Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

स्वातंत्र्यदिनी वृद्ध वकिलाचा पत्नीसह मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा

 

शहापूर/वार्ताहर : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील एका ७४ वर्षीय वकिलाने गावात व्यसनमुक्ती प्रसार, दारूबंदी, महिला बचतगट, वाचनालये आदी समाजोपयोगी कामे केली म्हणून गावगुंडांनी त्यांच्या घराचीच मोडतोड करून गावातून हुसकावून लावले. याबाबत पोलिसांनीदेखील मदतीचा हात देण्याऐवजी वृद्ध वकिलाची परवड केली. सध्या वासिंद येथे नातेवाईकांकडे राहात असलेल्या या वृद्ध वकिलास न्याय मिळत नसल्याने व्यथित होऊन त्याने स्वातंत्र्यदिनी पत्नीसह आत्मदहन करण्याचा इशारा सरकारला दिला आहे.
अ‍ॅड. महादू मोरे असे या वकिलाचे नाव आहे. गावगुंडांच्या त्रासामुळे त्यांनी वासिंद येथे आसरा घेतला आहे.
अन्यायग्रस्त दलित, शेतकरी, नोकरदारांची वकिली करीत न्यायालयीन प्रक्रियेसाठी अ‍ॅड. मोरे सक्रिय होते. अनुसूचित जाती-जमाती कायदा केसेसच्या अंमलबजावणीमुळे चाळीसगावातील पोलीस त्यांच्यावर वैतागले होते. याबाबत त्यांना प्रलोभने दाखविली गेली, मात्र त्याला भुलून न जाता ते अन्यायाविरुद्ध लढले. त्यामुळे चाळीसगाव पोलिसांनी गावगुंडांशी संगनमत करून खोटेनाटे आरोप करून आपणास मारहाण करून घराची मोडतोड केली, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
एकीकडे पोलिसांचा व गावगुंडांचा ससेमिरा, आर्थिक चणचण, राहण्यास घर नाही, त्यामुळे व्यथित झालेल्या अ‍ॅड. मोरे यांनी पत्नीसह आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या १५ ऑगस्ट रोजी त्यांनी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देताच शहापूर पोलिसांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे अ‍ॅड. मोरे यांना आत्मदहन हा दखलपात्र गुन्हा असल्याची नोटीस बजावली आहे.