Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

नेपाळ सरकार उलथविण्यासाठी प्रचंड यांची तिसऱ्या क्रांतीची हाक
काठमांडू, ४ ऑगस्ट/वृत्तसंस्था

 

नेपाळ सरकार उलथून टाकण्यासाठी माओवाद्यांनी कंबर कसली असून माओवादी नेते प्रचंड यांनी तिसऱ्या क्रांतीचा नारा दिला आहे. नेपाळमध्ये ‘लोकांचेच राज्य’ नांदवावे, यासाठी सरकारला तीन दिवसांची ‘मुदत’ माओवाद्यांनी काल दिली होती आता सात ऑगस्टपासून नेपाळच्या पार्लमेंटला घेराव घालण्यासह अनेक प्रकारची आंदोलने जाहीर करण्यात आली आहेत.
माधवकुमार नेपाल यांचे सरकार बरखास्त करावे यासाठी रस्त्यापासून पार्लमेंटपर्यंत सर्व पातळ्यांवर सहा ऑगस्टपासून आंदोलन उभारण्याचा निर्णय माओवाद्यांनी जाहीर केला आहे. सात ऑगस्टपासून पार्लमेंटला घेराव घातला जाईल आणि नऊ ऑगस्टपासून सर्व जिल्हा मुख्यालयांबाहेर धरणे धरले जाईल, राष्ट्राध्यक्ष रामबरन यादव यांच्या उपस्थितीतील सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर २७ ऑगस्टपासून बहिष्कार टाकला जाईल, पाच ते १५ सप्टेंबर या कालावधीत मंत्र्यांची उपस्थिती असलेल्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला जाईल तसेच देशभर सभा घेतल्या जातील, असे माओवाद्यांनी जाहीर केले आहे.
लष्करप्रमुख रुक्मांगद कटवाल यांच्या हकालपट्टीचे पंतप्रधान प्रचंड यांचे प्रयत्न राष्ट्राध्यक्ष यादव यांनी रोखल्यानंतर मे महिन्यात प्रचंड यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सत्तेवर आपलीच पकड राहावी यासाठी माओवाद्यांनी सरकारविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.
‘युनायटेड कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-माओइस्ट’ या पक्षाने लष्करप्रमुखपदी रुक्मांगद कटवाल यांनाच कायम ठेवण्याचा राष्ट्रपतींचा निर्णय हा घटनेची पायमल्ली करणारा व लोकशाहीविरोधी असल्याचे काल जाहीर केले आहे. राष्ट्राध्यक्षांच्या या निर्णयाचे निमित्त करून माओवादी नेते प्रचंड यांनी लोकांचे राज्य पुनस्र्थापित करण्यासाठी तिसऱ्या क्रांतीची हाक दिली आहे.