Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

शासनाचे कृत्य; शिक्षकांना शिक्षा
आमदारांनी केला निषेध
वाडा/वार्ताहर

 

मेंढवण आश्रमशाळेच्या इमारतींची दुरवस्था झाल्यामुळे या इमारतीमध्ये सर्प चावून दोन विद्यार्थ्यांचा बळी जाताच प्रशासनाने येथील मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकले, ही बाब अत्यंत घृणास्पद असून सरकारच्या पापाची शिक्षा शिक्षकांना ठोठावणाऱ्या आदिवासी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तीव्र निषेध आमदार संजय केळकर व रामनाथ मोते यांनी केला आहे.
मेंढवण आश्रमशाळेच्या इमारतींची दुरवस्था गेल्या पाच वर्षांंपासून झाली आहे. मुलांना खेळायला मैदान नाही किंवा अभ्यास करण्याचे वातावरण नाही. अशा परिस्थितीतही शाळेचा निकाल नेहमीच उंचाविण्याचा प्रयत्न येथील शिक्षकांनी केला आहे. तसेच क्रीडा स्पर्धेतही येथील विद्यार्थी राज्यस्तरीय पातळीवर चमकले आहेत. ही शाळा नव्या जागेत स्थलांतरित करावी, अशी मागणी वारंवार येथील शिक्षकांनी केलेली असताना प्रशासनाने दुरवस्था झालेल्या इमारतींमध्येच वर्ग भरविण्याचे शिक्षकांना सांगितले.
शुक्रवारी पहाटे सर्प चावून दोन विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूस शिक्षक जबाबदार नसतानाही आदिवासी विभाग ठाणेचे अप्पर आयुक्त करवंदे व डहाणूच्या प्रकल्प अधिकारी के. प्रतीता यांनी या शाळेचे मुख्याध्यापक एच. जी. निकम, अधीक्षक जी. बी. वंजारी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकले आणि या अधिकाऱ्यांनी आपल्यावरची जबाबदारी झटकली आहे.