Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

रोज धमकावे त्याला कोण घाबरे!
वॉशिंग्टन, ४ ऑगस्ट/पी.टी.आय.

 

जगातील सर्वात शक्तिवान देशाचा प्रमुख आणि सगळ्यात कडेकोट सुरक्षेत राहणारा राष्ट्रप्रमुख अशी बिरुदावली अमेरिकेचा अध्यक्ष मिरवित असतो. विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा हे सुद्धा त्याला अपवाद नाहीत. परंतु पहिले ‘आफ्रो-अमेरिकी’ अध्यक्ष बनण्याचे भाग्य लाभलेल्या ओबामा यांचे सिंहासन वाटते तेवढे सुखावह नाही. उलटपक्षी त्यात काटेच जास्त असावेत अशी रास्त शंका घेता येऊ शकते. ओबामा यांना ठार मारण्याच्या दररोज सरासरी ३० धमक्या येत असतात, अशी माहिती पुढे आली आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षाला जिवे मारण्याच्या धमक्या येणे यात नवीन काहीच नाही. परंतु ओबामांना येणाऱ्या धमक्यांचे प्रमाण अचानकच प्रचंड वाढले आहे. जॉर्ज बुश यांच्या काळात त्यांना येणाऱ्या धमक्यांची संख्या वर्षांला साधारणपणे ३००० असे. म्हणजे दिवसाला १० पेक्षा कमी धमक्या येत. २० जानेवारी रोजी पद ग्रहण केलेल्या ओबामांना येणाऱ्या धमक्या तब्बल ४०० टक्क्यांहून अधिक आहेत, असे निरीक्षण ‘इन द प्रेसिडेंट्स सिक्रेट सव्‍‌र्हिस’ या पुस्तकाचे लेखक रोनाल्ड केसलर यांनी नोंदविले आहे.
अध्यक्षांना येणाऱ्या बहुतांश धमक्यांची वाच्यता केली जात नाही. त्यांना प्रसिद्धी मिळाली तर त्यापासून प्रेरणा घेऊन धमक्यांचे प्रमाण आणखीनच वाढेल, अशी भीती संबंधितांना वाटते. ओबामा यांनी निवडणुकीत विजय मिळविल्यापासूनच त्यांना धमक्या येऊ लागल्या आहेत. टेनेसी राज्यातील गोऱ्या अतिरेक्यांनी या पहिल्या ‘कृष्णवर्णीय’ अध्यक्षाला संपविण्याची धमकी दिली होती. परिणामी वॉशिंग्टनमध्ये ओबामांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा ‘न भूतो’ असा बंदोबस्त ठेवला गेला होता. तब्बल ४० हजार सुरक्षारक्षक आणि ९४ संस्थांकडे या सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. ओबामांना येणाऱ्या धमक्यांमुळे इंटरनेटवर ‘असॅसिनेट ओबामा’ हा सर्च अतिशय लोकप्रिय झाला आहे.
मात्र एवढय़ा धमक्या येऊनही अध्यक्षांच्या सुरक्षेतील ढिलाई असतेच, असे मत रोनाल्ड केसलर यांनी नोंदविले आहे. ओबामा यांच्या शपथविधीच्या वेळेस त्यांच्या प्रचार मोहिमेला भरभक्कम देणग्या दिलेल्या १०० हून अधिक ‘व्हीआयपीं’ना त्यांची मेटल डिटेक्टर तपासणी न करताच कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या बसमध्ये प्रवेश दिला गेला होता.
अर्थात रोज ढिगाने येणाऱ्या धमक्यांमधील बहुतांशी धमक्या या पोकळच असतात. परंतु सुरक्षा रक्षकांना प्रत्येक धमकीचा काटेकोर तपास करावा लागतोच. या सगळ्यात सुरक्षा यंत्रणांची प्रचंड तारांबळ उडते.
कामाचा अपरिमित बोजा आणि तुटपुंजी साधने या कचाटय़ात या यंत्रणा सापडल्या आहेत. नवीन कर्मचारी घेण्याऐवजी आहे त्याच कर्मचाऱ्यांना अधिक वेळ काम करण्यास सांगितले जाते. एका सुरक्षा तज्ज्ञाचा तर असा दावा आहे की अध्यक्षांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाच्या अवघे निम्मे मनुष्यबळ आज उपलब्ध आहे.