Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

आता हमरस्त्यावर टपऱ्यांचे बस्तान

 

ठाणे/प्रतिनिधी : शहरातील अनधिकृत बांधकामे आणि होर्डिंग्ज हटविण्याबाबत पालिकेची कारवाई सुरू असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा उठवीत ठाण्यात राजरोसपणे टपऱ्या उभारण्याचे काम सुरू झाले आहे. हिरानंदानी मेडोजसमोर तर रस्त्यावरच टपऱ्या उभारल्या जात असून, त्याकडे पालिकेचे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या भागातील रहिवाशांनी केला.
हिरानंदानी मेडोज येथे सध्या महापालिकेतर्फे भव्य नाटय़संकुल उभारले जात आहे. या संकुलाचे काम पाहण्यासाठी स्वत: पालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे, महापौर स्मिता इंदुलकर यांच्यासह पालिकेतील अधिकारी आणि पदाधिकारी वारंवार येतात, मात्र या मेडोजसमोर थेट रस्त्यावरच टपऱ्या उभारल्या जात आहेत. त्याकडे या अधिकाऱ्यांचे लक्ष कसे जात नाही? या ठिकाणी प्रथम काठय़ा बांधून झोपडीप्रमाणे जागा निश्चित केली जाते. नंतर त्याच ठिकाणी भगवा रंग लावलेल्या तयार टपऱ्या रातोरात ठेवल्या जातात. अशाप्रकारे आतापर्यंत १५ ते २० टपऱ्या लागल्या असून, हे काम आजही चालू आहे. मात्र ते पाहूनही पालिका अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या विभागातील रहिवाशांनी केला. या टपऱ्यांवर वेळीच कारवाई झाली नाही, तर त्या संपूर्ण रस्ता व्यापून टाकतील आणि नागरिकांना तसेच वाहनांना रस्त्यांवरून जाणे अडचणीचे होईल, याकडेही रहिवाशांनी लक्ष वेधले.