या दोन्हींची निरपेक्षता निकालात काढली. या सापेक्षतावादानुसार वस्तूचा वेग आणि काळ या दोन्ही गोष्टी संपूर्णपणे निरीक्षकाच्या संदर्भ चौकटीवर आधारल्या गेल्या. परिणामी या दोहोंशी निगडित असणारे अंतर, प्रवंग, संवेग, बल अशा सर्व गोष्टीसुद्धा निरीक्षकाच्या दृष्टीने सापेक्ष ठरल्या.
आइन्स्टाईनच्या विशिष्ट सापेक्षतावादातील निष्कर्ष हे प्रकाशाच्या वेगाशी संबंधित असणाऱ्या एका गृहितकावर आधारलेले आहेत. आपल्यासमोर आपण एक आरसा धरला तर त्या आरशात आपल्याला आपला चेहरा दिसेल. समजा आपण हा आरसा हातात धरून प्रकाशाच्या वेगाने धावायला सुरुवात केली तर आपल्या चेहऱ्यापासून निघालेला प्रकाश आरशापर्यंत पोहोचण्याअगोदरच आरसा पुढे सरकलेला असेल. त्यामुळे हातात धरलेल्या आरशात आपल्याला आपला चेहरा दिसणार नाही. पण आइन्स्टाईनच्या मते हातातल्या आरशात आपल्याला आपला चेहरा दिसायलाच हवा. कारण आईन्स्टाईनच्या विशिष्ट सापेक्षतावादातील गृहितकानुसार प्रकाशाचा वेग सर्वासापेक्ष सारखाच असतो. मग निरीक्षक गतीत असो, प्रकाशाचा स्रोत गतीत असो वा दोन्ही गतीत असोत. तसंच ही गती एकमेकांच्या दिशेने असो वा विरुद्ध दिशेने असो. (प्रयोगातून निघालेल्या निष्कर्षांनी या गृहितकाला पुष्टी दिली आहे.) विशिष्ट सापेक्षतावादाचं गणित या असाधारण गृहितकावर आधारलेलं असल्यामुळेच विशिष्ट सापेक्षतावादातील निष्कर्षांनी संपूर्णपणे वेगळं स्वरूप धारण केलं आहे.
राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
राजकवी अल्फ्रेड टेनिसन
वयाच्या १२ व्या वर्षीच ६००० ओळींचे महाकाव्य, १४ व्या वर्षी दोन नाटके, महाविद्यालयात शिकत असताना उत्तम काव्यरचनेचं ‘चॅलेंजर्स गोल्ड मेडल’ मिळवणारे अल्फ्रेड टेनिसन यांनी १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमध्ये साहित्य विश्वात स्वत:च्या नावाचं ‘टेनिसन युगच’ निर्माण केलं होतं. ५ ऑगस्ट १८०९ रोजी लिंकनशायर इथे अल्फ्रेड टेनिसन यांचा जन्म झाला. त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘पोएम्स चीफली लिरिकल’, त्यानंतर ‘पोएम्स’, ‘लोटस इटर्स’, ‘द लेडी ऑफ श्ॉटल’, ‘द पॅलेस ऑफ आर्ट’ यांसारख्या कवितांमुळे ब्रिटिश साहित्य विश्वात त्यांच्या नावाचा दबदबा वाढला. विल्यम वर्डस्वर्थच्या निधनानंतर इंग्लंडच्या राजदरबारातील रिक्त झालेली राजकवीची जागा टेनिसन यांना देण्यात आली. राजकवी पदाचा मुकुट त्यांच्या डोक्यावर चढल्यानंतर त्यांचे काव्य अधिक बहरले. कवितेच्या पारंपरिक चौकटीत ते अडकले नाहीत. ते राजकवी झाल्यापासून त्यांच्या काव्यात भावनिकता दिसत नाही. या टीकाकारांच्या टीकांना त्यांनी कवितेतून, वादविवादातून उत्तरे दिली. ‘मॉड’, ‘ईनक आईन’, ‘द आयडिअल्स ऑफ द किंग’ हे त्यांचे काही गाजलेले काव्यसंग्रह. ६ ऑक्टोबर १८९२ रोजी इंग्लंडच्या या महान राजकवीचे अ‍ॅल्डवर्थ येथे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
रम्या आणि साम्या
रम्या आणि साम्या अगदी सख्ख्या मैत्रिणी होत्या. शाळेमध्ये ‘टॅलेंट शो’ होणार होता. रम्या म्हणाली, मला गाणे छान म्हणता येते. साम्या म्हणाली, मी गेली दोन वर्षे नृत्याच्या क्लासला जाते. दोघी म्हणाल्या, आपण भाग घेऊया. साम्या म्हणाली, ‘रम्या, तू नक्की निवडून येशील. तुझ्या वाढदिवसाला ऐकलंय मी तुझं गाणं. मी नृत्य करून दाखवू?’ दोघी साम्याच्या घरी गेल्या. सीडी लावून रम्याने क्लासिकल डान्स केला. रम्या भारावून गेली. ‘किती छान नाचतेस गं! तू नक्की निवडली जाशील.’ स्पर्धेचा दिवस यायला तीन आठवडे होते. दोघींनी आपापला सराव चालू ठेवला. शोचा दिवस उजाडला. एकमेकींना बेस्ट लक देऊन दोघी आपले नाव उच्चारायची वाट पाहात होत्या. रम्या छान गायली. साम्या छान नाचली.
परीक्षक असलेल्या बाईंनी स्पर्धा झाल्यावर दोघींना बोलावले. दोघींनाही कळेना, बाईंनी कशासाठी बोलावले असेल? रम्या म्हणाली, बहुधा आपले कार्यक्रम फार वाईट झाले असावेत, म्हणूनच बोलावले असणार आपल्याला. साम्याच्याही छातीत जरा धडधडतच होते. बाई म्हणाल्या, ‘पुढच्या आठवडय़ात शाळेच्या ट्रस्टीजची मीटिंग आहे. त्यावेळी अंतिम निर्णय दिला जाईल.’ दोघींनाही एकेकटे बोलावून बाईंनी हेच सांगितले. दोघी एका झाडाखाली येऊन बसल्या. रम्या म्हणाली, ‘पुन्हा आठवडय़ाने हेच गाऊन दाखवायचे?’ साम्यालाही तेच वाटले. पुन्हा तेच करण्याने काय फरक पडणार? रम्याला कल्पना सुचली. ‘ए साम्या, मी गाणे म्हणेन त्यावर तू नृत्य करशील का?’ कल्पना उत्तम होती. दोघींनी आठवडाभर खूप सराव केला.
‘शो’ छान झाला. सगळय़ांनी या दोघींच्या कार्यक्रमाचे कौतुक केले. संध्याकाळी दोघी मैत्रिणी व्हरांडय़ात गप्पा मारत होत्या. रम्या म्हणाली, ‘बाई म्हणाल्या होत्या, तुझ्या नृत्यात काहीतरी कमी आहे.’ साम्या म्हणाली, ‘अगं मलाही अगदी हेच म्हणाल्या, त्या!’ रम्या हसली. साम्याच्या गळय़ाभोवती हात गुंफून म्हणाली, ‘अगं माझ्या कार्यक्रमात तू आणि तुझ्या कार्यक्रमात मी कमी होते वेडाबाई.’ मग दोघी मैत्रिणी खूप वेळ गप्पा मारत बसल्या.
स्वत: उत्तम असले तर दुसऱ्याची मदत गरज असेल तेव्हा घेण्याने अधिक चांगली कुठलीही गोष्ट होऊ शकते. आयुष्यात पुढे जाण्यासाठी एकमेकांच्या मदतीच्या हाताची नेहमीच गरज असते.
आजचा संकल्प : मी इतरांची मदत घेण्यात कमीपणा मानणार नाही.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com