Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

महागाईविरोधी आंदोलनाने केली नागरिकांची कुचंबणा

 

डोंबिवली/प्रतिनिधी : जनतेला दाखविण्यासाठी शिवसेना डोंबिवली शाखेने रविवारी महागाईच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले. यामुळे महागाईला विरोध करण्यापेक्षा रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्याने सुट्टीच्या दिवशी बाजारहाट करण्यासाठी आलेल्या नागरिकांची कुचंबणा झाली. त्यामुळे जनतेची सहानुभूती घेण्याऐवजी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविषयी संतापाची भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. ठिय्या आंदोलनाचे ठिकाण बाजीप्रभू चौक असताना इंदिरा चौकातील रस्ते आंदोलनकर्त्यांनी बंद केले. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात येणारी सर्व वाहने टिळकरोड, मानपाडा, फडके रोड, परिसरात अडकून पडली.
रविवार त्यात श्रावण असल्याने नागरिक गावठी भाजी, केळीची पाने खरेदी करण्यासाठी चिमणीगल्ली, फडके रोड परिसरात येतात. रविवारी नागरिक मोठय़ा प्रमाणात घरी असतात, त्यांना दाखविण्यासाठी हा देखावा उभा करण्यात आल्याची चर्चा गाडीत अडकलेल्या, पादचाऱ्यांकडून ऐकण्यास मिळत होती. संपर्कनेते एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसैनिक पुंडलिक म्हात्रे, शहरप्रमुख शरद गंभीरराव यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. शिवसेनेचे डोंबिवलीत देखाव्याचेच उपक्रम सुरू आहेत, असे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडून खासगीत बोलले जात आहे.
याउलट शिवसैनिकांनी महागाईला विरोध म्हणून स्वस्त दराने धान्याची विक्री केली असती तर डोंबिवलीकरांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले असते. ६ ऑक्टोबर १९९२ रोजी डोंबिवलीत शिवसेनाप्रमुखांच्या उपस्थितीत शिवसेना मध्यवर्ती शाखेजवळ स्वस्त दराने धान्य विकण्यात आले होते.
शिवसैनिकांनी जीवाचे रान करून धान्य जमा केले होते. स्व. आनंद दिघे यांनी शेकडो लिटर गोडेतेल या धान्य विक्री केंद्रासाठी उपलब्ध करून दिले होते. अशा प्रकारे हजारो डोंबिवलीकरांची सहानुभूती शिवसेनेने त्यावेळी मिळवली होती. आताच्या देखाव्याने फक्त विधानसभा निवडणुकीची तयारी दिसून आली, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ शिवसैनिकांनी बोलून दाखविली.