Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

संस्कृती प्रतिष्ठानचा मराठमोळा सांस्कृतिक दहीकाला
ठाणे / प्रतिनिधी

 

नऊ थर लागल्याचा विश्वविक्रम झालेल्या वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीकाला महोत्सवात यंदाही मनोरंजक कार्यक्रमांची रेलचेल आहे. मराठी संस्कृतीचे जतन करणारे कार्यक्रम दहीकालाच्या दिवशी येथे आयोजित केले जातात. यंदा संस्कृती प्रतिष्ठानतर्फे मराठी कलाकार, गायकांची मांदियाळी वर्तकनगर येथे दिवसभर जमणार असल्याची माहिती संस्कृती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
१४ ऑगस्ट रोजी वर्तकनगर येथील पालिका शाळा क्र. ४४ च्या मैदानात संस्कृती प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी बांधण्यात येणार आहे. याच मैदानात सकाळी १० ते रात्रो १० वाजेपर्यंत विविधरंगी करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पुष्कर श्रोत्री, अतुल परचुरे, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर, अंकुश चौधरी, सुमीत राघवन, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, मेघना एरंडे असे मराठी नाटय़ चित्रपट कलाकार या दहीकाला उत्सवात सहभागी होत आहेत. त्यांचा सहभाग म्हणजे केवळ हजेरी नसून महोत्सवात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात भागही ते घेणार आहेत. सुरेश वाडकर यांच्यासारखे ज्येष्ठ गायक पहिल्यांदाच अनेक वर्षांनी दहीकाल्याच्या आनंदात सहभागी होत असून ठाणेकर रसिकांसमोर ते अनेक गाजलेली गाणी गाणार आहेत.
वाडकर यांना गुरू स्थानी मानणारे अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर यांसारखे नव्या दमाचे गायकही त्यांची गाणी दहीकाला महोत्सवात गाणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांची मजा लुटताना दहीहंडी फोडण्याचा थरारही रसिकांना अनुभवता येणार आहे.