Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘शिक्षण क्षेत्रातील मुलींची गळती चिंताजनक’
ठाणे/प्रतिनिधी

 

माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात सोयी-सुविधांची कमतरता आणि शिक्षणाबद्दलची अनास्था यामुळे मागासवर्गीय मुलींची शिक्षणातून होणारी गळती हा चिंतेचा विषय आहे.
ही गळती रोखण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून आणखी ठोस उपाययोजना करू, असे प्रतिपादन मुकंद बिझनेस स्ट्रॅटेजीचे मुख्य अधिकारी अरविंद कुलकर्णी यांनी केले.
मुकंदचे चेअरमन निरज बजाज आणि व व्यवस्थापकीय संचालक राजेश शहा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील आदिवासीबहुल ६० शाळांमधील आठवी ते दहावीत शिकणाऱ्या अनुसूचित जाती व जमातीमधील विद्यार्थिनींना मोफत शालेय गणवेश वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत जव्हार येथील भारती विद्यापीठ प्रशाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात कुलकर्णी बोलत होते. या कार्यक्रमात जव्हार, मोखाडा या आदिवासी भागांमधील ६९२ विद्यार्थिनींना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अधिकारी मदन इंगळे, दिलीप रायकर, मुख्याध्यापक खंडागळे व्यासपीठावर उपस्थित होते.
तीन टप्प्यांत पार पडणाऱ्या या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात शहापूर व मुरबाड परिसरातील १५७५ विद्यार्थिनींना गणवेश वाटण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात वाडा, डहाणू, विक्रमगड तालुक्यांमधील विद्यार्थिनींना गणवेश देण्यात येणार आहेत.