Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

ऑस्ट्रेलियात आत्मघाती घातपाताचा कट उधळला
१९ ठिकाणी छापे, चौकडीला अटक
मेलबर्न, ४ ऑगस्ट/वृत्तसंस्था

 

ऑस्ट्रेलियात आज पहाटे एका व्यापक शोधमोहीमेत मेलबर्नच्या अनेक भागांत टाकलेल्या छाप्यांत आत्मघाती घातपाती हल्ला चढविण्याच्या तयारीत असलेल्या चौकडीला अटक झाली. तब्बल ४०० पोलिसांचा या मोहिमेत समावेश होता आणि हे चारही अतिरेकी सोमालियन वंशाचे असून त्यांचा अल काईदाशी निकटचा संबंध असल्याचा तर्क आहे. ऑस्ट्रेलियातील इतक्या व्यापक प्रमाणात प्रथमच अशी कारवाई झाली आहे.
अटक झालेले चौघे ऑस्ट्रेलियन तरुण २२ ते २४ या वयोगटातील असून ते सोमालियन व लेबनानी वंशाचे आहेत. ते अल-काईदासाठी काम करणाऱ्या अल-शबाब या सोमालियन अतिरेकी गटाचे आहेत. गेले सात महिने या चौकडीवर गुप्तचरांची पाळत होती आणि त्यानंतर सिडनीतील लष्करी तळावर हल्ला करण्याचा त्यांचा कट अंतिम टप्प्यात येताच हे छापे घातले गेले, असे ऑस्ट्रेलियन प्रांतिक पोलीस दलाचे हंगामी आयुक्त टोनी नेगस यांनी सांगितले.
पोलीस आणि सुरक्षा दलांच्या या धडक कारवाईमुळे मोठा घातपात आणि मोठी जीवितहानी टळल्याचेही ते म्हणाले. या चौघांना अटक झाली असून त्यांच्याशी संबंधित अनेकांची चौकशी सुरू आहे. तब्बल १९ ठिकाणी एकाचवेळी हे छापे टाकले गेले. या तरुणांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. सोमालियात जाऊन तेथील चकमकीतही हे तरुण सामील झाल्याचेही उघड झाले आहे. ऑस्ट्रेलियात घातपात घडविण्यासाठी त्यांनी जिहाद पुकारणारा फतवाही जारी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियाला दहशतवादी धोका कायम असल्याचीच ही इशाराघंटा आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान केविन रुड यांनी या कारवाईच्या पाश्र्वभूमीवर व्यक्त केली आहे. अटक झालेल्या तरुणांचा गट छोटा असला तरी समाजात तेढ वाढविण्याचे काम असे गटच प्रभावीपणे करू शकतात. त्यामुळेच घातपाताचे तुलनेत किरकोळ भासणारे प्रयत्नही रोखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे रुड यांनी स्पष्ट केले.
व्हिक्टोरियातील सोमालियन समाजाचे प्रवक्ते अब्दुर्रहमान उस्मान यांनी स्थानिक नभोवाणीला मुलाखत देताना सांगितले की, अल-शबाबच्या कारवायांमुळे ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढल्याचे मी गेल्या तीन वर्षांत दहावेळा प्रशासनाच्या कानी घातले आहे. मेलबोर्न येथील सोमाली वंशाचे नागरिक हसन यांनी मात्र या चौघांना आपण ओळखत असून त्यांचा दहशतवादाशी दूरान्वयानेही संबंध नसल्याचा दावा केला आहे.
अमेरिकेने एप्रिलमध्येच आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांत अल-शबाबचा समावेश केला आहे. १९९८ मध्ये केनिया आणि टांझानियातील अमेरिकन दूतावासात झालेल्या बॉम्बहल्ल्यांतील अल-काईदाच्या अतिरेक्यांना हा गट साह्य करीत असल्याचेही अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.