Leading International Marathi News Daily

बुधवार, ५ ऑगस्ट २००९

विविध

रोज धमकावे त्याला कोण घाबरे!
वॉशिंग्टन, ४ ऑगस्ट/पी.टी.आय.

जगातील सर्वात शक्तिवान देशाचा प्रमुख आणि सगळ्यात कडेकोट सुरक्षेत राहणारा राष्ट्रप्रमुख अशी बिरुदावली अमेरिकेचा अध्यक्ष मिरवित असतो. विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा हे सुद्धा त्याला अपवाद नाहीत. परंतु पहिले ‘आफ्रो-अमेरिकी’ अध्यक्ष बनण्याचे भाग्य लाभलेल्या ओबामा यांचे सिंहासन वाटते तेवढे सुखावह नाही. उलटपक्षी त्यात काटेच जास्त असावेत अशी रास्त शंका घेता येऊ शकते. ओबामा यांना ठार मारण्याच्या दररोज सरासरी ३० धमक्या येत असतात, अशी माहिती पुढे आली आहे.

‘राखीचे स्वयंवर’ पाकिस्तानमध्येही लोकप्रिय
इस्लामाबाद, ४ ऑगस्ट/पी.टी.आय.

बॉलीवूडमधील ‘आयटम गर्ल’ राखी सावंत हिच्या टीव्ही रिअ‍ॅलिटी शोमधील ‘स्वयंवरा’ची बातमी भारताप्रमाणेच पाकिस्तानी माध्यमांमध्येही आघाडीवर होती. पाकिस्तानातील सर्व इंग्रजी आणि उर्दू वृत्त माध्यमांनी तिच्या स्वयंवराच्या बातम्यांना प्राधान्य दिले होते. ‘एनडीटीव्ही इमॅजिन’ वर रविवारी झालेल्या या अनोख्या ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये कॅनडास्थित उद्योगपती इलेश पारुजनवाला याची निवड राखीने केली.

ऑस्ट्रेलियात आत्मघाती घातपाताचा कट उधळला
१९ ठिकाणी छापे, चौकडीला अटक
मेलबर्न, ४ ऑगस्ट/वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियात आज पहाटे एका व्यापक शोधमोहीमेत मेलबर्नच्या अनेक भागांत टाकलेल्या छाप्यांत आत्मघाती घातपाती हल्ला चढविण्याच्या तयारीत असलेल्या चौकडीला अटक झाली. तब्बल ४०० पोलिसांचा या मोहिमेत समावेश होता आणि हे चारही अतिरेकी सोमालियन वंशाचे असून त्यांचा अल काईदाशी निकटचा संबंध असल्याचा तर्क आहे. ऑस्ट्रेलियातील इतक्या व्यापक प्रमाणात प्रथमच अशी कारवाई झाली आहे.

पवार, लालू, नारळ आणि धार्मिकता!
नवी दिल्ली, ४ ऑगस्ट/ पी.टी.आय.

‘लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे पानिपत झाल्यानंतर लालूप्रसाद यादव हे अधिक धार्मिक वृत्तीचे होऊ लागल्यासारखे वाटतेय’. हे निरीक्षण आहे कृषीमंत्री शरद पवार यांचे. लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पवार आणि लालूप्रसाद यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्याने सभागृहात बराच वेळ हास्याची खसखस पिकली. विषय होता नारळ, त्याचे उत्पादन आणि धार्मिक महत्त्व.

नेपाळ सरकार उलथविण्यासाठी प्रचंड यांची तिसऱ्या क्रांतीची हाक
काठमांडू, ४ ऑगस्ट/वृत्तसंस्था

नेपाळ सरकार उलथून टाकण्यासाठी माओवाद्यांनी कंबर कसली असून माओवादी नेते प्रचंड यांनी तिसऱ्या क्रांतीचा नारा दिला आहे. नेपाळमध्ये ‘लोकांचेच राज्य’ नांदवावे, यासाठी सरकारला तीन दिवसांची ‘मुदत’ माओवाद्यांनी काल दिली होती आता सात ऑगस्टपासून नेपाळच्या पार्लमेंटला घेराव घालण्यासह अनेक प्रकारची आंदोलने जाहीर करण्यात आली आहेत.

‘खबर लहरियाँ’ला युनेस्कोचा यंदाचा साक्षरता पुरस्कार
संयुक्त राष्ट्रे, ४ ऑगस्ट / पीटीआय

‘निरंतर’ या बिगरसरकारी संस्थेतर्फे उत्तर प्रदेशची ग्रामीण महिला चालवित असलेल्या ‘खबर लहरियाँ’ या हिंदी पाक्षिकाने युनेस्कोचा प्रतिष्ठेचा किंग सेजाँग साक्षरता पुरस्कार २००९ जिंकला आहे. युनेस्काने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, दक्षिण कोरिया सरकारच्या सहकार्याने १९८९ पासून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. टिन टुआ यांची साक्षरता आणि पूर्व बुर्किना फासोतील अनौपचारिक शैक्षणिक प्रकल्पांनाही गौरविण्यात येणार आहे.

परराष्ट्रमंत्री कृष्णा आणि हाफिज सईदच्या मुद्यावरून लोकसभेत विरोधकांचा गदारोळ
नवी दिल्ली, ४ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

पाकिस्तानविरुद्ध आक्रमक झालेले मुलायमसिंह यादव आणि लालूप्रसाद यादव यांच्या भूमिकेचे समर्थन करताना आज भाजपने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदविषयी परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी केलेले वक्तव्य पंतप्रधानांच्या भूमिकेपेक्षा विसंगत असून या मुद्यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करीत लोकसभेत सभात्याग केला. तत्पूर्वी, या मुद्यावरून लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांना सभागृहाचे कामकाज अध्र्या तासासाठी तहकूबही करावे लागले.

दहशतवादी नव्या तंत्रज्ञानाद्वारे आक्रमक होत आहेत -अ‍ॅन्टनी
नवी दिल्ली, ४ ऑगस्ट/पी.टी.आय.

दहशतवादी आपल्या कारवायांमध्ये नवे तंत्रज्ञान हस्तगत करून अधिकाधिक आक्रमक बनत असल्याचा इशारा संरक्षणमंत्री ए.के.अ‍ॅन्टनी यांनी दिला. मात्र संरक्षण मंत्रालय दहशतवाद्यांकडून निर्माण होऊ शकणाऱ्या अशा प्रकारच्या धोक्यांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी स्वतला तयार करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञानातील नव्या गोष्टी वेळोवेळी हस्तगत करीत असल्यामुळे दहशतवादी आक्रमक बनले आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांकडून निर्माण झालेल्या धोक्यावर मात करण्यासाठी संरक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्वतला सक्षम करीत असल्याचे, अँटनी यांनी मार्गदर्शक तत्त्वे सादर करताना सांगितले.

‘पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी लष्कर, जैशचेही प्रयत्न’
इस्लामाबाद, ४ ऑगस्ट/पी.टी.आय.
पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-महम्मद या संघटनांनी तालिबान आणि अल-काईदा यांना पाठिंबा दिला, अशी माहिती पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांनी एका वृत्तवाहिनीला दिली. लष्कर-ए-तय्यबासारख्या संघटनेनेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचला हे आता पाकिस्तानने मान्य केले असले तरी जमात-ऊद-दावा संघटनेचा म्होरक्या हाफीज सईदविषयी थेट पुरावे नसल्याने त्याच्यावर खटला चालविण्यास मात्र पाकिस्तानने नकार दिला आहे. मलिक यांनीही सईदबाबत पाकिस्तानच्या धोरणाची पुष्टीच केली. पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनांमध्ये दहशतवादी समर्थक असलेले अधिकारी आतापर्यंत निवृत्त झाले आहेत किंवा काही जणांना अटक झाली असल्याचेही मलिक यांनी सांगितले. पाकिस्तानमधील खालावलेल्या कायदा व सुव्यवस्थेला तसेच देशापुढे सध्या भेडसावत असलेल्या अनेक आर्थिक समस्यांना दहशतवादी जबाबदार असून बेनझीर भुत्तो यांच्या मारेकऱ्यांवर कडक कारवाई केल्याशिवाय पाकिस्तान राहणार नाही, असेही मलिक यांनी सांगितले.

भारतीय व्यापाऱ्याची दक्षिण आफ्रिकेत हत्या
प्रिटोरिया, ४ ऑगस्ट/पी.टी.आय.
प्रिटोरियाच्या दक्षिणेला भारतीय नागरिकांची वस्ती असलेल्या लॉडियम येथील एका भारतीय व्यापाऱ्याच्या घरी दरोडा घालण्यासाठी आलेल्या चोरांनी युसुफ जोसूब याची हत्या केली असून झटापटीत युसुफच्या थोरल्या भावाने एका चोरालाही गोळ्या घालून ठार मारले. ठार झालेल्या चोराचे नाव संडिलेली लाली असे असून त्याचा अन्य साथीदार मात्र फरार आहे.
या भारतीय व्यापारी कुटुंबाला लुटण्याच्या उद्देशानेच चोरटे येथे आले होते. प्रथम चोरांनी युसुफवर गोळ्या झाडल्या. आपला भाऊ जखमी झाल्याचे लक्षात येताच त्याच्या चिडलेल्या थोरल्या भावाने एका चोराची हत्या केली. पोलीस झालेल्या प्रकाराची अधिक चौकशी करीत आहेत.

वाढती स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी रक्षाबंधन!
जैसलमेर, ४ ऑगस्ट / पी.टी.आय.
स्त्री भ्रूणहत्येसाठी कुख्यात असलेल्या राजस्थानमधील रजपूतांच्या देवरा गावात बुधवारी रक्षा बंधनाचा सोहळा साजरा करतील त्या फक्त १२ मुली. गावातील २५० भावांना प्रेमाचे प्रतीक म्हणून त्या राखी बांधतील.शतकाहून अधिक काळ स्त्री भ्रूणहत्येसाठी कुप्रसिद्ध झालेल्या या गावात फक्त बाराच मुली आहेत. त्यामुळे अनेक तरुणांना रक्षा बंधनाचा सोहळा बहिणीवाचूनच साजरा करण्याची नामुष्की पदरी पडत असे. परंतु यंदा या बाराजणींनी दूरचित्रवाणी वाहिन्यांपासून प्रेरणा घेऊन जात-धर्मभेद यांची तमा न बाळगता सर्व २५० भावांच्या हातावर राखी असेल, असा निर्धार केला आहे. नात्यातला असो वा नसो, बुधवारी एकही भाऊ राखीवाचून वंचित राहणार नाही, असे मत पूजा कन्वरने व्यक्त केले.

श्रीलंकेतील शेतकऱ्यांना भारताचा मदतीचा हात!
कोलंबो, ४ ऑगस्ट/पी.टी.आय.

दहशतवाद संपुष्टात आणल्यानंतर श्रीलंकेतील शेती पुन्हा रुळावर आणण्यासाठी भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. भारताचे १२ सदस्यीय शिष्टमंडळ लवकरच या कामगिरीवर श्रीलंकेत येत आहे.गेल्या ३० वर्षांच्या यादवीने श्रीलंकेची पार वाताहत झाली आहे. येथे मोठय़ा प्रमाणावर जमीन अशी आहे की जेथे अनेक वर्षांत शेतीच झालेली नाही. अशा ठिकाणी शेती आणि शेतीआधारित उद्योग सुरू करणे हे मोठे आव्हान आहे. भारतातील ‘हरित क्रांती’चे प्रणेते डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी अलीकडेच श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यापाठोपाठ आता हे १२ सदस्यांचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ श्रीलंका दौऱ्यावर येत आहे. भारताने आपल्या अर्थसंकल्पात श्रीलंकेच्या, विशेषत: उत्तर श्रीलंकेच्या पुनर्बाधणीसाठी ५०० कोटी रुपये देऊ केले आहेत.