Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

पवार, लालू, नारळ आणि धार्मिकता!
नवी दिल्ली, ४ ऑगस्ट/ पी.टी.आय.

 

‘लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे पानिपत झाल्यानंतर लालूप्रसाद यादव हे अधिक धार्मिक वृत्तीचे होऊ लागल्यासारखे वाटतेय’. हे निरीक्षण आहे कृषीमंत्री शरद पवार यांचे. लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पवार आणि लालूप्रसाद यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्याने सभागृहात बराच वेळ हास्याची खसखस पिकली. विषय होता नारळ, त्याचे उत्पादन आणि धार्मिक महत्त्व.
बिहारसह संपूर्ण देशभर धार्मिक कार्यात श्रीफळाचा उपयोग केला जातो असा संदर्भ लोकसभेत लालू प्रसाद यांनी दिल्यावर, लालू हे दिवसेंदिवस अधिकाधिक धार्मिक होत चालल्याचे शरद पवार यांनी निदर्शनास आणून दिले.
बिहारमध्ये नारळाचे भरघोस उत्पादन का होत नाही हेही लालूंना प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान जाणून घ्यायची इच्छा होती. त्या इच्छेपोटी त्यांनी कृषीमंत्र्यांना विचारणा केली खरी, तत्काळ पवारांनी ही कोपरखळी मारली. ‘लालूंमध्ये हा चांगला बदल होतोय. एकेकाळी रेल्वे खात्याचा कारभार सांभाळणारे लालूप्रसाद आता धार्मिक गोष्टींबद्दल बोलू लागले आहेत.’ पवारांच्या या उत्तरावर हास्याची लकेर उमटली. मग कृषीमंत्री म्हणाले, केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीप येथे उत्पादित होणाऱ्या नारळांची प्रत अधिक चांगली असते, जसे.. बिहारमधील मुझप्फरपूरमधील रसाळ लिची. तेथील लिचीची लज्जत इतरत्र पिकणाऱ्या लिचीपेक्षा केव्हाही न्यारीच असेल!