Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

‘राखीचे स्वयंवर’ पाकिस्तानमध्येही लोकप्रिय
इस्लामाबाद, ४ ऑगस्ट/पी.टी.आय.

 

बॉलीवूडमधील ‘आयटम गर्ल’ राखी सावंत हिच्या टीव्ही रिअ‍ॅलिटी शोमधील ‘स्वयंवरा’ची बातमी भारताप्रमाणेच पाकिस्तानी माध्यमांमध्येही आघाडीवर होती. पाकिस्तानातील सर्व इंग्रजी आणि उर्दू वृत्त माध्यमांनी तिच्या स्वयंवराच्या बातम्यांना प्राधान्य दिले होते.
‘एनडीटीव्ही इमॅजिन’ वर रविवारी झालेल्या या अनोख्या ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये कॅनडास्थित उद्योगपती इलेश पारुजनवाला याची निवड राखीने केली. ‘राखीने जीवनसाथी चुन लिया’ या शीर्षकाने एका उर्दू वृत्तपत्राची मुख्य बातमी सोमवारी सजली होती. त्याचप्रमाणे बहुतांश वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांवरही राखीच्या लग्नाची बातमी लोकप्रिय झाली होती. कार्यक्रमाची अंतिम फेरी संपल्यानंतर काहीच क्षणात ‘पाक मेहफिल’ आणि ‘ई-झाईन पाक टी हाऊस’ या सर्वाधिक वाचकसंख्या असलेल्या संकेतस्थळांवर ही बातमी झळकली होती.
‘बॉलीवूड, रिअ‍ॅलिटी टीव्ही अ‍ॅण्ड इंडियन सेक्यूलरिझम’ या शीर्षकाने राखी सावंतच्या स्वयंवरावर मत व्यक्त करणारा लेख ‘ई-झाईन पाक टी हाऊस’वर देण्यात आला होता. त्यात शिक्षण आणि उत्तम कौटुंबिक पाश्र्वभूमी नसतानाही राखी सावंतने आपल्या मेहनतीने बॉलीवूडमध्ये ‘स्टारपद’ कसे प्राप्त केले यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘पाक मेहफिल डॉट कॉम’ने म्हटले आहे की, गुजराथी अनिवासी भारतीय असलेला इलेश पारुजनवाला टेलिव्हिजनची सम्राज्ञी बनलेल्या राखी सावंतशी लग्न करण्यासाठी टोरंटोहून भारतात आला. तो या रिअ‍ॅलिटी शोमधील सर्वात शांत आणि सर्वाधिक संवेदनक्षम स्पर्धक होता. विवाहास उत्सुक असलेल्या अंतिम तीन वरांमध्ये असलेल्या इलेश, क्षितीज आणि मानव यांच्यापैकी एकाला राखी वरणार होती. अंतिम क्षणी इलेशने सर्वावर बाजी मारत, राखीचे मन जिंकले, असे या वृत्तात म्हटले आहे. राखी आणि इलेशचा विवाह झाला, तर तो कॅनडा सोडून कायमचा मुंबईमध्ये स्थायिक होण्याचा विचार करीत आहे. राखीने आपले करिअर कधीही न सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे, एका वृत्तात म्हटले आहे.