Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

‘खबर लहरियाँ’ला युनेस्कोचा यंदाचा साक्षरता पुरस्कार
संयुक्त राष्ट्रे, ४ ऑगस्ट / पीटीआय

 

‘निरंतर’ या बिगरसरकारी संस्थेतर्फे उत्तर प्रदेशची ग्रामीण महिला चालवित असलेल्या ‘खबर लहरियाँ’ या हिंदी पाक्षिकाने युनेस्कोचा प्रतिष्ठेचा किंग सेजाँग साक्षरता पुरस्कार २००९ जिंकला आहे. युनेस्काने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, दक्षिण कोरिया सरकारच्या सहकार्याने १९८९ पासून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. टिन टुआ यांची साक्षरता आणि पूर्व बुर्किना फासोतील अनौपचारिक शैक्षणिक प्रकल्पांनाही गौरविण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये पॅरिस येथील युनेस्कोच्या मुख्यालयात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.
पुरस्कारांची घोषणा करताना युनेस्कोने म्हटले आहे की, ‘खबर लहरियाँ’ म्हणजे ‘बातम्यांच्या लाटा’. उत्तर प्रदेशातील निरंतर या बिगरसरकारी संस्थेतर्फे चालविले जाणारे पाक्षिक. याची निर्मिती आणि वितरण कनिष्ठ जातीतल्या महिलेकडून केले जाते. २० हजारहून अधिक नव्याने साक्षर झालेल्या महिलांमध्ये त्याचे वितरण होते. नव्याने साक्षर झालेल्या महिलांना वार्ताहर करण्याची ही शास्त्रोक्त पद्धती आहे. याचप्रमाणे माहितीचे आदान-प्रदान आणि पारदर्शक शिक्षणाची ही सोपी प्रतिकृती असल्याचे युनेस्कोने म्हटले आहे. मे २००२मध्ये ‘खबर लहरियाँ’चा प्रारंभ झाला. आठ पानांच्या या पाक्षिक वृत्तपत्राचे आज २५ हजारांहून अधिक वाचक असून, ४००हून अधिक गावांमध्ये ते वाचले जाते, असे युनेस्कोने पत्रकात नमूद केले आहे.