Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

राज्य

‘स्वाइन फ्लू’ने जीविताला मोठा धोका नाही
वैद्यकतज्ज्ञ-संशोधकांचे ठाम प्रतिपादन
पुणे, ४ ऑगस्ट/खास प्रतिनिधी
‘स्वाइन फ्लू’चा भारतामधील पहिला बळी पुण्यात गेल्यानंतर धास्तावलेल्या जनतेला वैद्यकतज्ज्ञांनी ठाम शब्दांमध्ये दिलासा दिला आहे. ‘स्वाइन फ्लू’ हा जीविताला मोठा धोका निर्माण करणारा संसर्ग नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची प्राणघातकता फक्त सहा दशांश टक्के , तर भारतामध्ये ती निव्वळ ०.१७९ टक्के आहे. त्यामुळेच प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन व काळजी घेतल्यास ‘स्वाइन फ्लू’चा मुकाबला करणे शक्य आहे, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. अमेरिकेतील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ’ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंतच्या प्रमुख साथींची प्राणघातकतेची टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे.

‘जहांगीर’विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची शिफारस
पुणे, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’ची संशयित रुग्ण असलेल्या चौदा वर्षांच्या रिदा शेखला योग्य तो औषधोपचार करण्यात निष्काळजीपणा दाखविल्याचे स्पष्ट होत असल्याने साथरोग अधिनियम १८९७ नुसार जहांगीर रुग्णालयावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, असे शिफारसपत्र साथरोगचे सहसंचालक डॉ. पी. एस. चव्हाण यांनी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांना पाठविले आहे. स्वाइन फ्लूने रिदा शेख ही मृत्यू पावली, या प्रकरणाने आरोग्य विभागाने तातडीने कारवाईची पावले उचलली असून, जहांगीरवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे निवेदन पाठविले आहे.

हा एपीडेमिक अॅक्ट नेमका आहे तरी काय?
भारतात ब्रिटिश राजवट सुरू असताना प्लेगची साथ आली ती २२ जून १८९७ साली. त्यावेळी ब्रिटिशांनी ही साथ नियंत्रित करण्यासाठी साथरोग अधिनियम १८९७ (अॅपिडेमिक डिसिजेस अॅक्ट १८९७) हा कायदा तयार केला. त्यानंतर या कायद्यामध्ये १९८९ साली घटनादुरुस्ती करण्यात आली. त्या कायद्यात ‘अॅपिडेमिक अॅक्ट’ लागू केल्यानंतर नेमक्या काय उपाययोजना अथवा कोणती कृती करायची असते याचे स्पष्ट आदेश आहेत.

‘राष्ट्रवादी’त कोंडीनंतर अण्णा डांगे सक्रिय राजकारणातून दूर राहणार
गणेश जोशी , सांगली, ४ ऑगस्ट

आधीपासूनच राजकारणात निष्क्रिय असलेले ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यापुढे सक्रिय न राहण्याचा निर्णय घेऊन कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकले आहे. गृहमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असणाऱ्या इस्लामपूरच्या नगराध्यक्षपदी अॅड. चिमण डांगे यांची नुकतीच वर्णी लागली असल्याने अण्णासाहेब डांगे हे अन्य पक्षात प्रवेश करणार नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

वसई पालिकेतून गावे वगळण्याच्या आंदोलनाची धार अधिक तीव्र
साखळी उपोषणाचा चौथा दिवस, तर क्रांतिदिनापासून बेमुदत उपोषण!
ठाणे, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी

तालुक्यातील ५३ गावांचा समावेश वसई-विरार महानगरपालिकेतून वगळावा, या मागणीसाठी ‘गाव वाचवा’ जनआंदोलनाने सुरू केलेल्या लढय़ाला अधिकच धार चढू लागली आहे. १ ऑगस्टपासून वसई तहसील कार्यालयासमोर सुरू झालेल्या साखळी उपोषणाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा आंदोलनाच्या निमंत्रक डॉमनिका डाबरे यांनी केला आहे.

शिवाजी विद्यापीठात लाक्षणिक संप
कोल्हापूर, ४ ऑगस्ट / विशेष प्रतिनिधी

सहावा वेतन आयोग लागू व्हावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विद्यापीठात कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक संप केला. हा संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी केला असून, राज्य शासनाने याविषयी ठोस भूमिका न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी सध्या महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन उभारले आहे. या आंदोलनांतर्गत द्वारसभा, निदर्शने, लेखणीबंद आंदोलन असे विविध टप्पे हाताळण्यात आले.

रस्तालुटीत हजारोंचा ऐवज लंपास
धुळे, ४ ऑगस्ट / वार्ताहर

जिल्ह्य़ातील शिरपूर-बोराडी रस्त्यावरील घाटात सशस्त्र दरोडेखोरांनी वाहन अडवून त्यातील राहूल रंधे व त्यांच्या साथीदारांना तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवत तब्बल ७४ हजार ९०० रुपयांचा ऐवज लुटून नेला. २५ ते ३० वयोगटातील या दरोडेखोरांजवळ असलेली हत्यारे पाहून रंधे व त्यांच्या साथीदारांनी स्वत:जवळील २२ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, सोने आणि मोबाईलचे पाच हॅण्डसेट दरोडेखोरांच्या स्वाधीन केले आणि स्वत:ची सुटका करून घेतली. दरम्यान, रस्तालुटीच्या या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या संदर्भात राहूल विश्वास रंधे रा. बोराडी (ता. शिरपूर) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार ते रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांच्या वाहनातून घरी परतत होते. ते बोराडी घाटात पोहोचताच गोफणीच्या सहाय्याने त्यांच्या वाहनावर तुफान दगडफेक सुरू झाली. वाहन चालकाने वाहन तसेच पुढे नेण्याचा प्रयत्न केला पण पुढे रस्त्यावरच सिमेंटचा खांब आडवा टाकला असल्याने वाहन थांबविण्यशिवाय पर्याय उरला नाही. वाहन थांबताच २५ ते ३० वयोगटातील ९ ते १० जण तेथे आले आणि त्यांनी रंधे व त्यांच्या सहकाऱ्यांना धमकवायला सुरूवात केली. काही दरोडेखोरांनी मारहाणही सुरू केल्याचे पाहताच रंधे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याजवळचे पैसे, दागदागिने, अन्य किंमती वस्तू संबंधितांना काढून दिल्या. पाच मोबाईलचे हँडसेटही दरोडेखोरांनी हिसकावून घेतले आणि तेथून पलायन केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पावसाची पुन्हा दडी; भातावर करपा रोगाचा प्रादुर्भाव
रत्नागिरी, ४ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

गेल्या महिन्याच्या पूर्वार्धात धुवांधार बरसात करून वार्षिक सरासरीची कसर भरून काढणाऱ्या पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भातपिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.यंदाच्या वर्षी जूनमध्ये मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पावसाचे आगमन झाले, पण त्याचा जोर जेमतेम दोन दिवस टिकला. त्यानंतर महिनाअखेपर्यंत पुन्हा एकदाच हजेरी लावल्यामुळे त्या महिन्यातील पावसाच्या सरासरीच्या जेमतेम एक तृतीयांश पावसाची नोंद रत्नागिरी जिल्ह्यात झाली, पण जुलैच्या पहिल्या दिवसापासून दमदार पुनरागमन करीत पावसाने मागील सारी कसर भरून काढली. त्यामुळे चारा-पाण्याचा प्रश्न सुटला, तसेच रखडलेल्या लावण्याही मार्गी लागल्या, पण महिन्याच्या उत्तरार्धात हळूहळू पावसाचे प्रमाण कमी होत गेले आणि गेला आठवडाभर तर जवळजवळ पूर्ण उघडीपच आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भातपिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. येथील जिल्हा कृषी कार्यालयाकडे उपलब्ध माहितीनुसार चिपळूण, संगमेश्वर, मंडणगड, दापोली आणि गुहागर या तालुक्यांतील सुमारे १०१ हेक्टर भातपिकास करपा रोग लागला आहे.

वाहनचालक गजाआड
खोपोली, ४ ऑगस्ट/ वार्ताहर

प्रवाशांना ठकवून एक लाख ४२ हजार २१० रुपये किमतीचा ऐवज लंपास करून फरार झालेला इन्होव्हा कारचालक प्रवीण ऊर्फ हनुमंत कदम (२२, रा. चंदननगर, पुणे) याला निवासस्थानी पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. मुस्तफा अहमद व त्यांचे मित्र मुंबईहून पुण्याला जात असताना फूडमॉल हॉटेलपाशी डिझेल भरून येतो, असे सांगून फरार झालेल्या या वाहनचालकाचे नाव व पत्ताही प्रवाशांना माहीत नव्हता. इन्होव्हा कार क्रमांकात शेवटचे अंक २५९७ होते, एवढीच जुजबी माहिती फिर्यादींनी दिली होती. टोयाटो कंपनीच्या पुणे येथील कार्यालयाच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली.