Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

महिला बचत गटांची चळवळ गतिमान
मोहन अटाळकर

बडनेरा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके प्रथमच निवडून आल्या आणि अमरावती जिल्ह्य़ातील महिलांचे राजकीय महत्त्व पुन्हा अधोरेखीत झाले. गेल्या पाच वर्षात ज्या झपाटय़ाने त्यांनी मतदारसंघात प्रत्यक्ष फिरून अनेक कामे केली, त्याचे कौतुक राजकीय विरोधकांनाही खाजगीत करावे लागले. महिला बचत गटांची चळवळ सशक्त करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या कामाच्या पध्दतीची तुलना पश्चिम महाराष्ट्रातील एखाद्या सशक्त नेत्याशी होऊ लागली. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि त्यांच्या कार्याला साज चढला.

उंट अळीला रोखण्यात यश
अमरावती विभागात ११ तालुक्यांमध्ये पीकस्थिती चिंताजनक
अमरावती,४ ऑगस्ट / प्रतिनिधी

अमरावती विभागातील सोयाबीनवर उंटअळीचे आक्रमण झाल्यानंतर मधल्या काळातील उपाययोजनांमुळे हे संकट थोपवण्यात शेतकऱ्यांना यश मिळाले असले तरी हा धोका पूर्णपणे टळलेला नाही. दुसरीकडे विभागातील ११ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने या ठिकाणी पीकस्थिती चिंताजनक बनली आहे. पावसाने दडी मारल्याने इतर भागातही चिंतेचे सावट आहे. पावसाअभावी पिके जेमतेम आठवडाभर तग धरू शकतील, अशी स्थिती सध्या आहे.

आदिवासी शेतकऱ्यांना डिझेल पंप देण्याची योजना बंद
चंद्रपूर, ४ ऑगस्ट/ प्रतिनिधी

अपुऱ्या पावसामुळे शेतीच्या खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट असताना आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांना मोफत डिझेल पंप देण्याची योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आदिवासी शेतकऱ्यांवर दुष्काळात तेरावा महिना असे म्हणायची वेळ आली आहे.

मूल बदलल्याचे प्रकरण
डॉक्टरच्या नार्को चाचणीचे न्यायालयाचे आदेश
अकोला, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी
रुग्णालयात मूल बदलल्याप्रकरणी डॉ. पार्थसारथी शुक्ल यांची नार्को चाचणी घेण्याचे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले. बालरोगतज्ज्ञ डॉ. पार्थसारथी शुक्ल यांच्या गंगाधर फ्लॅट भागातील रुग्णालयात मूल बदलण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती.

कृषीमंत्री शरद पवारांनी राजीनामा द्यावा- भाकप
खामगाव, ४ ऑगस्ट / वार्ताहर

देशातील साठेबाज व नफेखोरांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी कृषीमंत्री शरद पवार यांनी १६०० कोटी रुपयांची डाळ बंदरातून उचलली नाही. जनतेच्या आर्थिक लुटीत शरद पवार यांचा सहभाग असल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाकपचे शहर सचिव विलास पाटील यांनी केली आहे. बंदात कोटय़वधी रुपयांची डाळ सडू देऊन साठेबाज व नफेखोरांच्या लाभासाठी कृत्रिम टंचाई निर्माण केली. त्यामुळे जनतेची मोठय़ा प्रमाणात आर्थिक लूट होत असून या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आयुर्वेदात गोमातेला अनन्य महत्त्व -मेहता
अंजनगावसुर्जी, ४ ऑगस्ट / वार्ताहर

आयुर्वेदामध्ये गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. तेव्हा गायींचे संरक्षण धर्माच्या आधारे न होता औषधी जैविक यंत्र म्हणून करावे, असे प्रतिपादन अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्डाचे सदस्य, भारतीय गोसेवा संघाचे अध्यक्ष केशरीचंद मेहता यांनी केले. येथील बजरंग दल व जीवदया पशुपक्षी संरक्षण व संवर्धन ट्रस्टच्या वतीने शुक्रवारी खोडगाव हनुमान मंदिरात आयोजित केलेल्या गोरक्षा कायदे विषयक मार्गदर्शक मेळाव्यात बोलताना केले. अकोला येथील आदर्श गोसेवा प्रकल्पाचे रतनलाल खंडेलवाल, मालेगाव येथील दामया महाराज यांनीही मार्गदर्शन केले. मेळाव्यास नगराध्यक्ष मंजूषा लोळे, डॉ. अमर सारडा, रमेश जायदे, श्रीकृष्ण पायघन आदी उपस्थित होते. प्रश्नस्ताविक गजानन हुरपडे, संचालन उमेश इरवार, आभार डॉ. नारायण कावरे यांनी केले.

पावसाअभावी रोवणी लांबणीवर, मजुरीचे दर घटले
भंडारा, ४ ऑगस्ट / वार्ताहर

मागील एक आठवडय़ापासून पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्य़ातील रोवणी खोळंबली असून शेतमजुरीच्या दरात घसरण आली आहे. चिखलणी करून रोवणी करता येत नसल्यामुळे शेतातील कामे थांबली आहेत. पर्यायाने मजुरी घसरली असून महिला मजुरांचा दर ५० ते ६० रुपयांपर्यंत आला आहे. ८ दिवसांपूर्वी हाच दर १२५ ते २०० रुपयांपर्यंत वाढला होता. धान पिकाचे लागवड क्षेत्र दरवर्षी वाढत जाते. ही वाढ मागील तीन वर्षात ५ हेक्टरने झाली आहे. परंतु, अत्यल्प पावसाने उत्पादन घटण्याची चिन्हे दिसत आहेत. ३१ जुलैपर्यंत ५२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कमी पाऊस त्यासोबतच खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झालेला आहे. जिल्ह्य़ात एकूण १ लक्ष ८० हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड झालेली आहे. आतापर्यंत आलेल्या पावसाने तलाव, बोडय़ा, विहिरीमधील पाण्याचा साठा फारसा वाढलेला नाही आणि भारनियमनाचे प्रमाण वाढल्यामुळे विहिरी किंवा अन्य साठय़ातून पिके वाचविण्याकरिता पाणी ओढणेही अशक्य झाले आहे.

कळमेश्वर बाजार समितीपदी प्रशासकांची नियुक्ती
कळमेश्वर ४ ऑगस्ट / वार्ताहर

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदी राज्य शासनाने पाच अशासकीय पदाधिकाऱ्यांची २९ जुलैच्या शासकीय परिपत्रकान्वये करण्यात आली. या प्रशासकीय प्रतिनिधीमध्ये मुख्य प्रशासक वीरेंद्र सिंग बैस पाटील असून प्रशासक म्हणून मारोतराव दहाट, संजय ठाकरे, वसंतराव रोडे, अब्बूजी महाजन यांचा समावेश आहे. १ ऑगस्ट रोजी प्रशासकांनी बाजार समितीच्या कार्यालयात प्रशासक दीपक वेदरकर यांच्याकडून पदाचे सूत्र स्वीकारले. यावेळी बाजार समिती सचिव रमेश बोबडे, कर्मचारी, व्यापारी वर्ग उपस्थित होता.

मच्छीमारांचा आज मेळावा
भंडारा, ४ ऑगस्ट / वार्ताहर

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्य़ातील मच्छीमार समाजाचा मेळावा बुधवार, ५ ऑगस्टला गोसेखुर्द येथील इंदिरा सागर धरणावर आयोजित करण्यात आला आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते जलपूजन होणार असून या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नाना पटोले राहतील. यावेळी विदर्भ मच्छीमार संघ सर्व जिल्हा मच्छीमार संघ व मच्छीमार संघटनेचे सदस्य सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. प्रकाश मालगावे, प्रकाश लोणारे, अजय मोहनकर, प्रल्हाद भुरे, बाबुराव बावणे, काशीराम बावणे यांनी केले आहे.

जऊळका परिसरात अवैध धंदे वाढले
वाशीम, ४ ऑगस्ट / वार्ताहर
जिल्ह्य़ातील जऊळका पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित ठाणेदारावर कारवाई करावी, कारवाई न केल्यास पोलीस अधीक्षकांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मालेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष देवढे पाटील यांनी केली आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सुभाष देवढे पाटील यांनी जऊळका पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात खुलेआम अवैध धंदे सुरू असल्याबाबतची तक्रार लोकशाही दिनात केली. यावेळी सभागृहात जिल्हा पोलीस अधीक्षक मंगलजित सिरम उपस्थित होते.

गळफास लावून तरुणीची आत्महत्या
भंडारा, ४ ऑगस्ट / वार्ताहर

येथील राजगोपालाचारी वॉर्डातील रोजिना सलाम शेख (१८) हिने गळफास लावून आत्महत्या केली. रोजिना ही मोहदुरा येथे इयत्ता १२ वी ची विद्यार्थिनी होती. दुपारी ४ वाजताच्या सुमारास घराच्या वरच्या मजल्यावर स्लॅबच्या हूकला रोजिनाचा मृतदेह लटकलेला दिसला. भंडारा पोलिसांनी रोजिनाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवला. रोजिनाच्या आत्महत्येमागचे कारण मात्र कळू शकले नाही.

भामटय़ांनी केले दीड लाखाचे दागिने लंपास
परतवाडा, ४ ऑगस्ट / वार्ताहर

सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याची बतावणी करून दोघा भामटय़ांनी दीड लाखाचे दागिने पळवले. विद्युतनगर कांडली येथील रहिवासी राधा दीपक गोयल (४२) यांच्याकडे २२ ते २५ वयोगटातील दोन युवक दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास आले आणि त्यांनी दागिन्याला पॉलिश करून देण्याची बतावणी करून १ लाख ४० हजाराचे दागिने लंपास केले.

अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
बुलढाणा, ४ ऑगस्ट / प्रतिनिधी

येथील कादरिया अध्यापक महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रश्नचार्य घेवंदे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कादरिया डी.एड. च्या प्रश्नचार्य लाकसवार उपस्थित होत्या. छात्रअध्यापक व अध्यापिका अमोल घेवंदे, सविता मुंढे व संतोष पिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रश्न. जाधव आणि प्रश्न. सरिता मराठे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रमुख्याने प्रश्न. सरिता मराठे, प्रश्न. नागसेन वाकोडे, प्रश्न. एन.व्ही. जोशी, प्रश्न. स्नेहलता तायडे, शालिनी पवार, प्रश्न. उन्मेष पाटील आदी उपस्थित होते.

पॉवर टिलरच्या पुरवठय़ासाठी लॉटरी सोडतीतून ४० लाभार्थीची निवड
गोंदिया, ४ ऑगस्ट / वार्ताहर

शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी व किफायतशीर शेती करण्यासाठी पॉवर टिलरचा पुरवठा करण्यात येतो. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज प्राप्त झालेले होते. अर्जदारांमधून निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी सी.एस. डाहाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सभा आयोजित करण्यात आली. सभेत एकूण प्रश्नप्त १२५ अर्जापैकी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या १०५ लाभार्थ्यांमधून लॉटरी सोडत पद्धतीने उपस्थित लाभार्थ्यांच्या हस्ते ईश्वरचिठ्ठी काढून ४० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.

वासुदेव महाराजांना श्रद्धांजली
दर्यापूर, ४ ऑगस्ट / वार्ताहर

वासुदेव महाराज यांना दर्यापूर येथील भक्त व वारकऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. भास्कर महाराज सुसंस्कार शिबीर व गाडगे महाराज संस्थानच्यावतीने श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रबोधन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शंकरराव बुरघाटे अध्यक्षस्थानी होते. शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य डॉ. दिनकरराव गायगोले, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. शंकरराव चतुरकर, गाडगे महाराज संस्थानचे डॉ. पांडुरंग गुल्हाने, सागर महाराज परिहार, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे उद्धवराव रेखे, राजेंद्र गायगोले, रामदास पाटील यांच्यासह भक्त उपस्थित होते.

कायदेविषयक शिबीर
बल्लारपूर, ४ ऑगस्ट / वार्ताहर

येथील भालेराव पब्लिक स्कूलमध्ये नुकतेच कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आले. बल्लारपूर येथील प्रथम ८ श्रेणी दिवाणी न्यायाधीश रंगारी यांच्या अध्यक्षतेखाली शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम श्रेणी दिवाणी न्यायाधीश नेरकर, संस्थेच्या संचालिका आशा गायकवाड, मुख्याध्यापक, रोकडे, अ‍ॅड. आय.आर. सय्यद, उपाध्यक्ष मून, बोराडे, गेडाम आदींची उपस्थिती होती. विविध कायदेशीर बाबींवर यावेळी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा
रिसोड, ४ ऑगस्ट / वार्ताहर

शिवेसना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस खासदार भावना गवई यांच्या नेतृत्वाखाली शहरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष प्रश्नचार्य विजय तुरुकमाने, शिवसेना शहर प्रमुख अरुण मगर, डॉ. जिरवणकर, डॉ. परदेशी, भागवतराव गवळी, डॉ. चंद्रशेखर देशमुख, विष्णू खिराडे, लक्ष्मण कदम, सदाशिव चौधरी इत्यादींच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करून व परिसरात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात येईल. कार्यक्रमाला अनिल मगर, शे. खाजा, विठ्ठल दरूगे, विनोद परबत, दत्ता मगर, सागर डांगे, अमोल गाभणे, चंद्रकांत गायकवाड, गणेश दवंड, लक्ष्मण मगर, शे. रशीद, शे. जहीर आदींसह अनेक शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

निवृत्त गिरणी कामगारांना १७.५ लाखांचे वाटप
कळमेश्वर, ४ ऑगस्ट / वार्ताहर

कळमेश्वर कापड गिरणी शासनाच्या दुर्लक्षामुळे बंद पडून दोन हजार कामगार बेरोजगार झाले. या सेवानिवृत्त कामगारांचे वेतनातून साडेसतरा लाख रुपये व्यवस्थापनाने व्यवसाय कराच्या रूपाने बेकायदेशीर कपात केली होती. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळात गिरणी व्यवस्थापकाविरुद्ध व्यवसाय करण्याच्या संदर्भात राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाचा निकाल गिरणी कामगारांच्या बाजूने लागला. त्यानुसार गिरणी सेवानिवृत्त कामगारांना १७.५ लाखाचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस शेषराव केदार यांनी दिली मृत कामगारांच्या वारसांनासुद्धा याचा लाभ होणार आहे, असे म्हटले.

अमृत कलश पाणपोईचे लोकार्पण
यवतमाळ, ४ ऑगस्ट / वार्ताहर

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ९ लाख रुपये खर्चून कळंब येथील बसस्थानक परिसरात उभारण्यात आलेल्या ३१ फूट उंचीच्या अमृत कलश पाणपोईचे लोकार्पण अन्न व औषध प्रशासन मंत्री पालकमंत्री मनोहर नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. लोकार्पण सोहोळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री व आमदार अनिल देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य परिवहन महामंडळाचे संचालक रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रीतीला दुधे, उपाध्यक्ष सदबाराव मोहटे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप काळे उपस्थित होते. यावेळी अमृत कलश या देखण्या वास्तुची उभारणी करणारे कंत्राटदार सचिन उत्तरवार, परवेज काझी तसेच कारागीर राजीव मोहरे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पालकमंत्री मनोहर नाईक यांनी सुंदर अशी अमृत कलशाच्या आकाराची पाणपोई उभारल्याबद्दल कौतुक केले. या पाणपोईवर चित्रीत केलेल्या सर्वधर्मसमभाव प्रतित होणाऱ्या चिन्हातून ही पाणपोई एखाद्या धर्म-जातीच्या लोकांसाठी मर्यादित होत नाही तर सर्वासाठी असल्याचे सिद्ध होते, असे सांगितले.

रविवारी ‘आठवणीतील निळूभाऊ’
चंद्रपूर, ४ ऑगस्ट/प्रतिनिधी

दिवंगत अभिनेते निळू फुले यांना ‘सृजन’तर्फे ९ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता येथील प्रेस क्लबमध्ये ‘आठवणीतील निळूभाऊ’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. कार्यक्रमात नाटय़ कलावंत अजय धवने, अ‍ॅड. जयंत साळवे, सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पान्हेरकर, शाहिदा शेख यावेळी त्यांचे अनुभव विशद करणार आहेत. नाटककार श्रीपाद जोशी उपस्थित राहणार आहेत.