Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

परराष्ट्रमंत्री कृष्णा आणि हाफिज सईदच्या मुद्यावरून लोकसभेत विरोधकांचा गदारोळ
नवी दिल्ली, ४ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

 

पाकिस्तानविरुद्ध आक्रमक झालेले मुलायमसिंह यादव आणि लालूप्रसाद यादव यांच्या भूमिकेचे समर्थन करताना आज भाजपने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदविषयी परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी केलेले वक्तव्य पंतप्रधानांच्या भूमिकेपेक्षा विसंगत असून या मुद्यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करीत लोकसभेत सभात्याग केला. तत्पूर्वी, या मुद्यावरून लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांना सभागृहाचे कामकाज अध्र्या तासासाठी तहकूबही करावे लागले.
पाकिस्तानातील न्यायालयाने दोषमुक्त ठरविलेल्या हाफिज सईदवरून शून्य प्रहरात सपा नेते मुलायमसिंह यादव यांनी भारत-पाक संयुक्त निवेदनाबद्दल आपली शंका खरी ठरल्याचा दावा केला. भारताला दगा देऊन पाकिस्तान पुन्हा दहशतवादाला प्रोत्साहन देईल, असे मुलायमसिंह म्हणाले. भारत-पाक संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करणे चुकीचे होते आणि या मुद्यावर संसदेत नव्याने चर्चा व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. पाक न्यायालयाने दोषमुक्त ठरविलेल्या हाफिज सईदवर कारवाई करताना पाकिस्तानची कसोटी लागणार असून सईदविरुद्ध कारवाई होणार नसल्यास पाकिस्तानशी कोणत्याही स्तरावर चर्चा करण्यात अर्थ नाही, असे विधान कृष्णा यांनी संसदेबाहेर केल्यामुळे भाजपचेही सदस्य भडकले होते. कृष्णा यांनी हेच विधान सभागृहातही करावे, अशी मागणी विरोधी पक्षाचे नेते करीत होते. मुलायमसिंह यांच्यापाठोपाठ भाजपचे यशवंत सिन्हा यांनीही हा मुद्दा आक्रमकपणे उचलून धरला. पाकिस्तान कोणतेही निमित्त करून सईदला सोडून देत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. भाजप आणि सपाच्या सदस्यांनी चालविलेला गोंधळ संपण्याची चिन्हे दिसत नसल्याचे पाहून मीराकुमार यांनी अर्धा तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. पाकिस्तानने सईदला मोकळे सोडून भारताला आरसा दाखविला असल्याची टीका राजद नेते लालूप्रसाद यादव यांनी केली.