Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

क्रीडा

सायना, विजेंदर म्हणतात, खेळाडूंच्या खासगी बाबीत ‘वाडा’चा हस्तक्षेप नाही!
महेश विचारे , मुंबई, ४ ऑगस्ट

खासगी बाबींत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करून जागतिक उत्तेजक सेवन विरोधी संघटनेच्या (वाडा) अटींचे पालन करण्यास भारतीय क्रिकेटपटूंनी नकार दिलेला असताना इतर खेळातील खेळाडूंनी मात्र या संघटनेकडून आपल्याला असा कोणताही अनुभव आलेला नसल्याचे म्हटले आहे. खेलरत्न पुरस्कार विजेता विजेंदर, अर्जुन पुरस्कार विजेती सायना नेहवाल यांच्याबरोबरच सानिया मिर्झा आणि महेश भूपती यांनी ‘खासगी बाबी’च्या मुद्यावर विनाकारण बाऊ केला जात असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय क्रिकेटपटूंचा विरोध चुकीचा
क्रीडावैद्यकतज्ज्ञांचे मत

नवी दिल्ली, ४ ऑगस्ट/वृत्तसंस्था

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने खेळाडूंवर घातलेल्या उत्तेजक सेवन चाचणीच्या अटींना विरोध करण्याची भारतीय क्रिकेटपटूंची भूमिका चुकीची आहे, असे मत क्रीडावैद्यकतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. उत्तेजक सेवन चाचणीच्या अटींना विरोध करताना भारतीय क्रिकेटपटूंनी दिलेली कारणे अत्यंत मूर्खपणाची आहेत, असे या मंडळींनी म्हटले आहे.

माजी क्रिकेटपटूंची संमिश्र प्रतिक्रिया
मुंबई, ४ ऑगस्ट/ क्री. प्र.

‘वाडा’ उत्तेजक सेवन चाचणीच्या नियमावलीला विरोध करण्याच्या भारतीय क्रिकेटपटूंच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटपटूंनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.माजी कर्णधार अजित वाडेकर, संदीप पाटील यांनी भारतीय नियामक मंडळ आणि खेळाडूंनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे. तर निवड समितीचे माजी अध्यक्ष चंदू बोर्डे यांनी ‘वाडा’ची नियमावली समर्थनीय असल्याचे म्हटले आहे.

ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी साधला इंग्लंडच्या गोलंदाजांवर निशाणा
लंडन, ४ ऑगस्ट/ पीटीआय

एजबस्टन येथील अ‍ॅशेस मालिकेतील तिसरी कसोटी अनिर्णीत राहीली असून ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी यासाठी इंग्लंडच्या गोलंदाजांना जबाबदार धरले आहे. इंग्लंडच्या आक्रमणाला धार नव्हती आणि त्यामुळेच सामना अनिर्णीत राखावा लागला असा निशाणा ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी इंग्लंडच्या गोलंदाजांवर साधला आहे. यावेळी ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

फिटनेसचा परिणाम फ्लिन्टॉफच्या कामगिरीवर- पॉन्टिंग
लंडन, ४ ऑगस्ट/ पीटीआय

एजबस्टन येथील सामन्यात इंग्लंडचा अष्टटपैलू खेळाडू अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफचा फिटनेस हा वेगाने खालावताना दिसत होता आणि त्याचाच काहिसा परिणाम सामन्यावर झाला असावा असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगने मांडले आहे. गुम्डघ्याच्या दुखापतीमुळे फ्लिन्टॉफने यंदाच्या अ‍ॅशेस मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या सामन्यात फ्लिन्टॉफ हा इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता.

चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात साईडबॉटम
लंडन, ४ ऑगस्ट/ वृत्तसंस्था

हेडिंग्ले येथे शुक्रवारपासून होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकतील चौथ्या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात बदल करण्यात आले असून वेगवान गोलंदाज रेयान साईडबॉटम याचे चौदा सदस्यीय संघात पुनरागमन झाले आहे. अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफ जर फिट नसेल तर त्याच्याजागी स्थानिक क्रिकेटमध्ये फॉर्मात असलेल्या जोनाथन ट्रॉटलाही संघात स्थान देण्यात येणार आहे.

गतविजेत्या ब्राझीलला अमेरिकेने झुंजविले
पुणे ४ ऑगस्ट/प्रतिनिधी

अमेरिकेने गतविजेत्या ब्राझील संघाला चिवट झुंजविले, मात्र अनुभवाच्या जोरावर ब्राझीलने हा सामना जिंकून जागतिक कनिष्ठ गट व्हॉलीबॉल स्पर्धेतील अव्वल साखळीत पहिला विजय नोंदविला.शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरु असलेल्या या स्पर्धेतील अव्वल साखळी लढतींना आज येथे प्रारंभ झाला. ब्राझीलने आज २५-२१, २५-२३, २२-२५, २५-१७ असा विजय मिळविला.

आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये भारत चौथ्या स्थानावर
दुबई, ४ ऑगस्ट / पीटीआय

आय. सी. सी. कसोटी रँकिंगमध्ये भारतीय चौथ्या स्थानावर घसरला असून, पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका जिंकणाऱ्या श्रीलंकेने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ही मालिका जिंकल्याने भारत व श्रीलंका यांची गुणसंख्या ११९ झाली. मात्र पुन्हा एकदा गोळाबेरीज केल्यानंतर श्रीलंकेने भारतावर ‘वजा ०.०१’ गुणाची आघाडी घेत तिसरे स्थान पटकाविले. ऑस्ट्रेलिया संघ १२४ गुणांसह अव्वल स्थानी असून, दक्षिण आफ्रिका (१२२) संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

कबड्डी संघटक फिदा कुरेशी यांना दामले स्मृती पुरस्कार
पुणे, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी

ज्येष्ठ कबड्डी संघटक व प्रशिक्षक फिदा कुरेशी यांची यंदाच्या शिवरामपंत दामले स्मृती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रीय मंडळातर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.मंडळाचे सरचिटणीस रमेश दामले यांनी आज येथे ही माहिती दिली. १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मंडळाच्या मुकुंदनगर येथील चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयात हा पुरस्कार दिला जाणार आहे.

मनोरमा देवीचा अखेरच्या मिनिटाला गोल; भारताची विजयी सलामी
महिला ज्युनियर विश्वचषक हॉकी
बोस्टन, ४ ऑगस्ट / पीटीआय

मनोरमा देवीने अखेरच्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे भारताने महिला ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला ३-२ असे नमवून विजयी सलामी दिली.मनोरमा देवीने अखेरच्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर भारताला हा रोमहर्षक विजय मिळवून दिला. भारतीय संघ मध्यंतराला ०-१ असा पिछाडीवर होता. भारतातर्फे रितु रानीने ४५ व्या मिनिटाला तर मोनिका बद्रनने ५३व्या मिनिटाला गोल केले. ऑस्ट्रेलियाच्या कॅसी इस्टहॅमने ३१व्या मिनिटाला आपल्या संघाचे खाते उघडले तर मॅर्नी हडसनने ६०व्या मिनिटाला गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. पण मनोरमाने केलेल्या अप्रतिम गोलमुळे भारताचा विजय साकार झाला. त्याशिवाय, अत्यंत मोक्याच्या क्षणी ऑस्ट्रेलियाने काही महत्त्वाच्या चुका केल्यामुळे भारतीय संघाला त्याचा फायदा मिळाला.

सागर शहा आघाडीवर
मुंबई, ४ ऑगस्ट/ क्री. प्र.

मुंबई बुद्धिबळ संघटना आणि रोहिणी खाडीलकर चेस ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईच्या सागर शहाने वसईच्या वेस्लीला ३९ चालीत नमवून सहाव्या फेरीअखेर सहा गुणांसह आघाडी कायम राखली. औरंगाबादचा अर्जुन तिवारी, जळगावचा अतुल डहाळे, पार्ले टिळकची सुप्रिया जोशी यांनीही आपापल्या लढती जिंकल्या व संयुक्तपणे दुसरे स्थान मिळविले. इतर लढतीत मेघन गुप्ते, मिथिल आजगावकर, लेख मिठावाला, शिवा पिल्लई यांनीही विजय मिळविले.

विश्व अजिंक्यपदासाठी सायनाचा सराव सुरू
नवी दिल्ली, ४ ऑगस्ट/ पीटीआय

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने विश्व अजिंक्यपदासाठीच्या सरावाला प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद येथील अकादमीमध्ये सुरूवात केली आहे. काही दिवसांपर्वी सायनाला कांजण्या झाला होत्या. त्यामुळे आलेल्या थकव्यामुळे सायनाच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आजारातून मी बऱ्यापैकी सावरलेली असून या संदर्भात मी डॉक्टरांचा सल्लासुद्धा घेतला आहे. त्यांनी मला सांगतले की, जर तुला थकवा जाणवत नसेल तर तू सराव करू शकते आणि सध्या थकवा जाणवत नसल्याने मी सराव सुरू केला आहे. सरावाला सुरूवात केल्याने माझा उत्साह वाढलेला आहे. सरावामध्येआज मी काही सामन्यांमध्येही सहभाग घेतला होता त्यामुळे मला थोडेसे हायसे वाटत आहे, असे सायनाने सांगितले.

बुद्धिबळ: पोन कृत्तिकाला आघाडी
नवी दिल्ली, ४ ऑगस्ट/ पीटीआय

तामिळनाडूची उदयोन्मुख खेळाडू पोन कृत्तिका हिने १८ वर्षांखालील गटाच्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत आज तिसऱ्या फेरीअखेर आघाडी मिळविली. तिचे तीन गुण झाले आहेत.या स्पर्धेतील खुल्या गटात पी.श्याम निखिल याने मंगोलियाच्या उल्झिबयार याच्यावर मात करीत ग्रॅंडमास्टर सालेम सालेहा याच्या साथीत संयुक्त आघाडी मिळविली आहे. सालेम याने भारताच्या देवाशिष दासला पराभूत केले.१० वर्षांखालील गटाचा माजी विश्वविजेता खेळाडू गिरीश कौशिक हा आजच्या फेरीस अनुपस्थित होता.त्याची ही अनुपस्थिती सर्वाना आश्चर्याचा धक्का देणारी होती. आठ वर्षांखालील मुलींच्या गटात दिल्लीच्या पाल्किन कौर हिने अर्पिता मुखर्जीवर सनसनाटी विजय नोंदविला. तिने तिसऱ्या फेरीअखेर तीन गुणांसह आघाडी मिळविली आहे.

रत्नागिरी कॅरम असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रदीप भाटकर

मुंबई, ४ ऑगस्ट/ क्री. प्र.
रत्नागिरी कॅरम असोसिएशनची वार्षिक बैठक नुकतीच पार पडली असून या बैठकीत २००९ ते २०१२ या कालावधीसाठी प्रदीप भाटकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सुरेंद्र देसाई, सचिवपदी विनय गांगण आणि खजिनदारपदी नितीन लिमये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीला अन्ना रेडीजही उपस्थित होते. या नवनिर्वाचित कार्यकारणीने जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान केले आहे. तर आगामी कॅरम अजिंक्यपद स्पर्धा भरविण्याचाही कार्यकारणीचा मानस आहे.