Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

तापी पतपेढीने गुंतवणूकदारांना दिला कोटय़वधींचा मनस्ताप!
ठाणे/प्रतिनिधी

 

जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे मुख्य कार्यालय असणाऱ्या तापी सहकारी पतपेढीने कोटय़वधी रुपयांच्या मुदतठेवी देण्याबाबत टाळाटाळ करून गुंतवणूकदारांना प्रचंड मन:स्ताप दिला आहे. २००७ च्या वार्षिक अहवालात १८९ कोटींच्या ठेवी, १२३ कोटींचे कर्जवाटप आणि फक्त पाच टक्के एनपीए (नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट) अशा उत्तम स्थितीत असलेल्या पतपेढीत महाराष्ट्रातील शेकडो गुंतवणूकदारांनी मोठय़ा विश्वासाने कोटय़वधी रुपये गुंतविले असून, आता मुदत संपली तरी पैसे परत करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.
२००४ मध्ये महाराष्ट्रात तापी सहकारी पतपेढीच्या एकूण ७१ नवीन शाखा सुरू झाल्या. त्यातील २६ शाखा ठाणे जिल्ह्यात होत्या. लेखापरीक्षकांनी या पतपेढीला ‘अ’ वर्ग ऑडिट दिले होते. गुंतवणूकदारांचा विश्वास बसण्यास या सर्व गोष्टी कारणीभूत ठरल्या. त्यामुळे आता दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असणाऱ्या या पतपेढीच्या विस्तारीकरणास मंजुरी देणाऱ्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ठाणे जिल्ह्यातील तापीग्रस्त गुंतवणूकदारांनी सहकार आयुक्तांना पाठविलेल्या एका संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे.
२००७ मध्ये १५ जुलै ते १५ ऑगस्ट या काळात या पतपेढीने निधी संकलन महिना साजरा केला. त्यावेळी कागदोपत्री या पतपेढीची स्थिती उत्तम असल्याने अनेक गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात यात रक्कम गुंतवली. त्यात सेवानिवृत्तीधारकांची संख्या मोठी आहे. स्वेच्छानिवृत्ती अथवा सेवानिवृत्तीनंतर अनेकांना गुंतवणुकीवरील व्याज हेच उत्पन्नाचे साधन असते. बँकांपेक्षा जरा जास्त व्याज मिळेल, या आशेने गुंतवणूकदार पतपेढय़ांमध्ये पैसे ठेवतात. याच विश्वासाने अनेकांनी तापीमध्ये रक्कम गुंतवली. आता काही गुंतवणूकदारांना तापीच्या कार्यालयातून पैशाच्या बदल्यात जळगाव जिल्ह्यात जमीन घ्यावी, असा पर्याय सुचविण्यात आला. मात्र एकदा फसलेले गुंतवणूकदार पुन्हा एकदा तापीच्या भुलथापांना भुलण्याच्या मन:स्थितीत नाही. तापीच्या महाराष्ट्रातील सर्व मालमत्ता जप्त करून संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून न्याय द्यावा, अशी विनंती तापीग्रस्तांनी केली आहे.