Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

आता हमरस्त्यावर टपऱ्यांचे बस्तान
ठाणे/प्रतिनिधी : शहरातील अनधिकृत बांधकामे आणि होर्डिंग्ज हटविण्याबाबत पालिकेची कारवाई सुरू असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा उठवीत ठाण्यात राजरोसपणे टपऱ्या उभारण्याचे काम सुरू झाले आहे. हिरानंदानी मेडोजसमोर तर रस्त्यावरच टपऱ्या उभारल्या जात असून, त्याकडे पालिकेचे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या भागातील रहिवाशांनी केला.

होर्डिग्जविरोधात पालिका आक्रमक
ठाणे/प्रतिनिधी : शहरातील अनधिकृत होर्डिग्जवर कारवाई करण्यास कुचराई केल्याचा ठपका ठेवून उच्च न्यायालयाने पालिका आयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांना दंड ठोठावल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या पालिका प्रशासनाने शहरातील होर्डिग्ज हटविण्याची मोहीम जोमाने सुरू केली आहे. मात्र या कारवाईत राजकीय हस्तक्षेप होत असल्याने, त्रस्त झालेल्या प्रशासनाने आता कारवाईत अडथळा आणणाऱ्या लोकप्रतिनिधींनाच थेट न्यायालयात एक्सपोज करण्याचा निर्णय घेतला आहे.

तापी पतपेढीने गुंतवणूकदारांना दिला कोटय़वधींचा मनस्ताप!
ठाणे/प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे मुख्य कार्यालय असणाऱ्या तापी सहकारी पतपेढीने कोटय़वधी रुपयांच्या मुदतठेवी देण्याबाबत टाळाटाळ करून गुंतवणूकदारांना प्रचंड मन:स्ताप दिला आहे. २००७ च्या वार्षिक अहवालात १८९ कोटींच्या ठेवी, १२३ कोटींचे कर्जवाटप आणि फक्त पाच टक्के एनपीए (नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट) अशा उत्तम स्थितीत असलेल्या पतपेढीत महाराष्ट्रातील शेकडो गुंतवणूकदारांनी मोठय़ा विश्वासाने कोटय़वधी रुपये गुंतविले असून, आता मुदत संपली तरी पैसे परत करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.

महागाईविरोधी आंदोलनाने केली नागरिकांची कुचंबणा
डोंबिवली/प्रतिनिधी : जनतेला दाखविण्यासाठी शिवसेना डोंबिवली शाखेने रविवारी महागाईच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले. यामुळे महागाईला विरोध करण्यापेक्षा रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्याने सुट्टीच्या दिवशी बाजारहाट करण्यासाठी आलेल्या नागरिकांची कुचंबणा झाली. त्यामुळे जनतेची सहानुभूती घेण्याऐवजी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविषयी संतापाची भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. ठिय्या आंदोलनाचे ठिकाण बाजीप्रभू चौक असताना इंदिरा चौकातील रस्ते आंदोलनकर्त्यांनी बंद केले.

प्रदूषणाच्या अजगरी विळख्यात कल्याण-डोंबिवली
भगवान मंडलिक

कल्याण -कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील वायुप्रदूषण वाहनांची वाढती संख्या, कंपन्यांमधून सोडण्यात येणारे वायू आणि नाल्यांमधून वाहत जाणाऱ्या रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे दरवर्षी वाढत आहे. मागील चार वर्षांमध्ये वायुप्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे, असे कल्याण-डोंबिवली पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालात म्हटले आहे.

शासनाचे कृत्य; शिक्षकांना शिक्षा
आमदारांनी केला निषेध
वाडा/वार्ताहर
मेंढवण आश्रमशाळेच्या इमारतींची दुरवस्था झाल्यामुळे या इमारतीमध्ये सर्प चावून दोन विद्यार्थ्यांचा बळी जाताच प्रशासनाने येथील मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकले, ही बाब अत्यंत घृणास्पद असून सरकारच्या पापाची शिक्षा शिक्षकांना ठोठावणाऱ्या आदिवासी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तीव्र निषेध आमदार संजय केळकर व रामनाथ मोते यांनी केला आहे.

राज्य टेबल टेनिस स्पर्धाना
डोंबिवलीत शुभारंभ

डोंबिवली/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धा सोमवारपासून डोंबिवलीतील यश जिमखान्यात सुरू झाल्या. ८ ऑगस्टपर्यंत या स्पर्धा सुरू राहणार आहेत. नगरसेवक रवींद्र चव्हाण, ठाणे जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि यश जिमखानातर्फे आयोजित या स्पर्धेत २० आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग आहे. सोमवारी सकाळी नगरसेवक रवींद्र चव्हाण, राजू वडनेरकर, शिरीष बेणारे, दिलीप वडनेरकर, यतीन टिपणीस, सचिन चिटणीस, आनंद डिचोलकर, संजय कुडाळकर यांच्या उपस्थितीत या स्पर्धाचा शुभारंभ झाला. डोंबिवलीची क्रीडा संस्कृती जपण्यासाठी यश जिमखान्याने आयोजनासाठी पुढाकार घेतला असल्याचे राजू वडनेरकर यांनी सांगितले. महाराष्ट्रात चार मानांकन स्पर्धा खेळविण्यात येत आहेत. या स्पर्धेस राष्ट्रीय स्पर्धेचा दर्जा असल्याने आपण या कामी पुढाकार घेतला असे, रवींद्र चव्हाण म्हणाले.

कुणबी सेनेचा ११ ऑगस्टला रास्ता रोको
ठाणे/प्रतिनिधी : विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ठाणे जिल्ह्यातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच वासिंद येथे पार पडला. कुणबी सेना अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी मार्गदर्शन केले.ठाणे हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. महामार्ग, गॅस लाइन, पॉवरग्रीड, तारापूर अणुऊर्जा केंद्र, रेल्वे, वीज मंडळाचे मोठे टॉवर्स अशा विविध प्रकल्पांमुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, परंतु त्यांना तुटपुंजा मोबदला देऊन त्यांची कायमस्वरूपी रोजीरोटी हिरावली गेली. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रित लढा उभारण्याचे आवाहन पाटील यांनी केले. प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याचे आदेश न्यायालयाने देऊनही त्यानुसार कार्यवाही होत नाही. ऊर्जामंत्री सुनील तटकरे व पालकमंत्री गणेश नाईक येत्या ११ ऑगस्ट रोजी चोंढे प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी येतील त्यावेळी ठिकठिकाणी रास्तारोको करण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला.