Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

होर्डिग्जविरोधात पालिका आक्रमक

 

ठाणे/प्रतिनिधी : शहरातील अनधिकृत होर्डिग्जवर कारवाई करण्यास कुचराई केल्याचा ठपका ठेवून उच्च न्यायालयाने पालिका आयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांना दंड ठोठावल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या पालिका प्रशासनाने शहरातील होर्डिग्ज हटविण्याची मोहीम जोमाने सुरू केली आहे. मात्र या कारवाईत राजकीय हस्तक्षेप होत असल्याने, त्रस्त झालेल्या प्रशासनाने आता कारवाईत अडथळा आणणाऱ्या लोकप्रतिनिधींनाच थेट न्यायालयात एक्सपोज करण्याचा निर्णय घेतला आहे.
संपूर्ण शहराला अनधिकृत होर्डिग्जचा विळखा पडला असून, न्यायालयानेही पालिकेच्या बेजबाबदारपणाबद्दल प्रशासनाला हटकले आहे. आयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्याबरोबरच पुढील सुनावणीपूर्वी शहरातील होर्डिग्ज हटली नाहीत, तर १० पट दंड करण्याचा इशाराही उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या दणक्यानंतर सगळीकडेच पालिका प्रशासनाची छी-थू होत आहे. उशिरा का होईना पालिका प्रशासनाने आता होर्डिग्जविरोधात आता आक्रमक भूमिका घेतली असून, गेल्या दोन दिवसांत मोठय़ा प्रमाणात शहरातील होर्डिग्ज हटविण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांनी सर्व होर्डिग्ज काढून घ्यावीत, असे आदेश दिले आहेत. मात्र त्यानंतरही शहरात अजून होर्डिग्ज असून, पालिकेने आता सरसकट सर्व होर्डिग्ज काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईदरम्यान नगरसेवक आणि राजकीय पक्षांकडून अनेकदा अडथळे आणले जात असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, तसेच कारवाईचे चित्रीकरण करा. यावेळी कोणीही लोकप्रतिनिधी
कारवाईत अडथळा आणत असेल तर त्याचे चित्रीकरण करून, पुढील सुनावणीच्या वेळी थेट न्यायालयात सादर करा, असे आदेशच आयुक्त जंत्रे यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत. गेल्या दोन दिवसांत विविध राजकीय पक्षांच्या होर्डिग्जबाबत ३५ ते ४० गुन्हे दाखल करण्यात आले असले, तरी अद्याप एकाही राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल करण्याचे धारिष्टय़ प्रशासनाने दाखविलेले नाही.
दुसरीकडे पालिकेने होर्डिग काढल्यानंतर लगेच त्या ठिकाणी दुसरे होर्डिग लावले जात असल्याने, पालिकेची ही कारवाईसुद्धा दिखावू असल्याची टीका नागरिक करीत आहेत.