Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

प्रदूषणाच्या अजगरी विळख्यात कल्याण-डोंबिवली
भगवान मंडलिक

 

कल्याण -कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील वायुप्रदूषण वाहनांची वाढती संख्या, कंपन्यांमधून सोडण्यात येणारे वायू आणि नाल्यांमधून वाहत जाणाऱ्या रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे दरवर्षी वाढत आहे. मागील चार वर्षांमध्ये वायुप्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे, असे कल्याण-डोंबिवली पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालात म्हटले आहे.
हवेत तरंगणारे दहा मायक्रॉनपेक्षा कमी असलेले धुलिकणांचे प्रमाण वाढत आहे. हे धुलिकण आरोग्याला अपायकारक असून त्यामुळे श्वसनविकार, अस्थमा, किडनी आजार, मेंदू, टीबीसारखे रोग आदी रोगांना आमंत्रण मिळत आहे. डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकात या प्रदूषित धुलिकणांचे प्रमाण वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे. शहाड परिसरात तीन मोठय़ा कंपन्या आहेत. या कंपन्यांमुळे या भागात प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. कल्याण, डोंबिवली औद्योगिक भागातील शहाड जकात नाका, खंबाळपाडा जकात नाका येथील सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड व धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या चार वर्षांपेक्षा या वर्षी या वायुप्रदूषणात वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
मार्च २००९ पर्यंत कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयात ३ लाख ४७ हजार ३४० वाहनांच्या नोंदी झाल्या आहेत. या भागात एकूण ३१ हजारहून अधिक रिक्षा आहेत. त्यामध्ये कल्याण-डोंबिवली परिसरात सुमारे सात हजार रिक्षा आहेत. स्कूटर २ लाख ३५ हजार, कार २७ हजार ८५४, मोटार सायकल १ लाख ४६ हजार आहेत. यामधील सुमारे दोन ते सव्वा दोन लाख वाहने कल्याण परिसरात दररोज धावतात. वाढत्या वाहनांमुळे हवेत कार्बनडाय ऑक्साईड, कार्बन मोनाक्साईड, हायड्रोकार्बन, व्होलाटाईल ऑरगॅनिक कंपाऊंडसारखे विषारी वायू हवेत सोडले जातात. त्यामुळे शहर परिसरातील नागरिकांना डोकेदुखी, अस्थमा, मानवी मज्जातंतूसारखे रोग होत आहेत.
कल्याणमधील एस. टी. आगाराजवळ ध्वनिप्रदूषणाची पातळी ७५ डेसिबल(अ), कल्याण पूर्वमधील अशोकनगर, दुर्गानगर, कल्याण पश्चिमेतील मिलिंदनगर, अहिल्याबाई चौक, जोशीबाग, डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस स्टेशनजवळ ७४.३ (अ), मानपाडा चार रस्ता, शिवमार्केट, गांधीनगर, रघुवीरनगर या ठिकाणी ध्वनिप्रदूषण मोठय़ा प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे.
पालिकेच्या १०७ प्रभागांमधील विविध ठिकाणचे पाणी तपासले असता तेथील पाणी रासायनिकदृष्टय़ा व जैविकदृष्टय़ा पिण्यास योग्य नसल्याचे अहवालात म्हटले आहे. यामुळे नागरिकांना हगवण, गॅस्ट्रोसारख्या आजारांना बळी पडावे लागते. गेल्या वर्षभरात पालिका हद्दीत गॅस्ट्रोचे ५३४, हगवणीचे ३ हजार ५३५, कावीळ ५८५, डिसेंट्री ३८५, विषमज्वराचे १ हजार २१३ रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे कल्याण- डोंबिवली भागातील भूपृष्ठीय पातळी कमी होत चालली आहे. सांडपाणी मोठय़ा प्रमाणात नदी, नाल्यांमध्ये सोडले जात असल्याने या भूपृष्ठीय पाण्याची गुणवत्ता ढासळली आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडची कचरा साठविण्याची क्षमता संपल्याने त्याच ठिकाणी कचरा टाकून नवीन रोगांना आमंत्रण दिले जात आहे. वायू, जलप्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती करणे, नागरिकांसह सर्व यंत्रणांनी या प्रक्रियेत एकत्र यावे असे परंपरेप्रमाणेच घोषवाक्य पर्यावरण अहवालात देऊन वार्षिक प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे.
या वर्षीचा अहवाल पालिकेनेच तयार केला असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी अहवाल एकाच एजन्सीला का देण्यात येतो म्हणून महासभेत गोंधळ घातला जायाचा, यावेळी त्याच्यावर पडदा पडणार असल्याचे दिसते. पालिका हद्दीत वाहतूक विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वन विभाग, सीईटीपीचे अधिकारी सक्रिय आहेत. तरीही पालिका प्रशासनाला महिन्यातून एक वेळ या अधिकाऱ्यांना एका व्यासपीठावर आणून शहराच्या आरोग्याविषयी विचार करावासा वाटत नसल्याचे दिसते.