Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

नाशिक ही कलाकारांची पंढरी : धर्मेद्र
नाशिक / प्रतिनिधी
नाशिक एक तीर्थक्षेत्र असले तरी भारतीय चित्रपटसृष्टीची सुरूवात इथून झाल्याने आम्हां कलाकारांसाठी ती पंढरी आहे, या शब्दांत ज्येष्ठ अभिनेते धर्मेद्र यांनी आपल्या भावना व्यक्त करताच कालिदास कलामंदिर टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेले. येथे रेवा एंटरटेनमेंटतर्फे आयोजित व्दितीय नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात धर्मेंद्र व आशा पारेख यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. आपल्या कारकिर्दीची सुरूवात नाशिकपासून झाली असल्याने या नगरीत होणारा सन्मान आपल्यासाठी विशेष महत्वाचा आहे, असेही ते म्हणाले.

..पुन्हा एकदा पावसाची प्रतीक्षा
प्रतिनिधी / नाशिक

भरपूर वाट पहावयास लावून यंदा थेट जुलैच्या उत्तरार्धात काही दिवस दमदार हजेरी लावणारा पाऊस आता पुन्हा एकदा अंतर्धान पावला असून उत्तर महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात पुन्हा एकदा त्याची प्रतीक्षा होत आहे. अशा परिस्थितीत आणखी काही दिवसात त्याचे पुनरागमन न झाल्यास विविध पिकांची पेरणी अडचणीत सापडण्याची भीती शेतकरी वर्गाला वाटत आहे. अगोदरच या भागात उशीराने झालेल्या पेरणीवर आता पावसा अभावी दुसरे संकट कोसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मध्यंतरी धरणांतील जलसाठय़ांमध्ये होत असलेल्या वाढीचा वेगही जवळपास ठप्प झाला आहे.

प्रलंबित मागण्यांसाठी आरोग्य विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप
नाशिक / प्रतिनिधी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी केलेला लाक्षणिक संप यशस्वी झाल्याचा दावा संघटनेतर्फे करण्यात आला आहे. १० वर्षांहून अधिक काळ सेवेत असूनही आजपावेतो शासनातर्फे कुठलीही मुलभूत योजना लागू झाली नसल्याचे सांगत अन्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ मिळावा, यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिकारी-कर्मचारी संघटनेतर्फे हा संप पुकारण्यात आला होता.

नाशिकमध्ये लवकरच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एस.टी. तिकिटे
किरण जाधव / नाशिक

एस.टी. प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या तिकीटांच्या पारंपरिक स्वरूपात बदल करण्याच्या महामंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आता जिल्ह्य़ातल्या प्रमुख डेपोंवरही लवकरच सुरू करण्याची योजना आहे. त्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचा वापर करून नव्या धाटणीची तिकीटे आता वितरित केली जाणार आहेत. त्यासाठी प्रमुख डेपोंतील बसेसमध्ये इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनचा (इटीएम) वापर करण्याची योजना आहे.

कर्जदारांमध्ये गैरसमज पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करावी
नाशिक ठेवीदार हितसंवर्धन समितीची मागणी
नाशिक / प्रतिनिधी
नागरी सहकारी बँका व पतसंस्थांच्या कर्जदारांमध्ये गैरसमज पसरवून त्यांना कर्जफेड करण्यापासून परावृत्त करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी नाशिक ठेवीदार हितसंवर्धन तथा बचाव समितीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. गैरसमज पसरविण्याच्या कृतीमुळे बँकांच्या थकीत कर्जवसुलीच्या कार्यवाहीवर अनिष्ट परिणाम होऊन ठेवीदारांना त्यांच्या ठेवीचे पैसे मिळण्यात अडथळा निर्माण होत असल्याचे समितीने म्हटले आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी
नाशिक / प्रतिनिधी
नाशिक महानगर पालिकेच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेच्या राजीव गांधी भवन या मुख्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस आयुक्त बी. डी. सानप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी उपायुक्त डॉ. प्रविणकुमार देवरे, सतीश खडके, आर. एम. बहीरम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कोंडीराम पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

लोकशाहीदिनात १४ तक्रारी
नाशिक / प्रतिनिधी

नाशिक महापालिकेतर्फे आयोजित लोकशाहीदिनात वेगवेगळ्या विभागांशी संबंधित एकूण १४ तक्रारी प्राप्त झाल्या. याप्रसंगी बांधकाम, पाणीपुरवठा, पथदीप, स्वच्छता, गटारी, अतिक्रमण आदी विभागांच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रामुख्याने चर्चा झाली. प्राप्त झालेल्या नवीन तक्रारींमध्ये अतिक्रमण विभागाशी संबंधिथ चार, स्लम विभाग एक, भुयारी गटार योजना एक, नगररचना चार, आरोग्य दोन, बांधकाम एक, विद्युत विभाग एक यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली.