Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

१५ दिवसांत महागाईवर नियंत्रण

 

ठाणे/प्रतिनिधी: राज्यात जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडत असले तरी लोकशाही आघाडी शासन सजग असून, महागाई हाताबाहेर जाऊ देणार नाही. वाढती महागाई रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली असून, येत्या १५ दिवसांत त्यावर नियंत्रण येईल, असा दावा प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी आज ठाण्यात केला.
राज्यात सगळीकडे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत असल्याने सामान्य जनता हवालदिल झाली आहे. वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेने राज्यभर आंदोलन छेडले आहे. या पाश्र्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना दलवाई म्हणाले की, महागाई काय एकाएकी उसळलेली नाही, तरीही जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत असून, ते वेळीच नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. राज्य आणि केंद्र सरकार सामान्य जनतेचे असून, जनभावनेबाबत सरकार नेहमीच सजग राहिले आहे. तुरडाळ, साखर याचबरोबर कडधान्यांची दरवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांची आयात करण्याबाबत राज्य सरकारने पावले उचलली आहेत. स्वत: मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घातले असून, येत्या १५ दिवसांत महागाईवर नियंत्रण येईल. सरकार कोणत्याही परिस्थितीत महागाई हाताबाहेर जाऊ देणार नाही, असा दावा दलवाई यांनी केला.