Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

रिक्षाचालकांच्या संपाने जनतेचे हाल
बेलापूर/वार्ताहर

भाडेवाढ करून मिळावी, या प्रमुख मागणीसाठी नवी मुंबईतील सर्व रिक्षाचालक संघटनांनी एक दिवसाचा बंद केला होता. यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. रिक्षाचालकांच्या या मनमानीबद्दल जनतेतून संताप व्यक्त केला जात होता. इंधन दरवाढीनंतर रिक्षाच्या भाडय़ात वाढ करावी, सीएनजी रिक्षांना मान्यता द्यावी, सीएनजी पंपात वाढ करावी आदी मागण्यांसाठी रिक्षा महासंघाचे कासम मुलानी यांनी मंगळवारी एक दिवस रिक्षा बंदची हाक दिली होती. यामध्ये अन्य संघटनांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांची मोठी पंचाईत झाली,

चार तासांत चार हजार नागरिकांची आरोग्य तपासणी
पनवेल/प्रतिनिधी

कळंबोली विभागीय काँग्रेस समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी महाशिबिराचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला. या शिबिराच्या पहिल्या चार तासांतच चार हजार नागरिकांची नोंद झाली. पनवेलचे माजी नगराध्यक्ष आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात झालेल्या या शिबिरात बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, हृदयरोग, कान-नाक-घसा विकार, दंतरोग आदी विविध तपासण्यांची सोय करण्यात आली होती.

कोळीवाडा येथील जेटीचे आज भूमिपूजन
नवी मुंबई/प्रतिनिधी
राष्ट्रवादीच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून साकार होणाऱ्या २५ लाख रुपये खर्चाच्या जेटीचा भूमिपूजन समारंभ बुधवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे.दिवा, कोळीवाडा (ऐरोली परिसर), मच्छिमार बांधवांना व्यवसायात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या विकास निधीमधून दिवा कोळीवाडा येथे जेटी बांधण्यासाठी २५ लाख रुपये मंजूर केले. त्यामुळे परिसरातील कोळीबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा समारंभ नवजीवन कला पथक सेवा मंडळ, दिवा कोळीवाडा, सेक्टर नऊचे अध्यक्ष चंदन मढवी व पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला आहे.

घणसोलीच्या खाडीत विषारी रसायने
बेलापूर/वार्ताहर : घणसोलीच्या खाडीत विषारी रसायनांचा साठा सापडल्याने या परिसरात खळबळ उडाली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. घणसोलीजवळील काही रासायनिक कंपन्या हे बेकायदेशीर कृत्य करत आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना मळमळणे, डोके दुखणे व उलटी होणे असे तुरळक प्रकार झाले. याच खाडीत काही दिवसांपूर्वी जैविक कचरा टाकण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच रात्री रसायनांचे पॅकेट व लहान डबे या खाडीत सकाळी आढळून आले. या घटनेचे वृत्त कळताच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रसायनाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत नेले. रसायनमिश्रित पाण्यामुळे खाडीत आणखी प्रदूषण वाढत आहे. यामुळे मासे मृत होण्याच्या घटना वरचेवर होत आहेत. याबाबत जनतेत रोष निर्माण झाला आहे.