Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

१६०० किलो निकेल धातूसह चौघे गजाआड

 

ठाणे/प्रतिनिधी: नाण्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या निकेल या धातूची भिवंडीतील गोदामातून चोरी करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने काल सापळा रचून जेरबंद केले. त्यांच्याकडून २० लाख रुपये किमतीचा १६०० किलो निकेल धातू हस्तगत करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त प्रशांत बुरडे यांनी दिली.
दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या मुबारकअली मोहंमद शेख ऊर्फ टय़ुल (२३, रा. आग्रा रोड कुर्ला), फत्तेमोहंमद अमीरउल्ला चौधरी (२८ रा. बांगलादेशी चाळ, भिवंडी), फुलचंद गिरवीर चौधरी (२२, रा. भिवंडी) आणि त्यांच्याकडून चोरीचा माल विकत घेणारा व्यापारी विनोद जैन याला अटक करण्यात आली आहे. प्रमुख आरोपी मुबारकअली शेख याच्या सूरतमधील गावी पोलीस पथक धाडण्यात आले आहे.
दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.डी. शिवथरे व पथकाने भिवंडीतील नॉव्हेल्डी लॉजेस्टिक या गोदामाजवळ सापळा रचला. त्यात आरोपींना अटक करण्यात आली. त्यांनी पूर्णा येथील पूजा कॉम्प्लेक्समध्ये श्रीजी इम्पेक्स एशियन ट्रेडर्स या कंपनीच्या गोदामातून १६०० किलो वजनाचा निकेल धातू चोरल्याचे उघड झाले. कंपनी निकेल, झिंक, पोटॅश, एसएमसी झिंक अशा वेगवेगळ्या धातूंच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करते. तसेच रबालेमधील रहेजा बिल्डर्स यांच्या बांधकामाच्या गोदामातून नऊ टन लोखंडी सळ्या चोरल्याचे उघडकीस आले. या टोळीकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.