Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

तोरणमाळचे नयनरम्य बोटॅनिकल गार्डन
दत्ता वाघ / शहादा

पावसाळ्यात संपूर्ण सातपुडाच हिरव्या गर्द रंगाने सजुन जातो. या पर्वताचे लावण्य अत्यंत मनोहारी असते. सातपुडय़ाची गिरी शिखरं पर्यटकांना साद घालत असतात. अनुपम लावण्याने नटलेला सातपुडा फक्त तोरणमाळलाच दिसतो असे नव्हे तर बिलगाव तेथील बाराधारी धबधबा, मोलगी परिसर, जाब, तळोद्याचे हिरवे जंगल, तेथील हिंडीबाचे मंदिर हा सारा परिसर म्हणजे निसर्गाच्या अनोखा खजिनाच म्हणायला हवा. ‘सहा ऋतुंचे सहा सोहळे’ सातपुडा पर्वताच्या रांगेत अनुभवायला मिळतात. शिवाय या ठिकाणी वनखात्याने ‘बोटॅनिकल गार्डन’ तयार करून येथील निसर्ग सौंदर्यात भर टाकली आहे.

इच्छुकांच्या स्पर्धेमुळे ढवळले अमळनेरचे राजकीय अंतरंग
अमळनेर / वार्ताहर

अमळनेरच्या राजकीय कॅनव्हासवर आमदारकीचे छायाचित्र चितारण्याते काम सुरू आहे. लोकप्रतिनिधी व्हावे हा प्रत्येकाचा हक्क आहे, इच्छा आहे.. हे कुणीही नाकारणार नाही. पण, येत्या निवडणुकीसाठी अनेकांची इच्छा एवढी प्रबळ आहे, की प्रत्येक इच्छुकाला आतापासूनच आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. अर्थाथ, या स्पर्धेपोटीच याआधी आपण अमळनेरकर जनतेसाठी काय केले, याचा लेखाजोखाही देणे संबंधितांना क्रमप्राप्त होणार आहे.

एक दिवस आंदोलनांचा आणि जनक्षोभाचाही
देवळा / वार्ताहर

येथील तहसील कार्यालयावर सोमवारी उपोषण, आंदोलन व मोर्चाने दिवस गाजविला. परिणामी, यावेळी तहसील कार्यालय आवाराला जत्रेचे स्वरूप आले होते. देवळा र्मचट बँकेने सर्वासाठी सभासदत्व खुले करावे या मागणीसाठी अण्णा हजारेप्रणीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे देवळा तालुका अध्यक्ष मयूर आहेर यांनी येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असता बँकेचे अध्यक्ष डॉ. विश्वास निकम यांनी सहकार खात्याच्या नियमानुसार सभासद केले जातील, असे लेखी नमूद केल्यामुळे आहेर यांनी उपोषण मागे घेतले.

व्यस्त जीवनशैलीतून शासकीय अधिकाऱ्याचे असेही मार्गदर्शन
प्रांताधिकाऱ्याकडून सहा पुस्तकांचे लेखन
अमळनेर / वार्ताहर
प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातल्या त्यात उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी असला तर काम जादा व फावला वेळ कमी. अशा व्यस्त जीवनातही अधिकारी व कर्मचाऱ्यांना योजनांची माहिती अधिक सरलतेने मिळावी व काम करताना अडचणी येऊ नयेत यासाठी अमळनेरचे प्रांताधिकारी डॉ. अर्जुन चिखले यांनी तब्बल सहा पुस्तकांचे लेखन केले आहे.

‘सारणेचे पाणी’ काव्य संग्रहाचे प्रकाशन
सटाणा / वार्ताहर

प्रा. शं. क. कापडणीस यांनी सारणेचे पाणी या कविता संग्रहातील कवितांमध्ये प्राण ओतून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. समाजातील वैगुण्य दाखवून मार्गदर्शन करण्याचे कामही केले आहे. त्यांनी साहित्य क्षेत्रात तरूणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून अमोल साहित्य निर्मितीचे काम करावे असे प्रतिपादन मविप्र. शिक्षण संस्थेचे सरचिटणीस आ. डॉ. वसंत पवार यांनी केले.

सुरक्षा रक्षकांच्या भरतीवरुन गोंधळ
मनमाड / वार्ताहर

सुरक्षा रक्षकांच्या भरतीवरून निर्माण झालेल्या पेचप्रसंगामुळे येथील फूड कॉपरेरेशन ऑफ इंडियामध्ये एकच गोंधळ उडाला. त्यात स्थानिक कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सुरक्षा रक्षक पदावर स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे अशी भूमिका मनमाडच्या विविध पक्षीय कार्यकर्त्यांनी घेतली. याबाबत येत्या तीन दिवसांत वरीष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा व्यवस्थापकांतर्फे सांगण्यात आले.

हरसूल येथे सेमी इंग्रजी वर्गाचे उद्घाटन
हरसूल / वार्ताहर

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागात सेमी इंग्रजीच्या पहिल्या वर्गाचे उद्घाटन उपसरपंच नितीन देवरगावकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सुमारे आठ ते दहा वर्षांपासून शाळेत मुख्याध्यापक नसताना शाळेने गुणवत्ता कायम ठेवली. परंतु ग्रामस्थांबरोबर लोकप्रतिनिधींच्या असहकारामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुख्य केंद्राची पिछेहाट झाली. ती यानिमित्ताने भरून काढली जाणार आहे.

अनकवाडे शिवारात अपघातात दोन ठार
मनमाड / वार्ताहर

येथील अनकवाडे शिवारात येवल्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने समोरून येणाऱ्या मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. अपघातानंतर धडक देणारे वाहन फरार झाले. रविवारी मध्यरात्री येवला रोडवरील साईबाबा मंदिराजवळ अनकवाडे शिवारात हा अपघात झाला. अपघातात सटाणा तालुक्यातील दिनकर पाटील (२२) आणि दीपक अभिमान पवार (२४) या दोघांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन मनमाडहून येवल्याकडे भरधाव वेगाने जात असताना या वाहनाने पाटील व पवार यांच्या मोटरसायकलला जबर ठोस मारली, त्यात दोघांचा मृत्यू झाला. शहर पोलिसांनी अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरिक्षक रफीक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक सरोद करीत आहेत.