Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

देशात दुष्काळ अटळ!
अभिजित घोरपडे ,पुणे, ४ ऑगस्ट

 

या पुढील काळात सामान्य पाऊस पडेल, असा दावा सरकारतर्फे करण्यात येत असला, तरी जुलैअखेपर्यंतच्या पावसाची स्थिती पाहता या वर्षी देशात दुष्काळ अटळ आहे. पावसाच्या शंभर वर्षांच्या इतिहासानुसार, जुलैअखेर पावसाचे प्रमाण सरासरीच्या १५-१६ टक्के कमी असेल. हंगाम संपेपर्यंत ही तूट भरून निघालेली नाही. या वर्षी आतापर्यंत पावसाची तूट तब्बल २१ टक्के इतकी जास्त आहे. त्यामुळे काही चमत्कार झाला तरच दुष्काळी स्थिती बदलून ती सामान्य होऊ शकेल, असे मत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
पावसाळा मध्यावर आलेला असताना (जुलै अखेपर्यंत) अजूनही देशातील निम्म्याहून अधिक प्रदेश दुष्काळाच्या छायेतच आहे. त्यात देशातील हवामानाच्या एकूण ३६ पैकी १९ उपविभागांचा समावेश आहे. एकूण देशाचा विचार करता जुलैअखेपर्यंत पडलेला पाऊस सरासरीच्या तुलनेत २१ टक्क्य़ांनी कमी आहे. अन्नधान्य उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पंजाब, हरयाणा, पश्चिम उत्तर प्रदेशसह पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, संपूर्ण ईशान्य भारत, दक्षिण भारतात संपूर्ण आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील मराठवाडय़ातसुद्धा अतिशय अपुरा पाऊस पडला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे लागेल, असा इशारा हवामानतज्ज्ञांनी दिला आहे.
देशात या वर्षी पावसामध्ये अनेक चढउतार पाहायला मिळाले. त्यानुसार पावसाचे केरळमध्ये वेळेच्या आधी आगमन झाल्यानंतर त्याने मोठी उघडीप दिली. जुलैच्या पूर्वार्धातही स्थिती अतिशय गंभीर होती. त्यानंतर जुलैच्या उत्तरार्धात पावसाने हजेरी लावल्याने स्थिती काही प्रमाणात सुधारली. पुढे जुलैच्या अखेरच्या टप्प्यातही पावसाने दडी मारली असून, येत्या आठवडय़ात तरी त्याच्या पुनरागमनाची शक्यता नाही. त्यामुळे आताची तूट कशी भरून निघणार, हा प्रश्नच आहे. हवामान विभागाकडील शंभर वर्षांहून अधिक काळाच्या आकडेवारीवरून असे दिसते की, जुलैच्या अखेपर्यंत पावसाचे प्रमाण १५ ते १६ टक्क्य़ांनी कमी असेल तर ही तूट भरून निघालेली नाही आणि देशात दुष्काळ पडला आहे. आता तर ही तूट २१ टक्के इतकी आहे. त्यामुळे ती भरून निघणे कठीण आहे, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.
त्यातच आता प्रशांत महासागरात ‘एल-निनो’ची सौम्य स्थिती उद्भवली आहे. त्याचा विपरीत परिणाम सप्टेंबर महिन्यातील पावसावर होण्याची शक्यता आहे. आताच्या दुष्काळाच्या सावटावर याची आणखी भर पडणार आहे. देशाला या दशकात २००२ आणि २००४ साली दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. २००२ सालचा दुष्काळ गेल्या शतकातील सर्वात तीव्र दुष्काळांपैकी एक होता. त्या वर्षी संपूर्ण पावसाळ्यात १९ टक्के कमी पाऊस पडला होता, तर २००४ साली तो १३ टक्के कमी होता. यापाठोपाठ आता आणखी एका दुष्काळाची शक्यता आहे.
दुष्काळाची नेमकी व्याख्या
देशात मान्सूनच्या काळातील पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत १० टक्क्य़ांनी कमी असेल तर दुष्काळ मानला जातो. देशभरात हे प्रमाण १० टक्के कमी असले तरी याच स्थितीत देशाच्या अनेक भागातील पावसाचे प्रमाण बरेच कमी असू शकते.