Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

व्यक्तिवेध

व्यक्तिगत परिश्रम, पालकांचे सक्रिय प्रोत्साहन आणि संस्थात्मक पाठिंबा अशी त्रिसूत्री साधली गेली तर काय करिष्मा घडतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याच्या ईशा करवडेची विजयी ‘चाल’! ‘इंटरनॅशनल मास्टर्स’ हा किताब पटकावणारी राज्यातील पहिली महिला बुद्धिबळपटू ठरण्याचा मान ईशाने मिळविला. पॅरिसमधील स्पर्धेत २४०० ‘इलो’ गुणांचा टप्पा पार करून तिने नुकतेच या किताबाला ‘चेक-मेट’ केले. आता येत्या दोन वर्षांत खडतर परिश्रमांद्वारे ‘ग्रॅण्डमास्टर’ हा सर्वोच्च किताब प्राप्त करण्याचे ध्येय तिने बाळगले आहे. वयाच्या नवव्या वर्षांपासून ईशा काळय़ा-पांढऱ्या पटावरील चाली खेळू लागली ती प्रामुख्याने आई-वडील संजय व शुभदा यांच्या प्रोत्साहनामुळे. तिची जुळी बहीण ऋचा हिची

 

साथही होती. दोघींनी राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धामध्ये पहिल्या पाच क्रमांकांपर्यंत झेप घेतली. बऱ्यापैकी गांभीर्याने खेळू लागल्यानंतर १९९९ साली करिअरच्या दुसऱ्याच वर्षी ईशाने थेट १२ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. ‘बालशिक्षण मंदिर प्रशालेत आम्ही शिकत होतो. खरं तर मी अभ्यासात रमणारी. बाबांनी पुढाकार घेतल्याने बुद्धिबळ खेळू लागले. परंतु विजयाचे खाते उघडत गेल्यानंतर बुद्धिबळावरच लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले,’ अशा शब्दांत ईशा पहिल्या चालींच्या आठवणी सांगते. २००४ साली जागतिक युवा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर ईशाकडे ‘बुद्धिबळ प्रिन्सेस’ म्हणून पाहिले जाऊ लागले. अपराजित राहात ‘ऑल इंडिया बी टूर्नामेंट’ जिंकून तिने दमदार वाटचाल सुरू केली. ‘इंटरनॅशनल मास्टर्स’ किताबानंतर आता २१ वर्षीय ईशा जागतिक मानांकनात ८३ वी, आशियाई स्तरावर १७ वी, तर कोनेरू हंपी-हरिका- तानिया आणि विजयालक्ष्मी यांच्यासमवेत देशातील आघाडीच्या पहिल्या पाच महिला बुद्धिबळपटूंमध्ये गणली जात आहे. ईशाच्या या भरारीबद्दल डॉ. संजय सांगतात, ‘प्रतिस्पध्र्याच्या दबावापुढे खचून न जाता निर्धाराने खेळ करणे, हे ईशाचे बलस्थान! त्याच्याच जोरावर अमेरिका, ऑस्ट्रेलियातील स्पर्धेत महिलांमध्ये प्रथम येण्याचा मान तिने मिळविला. इतकेच नव्हे, तर हंपी, माया चिंबर्ले व झू चेन या विश्वविजेत्यांशी मुकाबला करताना एक लढत जिंकली, तर दोन बरोबरीत सोडविल्या.’ ‘आई-बाबांप्रमाणे ‘डेन्टिस्ट’ होण्यासाठी कधीच दबाव टाकण्यात आला नाही. किंबहुना, त्यांच्या प्रोत्साहनाशिवाय बुद्धिबळातील यश शक्यच नव्हते’, असे स्पष्ट करीत ईशा सांगते, ‘बुद्धिबळ खेळणाऱ्या मुला-मुलींच्या संख्येत सध्या वाढ झाली आहे, परंतु एकाच जागी बसून अभ्यास करण्याची क्षमता, स्मरणशक्ती-तर्कबुद्धी, एकाग्रता वाढावी, अशा मर्यादित हेतूने पालक बुद्धिबळाकडे पाहतात. दहावी आली की खेळ बंद करण्यास भाग पाडतात. अभ्यासाव्यतिरिक्त अन्य क्षेत्रातील गुणांना पालकांनी प्रोत्साहन द्यावे,’ असे आवाहन ईशा आवर्जून करते. राज्य शासनाने फारशी दखल घेतली नसली, तरी ‘लुकिंग अ‍ॅट नॉलेज इन स्पोर्ट्स अ‍ॅण्ड हेल्पिंग यूथ अचिव्ह,’ म्हणजेच ‘लक्ष्य’ या संस्थेकडून मिळालेल्या मदतीचा करवडे कुटुंबीय आवर्जून उल्लेख करतात. ‘आता ग्रॅण्डमास्टरपदाची बिकट वाट चालायची आहे. मोक्याच्या क्षणी क्षुल्लक चुकांचे प्रमाण कमी करायचे आहे. ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे यांचे प्रशिक्षण या कामी मोलाचे ठरणार आहे. अद्ययावत संगणकप्रणालीचा वापर, प्रतिस्पध्र्याच्या चाली हेरण्याची क्षमता अशी तयारी आता वाढवायची आहे. दोन-तीनदा हातून निसटलेले राष्ट्रीय विजेतेपद पटकाविण्याचेही लक्ष्य आहे. चीनमधील महिलांच्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली असून सांघिक स्पर्धेचा मोलाचा अनुभव तिथे मिळेल,’ असे ईशा सांगते. करिअरसाठी अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शाखा निवडायची, अशा चौकटीत अडकलेल्या मराठी मानसिकतेला करवडे कुटुंबीयांच्या ‘चौसष्ट घरां’मधील वाटचालीने आगळा आदर्श घालून दिला आहे!