Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

व्यापार - उद्योग

महाराष्ट्रीय उद्योजकतेच्या मॉडेल्सचा वेध
‘सॅटर्डे क्लब’ची आजपासून मुंबईत गुंतवणूकदारांसाठी परिषद

व्यापार प्रतिनिधी: सॅटर्डे क्लबने मुंबई एन्जेल्स, बीटीएस इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर्स जेनव्हाल्को (दीपक घैसास यांनी प्रवर्तित केलेला खासगी इक्विटी फंड), अविष्कार, मॉर्फेअस व्हेंचर फंड, सीडबी व्हेंचर आणि नेक्सस कॅपिटल यासारख्या काही गुंतवणुकदारांशी सहकार्य करुन नाविन्यपूर्ण महाराष्ट्रीय उद्योजकांच्या व्यवसाय मॉडेल्सचा गुंतवणुकीसाठी व्यावसायिक योजना तयार करण्याबाबत खास परिषद मुंबईत ६ व ७ ऑगस्ट रोजी आयोजित केली आहे.

टाटा मोटर्सच्या व्यावसायिक व प्रवासी वाहन विक्रीत १८ टक्के वाढ
व्यापार प्रतिनिधी: टाटा मोटर्स कंपनीच्या व्यावसायिक व प्रवासी वाहन विक्रीत जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या या महिन्यातील तुलनेत १८ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने जुलै २००८ मध्ये ४०,७२९ वाहनांची विक्री केली होती. त्यात २००९ मध्ये ४८,०५४ पर्यंत वाढली आहे. मंदीचे वातावरण बदलून परिस्थिती सुधारत असल्याचे हे लक्षण आहे.कंपनीच्या व्यावसायिक व प्रवासी वाहनांच्या देशांतर्गत विक्रीत जुलै २००८ च्या तुलनेत २३ टक्के वाढ झाली आहे.

जैन इरिगेशनचा करपूर्व नफा १८१ टक्क्यांनी वाढून ८४ कोटींवर
तिमाही कामगिरी
व्यापार प्रतिनिधी: देशातील सर्वात मोठी आणि जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाची मायक्रो सिंचन कंपनी जैन इरिगेशनने ३० जून २००९ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अत्यंत आकर्षक असे स्वतंत्र निकाल नोंदविले आहेत. या तिमाहीतील नक्त विक्री ही ५६७ कोटी रुपये असून या विक्रीत झालेली वाढ तब्बल २१ टक्के (आर्थिक वर्ष २००९च्या याच काळातील तिमाहीमध्ये ती ४७० कोटी रुपये होती आणि त्यानुसार ही तुलना) आहे. जागतिक स्तरावर मंदीचे वातावरण असूनही कंपनीच्या सर्वच क्षेत्रातील व्यवसायामध्ये स्थानिक विक्रीमध्ये अत्यंत आकर्षक म्हणजे ३० टक्के वृद्धी नोंदविली गेली आहे. एमआयएस बिझनेसमध्ये स्थानिक बाजारपेठेत ३६ टक्क्यांची वृद्धी नोंदविली गेली आहे. फळ प्रक्रिया व्यवसायामध्येही आकर्षक अशी ८० टक्के वृद्धी नोंदविली गेली आहे तर पीव्हीसी पाईप व्यवसाय ५४ टक्क्यांनी वाढला आहे. स्थानिक बाजारपेठेत जी वृद्धी नोंदविली गेली आहे त्यातून देशात एकूण अर्थव्यवस्थेत जी जान फुंकली गेली आहे तीच ध्वनित होते. जागतिक स्तरावर जी मंदी अनुभवाला आली त्याचा परिणाम म्हणून कंपनीची निर्यात १७ टक्क्यांनी घटली. कृषी प्रक्रिया व्यवसायाने निर्यातीमध्ये ३७ टक्के एवढी घट नोंदविली आहे. मात्र कंपनीकडे सध्या मोठय़ा प्रमाणावर ऑर्डर्स नोंदविल्या गेल्या असून त्यामुळे चालू आर्थिक वर्षांत २० ते २५ टक्के वृद्धी नोंदविली जाईल. या तिमाहीमध्ये कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांत नोंदविलेल्या तोटय़ाची काही प्रमाणात भरपाई केली. कंपनीने २० कोटी रुपयांचे परदेशी चलन मिळविले. कंपनीने या तिमाहीमध्ये ८४ कोटी रुपयांचा करपूर्व नफा नोंदविला असून ही वाढ १८१ टक्के एवढी आहे. कंपनीचा नक्त नफा ८८ टक्क्यांनी वाढून तो ५६ कोटी रुपये एवढा नोंदविला गेला आहे.

अ‍ॅरिस अ‍ॅग्रोला ५९ टक्के करपूर्व नफा
व्यापार प्रतिनिधी: अ‍ॅरिस अ‍ॅग्रो लि. या स्पेशल्टी न्यूट्रिएंट कंपनीने ३० जूनपर्यंतच्या पहिल्या तिमाहीमध्ये २.६२ कोटी (गेल्या आर्थिक वर्षांपेक्षा ७९ टक्के अधिक) ऑपरेटिंग प्रॉफिट आणि १.२६ कोटी रु. करपूर्व निव्वळ नफा कमावला आहे. करपूर्व नफ्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा ५९ टक्के वाढ झाली. ३० जूनपर्यंतच्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीने गेल्या वर्षी याच कालावधीपेक्षा सहा टक्के अधिक म्हणजे १८.१९ कोटी रु. निव्वळ विक्री केली. याविषयी अ‍ॅरिस अ‍ॅग्रो लि.चे कार्यकारी संचालक डॉ. राहुल मिरचंदानी म्हणाले की, देशभर उशिरा दाखल झालेल्या मान्सूनमुळे पिकांच्या वेळापत्रकाला धक्का बसला असल्याने महसुलात किरकोळच वाढ झाली असली तरी उत्पन्नाच्या बाबतीत ७९ टक्के आणि करपूर्व् नफ्यात ५९ टक्के वाढ झाली आहे. खर्च आणि इन्व्हेंट्री व्यवस्थापनामुळेच हे शक्य झाले. मान्सूनची स्थिती जवळजवळ सर्वच राज्यांत सुधारली असल्याने दुसरी तिमाही चांगली असेल, अशी अपेक्षा आहे.

सावरिया अ‍ॅग्रो ऑइल्सच्या करोत्तर नफ्यात ६३ टक्के वाढ
व्यापार प्रतिनिधी: सावरिया अ‍ॅग्रो ऑइल्स या आघाडीच्या सोयाबीन प्रोसेसर आणि रिफाइन्ड सोयाबीन तेलाच्या उत्पादकाच्या ३० जूनपर्यंतच्या पहिल्या तिमाहीमध्ये १००८.२३ लाख रुपयांपर्यंत, म्हणजे ६३ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत करोत्तर नफा ६१८.५६ लाख रु. होता. कंपनीने या तिमाहीत १४३.०१ कोटी रु.ची निव्वळ विक्री नोंदवली. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने २५६.४३ कोटी रु. निव्वळ विक्री केली होती. निव्वळ विक्रीमध्ये झालेली घट पहिल्या तिमाहीत बियाणांमध्ये २८४०४ मेट्रिक टनांपर्यंत घट झाल्याने झाली (वार्षिक देखभालीसाठी दोन प्रकल्प बंद असल्याने). गेल्या वर्षी याच तिमाहीत बियाणांमध्ये क्रशिंग ६६५४६ मेट्रिक टन होते. १४७०.२५ लाख रु.च्या पेड-अप कॅपिटलवर कंपनीला यंदा ०.५८ रु. प्रति शेअर उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या ०.३६ रु. वरून त्यामध्ये यंदा ६१ टक्के वाढ झाली.

गायत्री प्रोजेक्ट्सचा निव्वळ नफा ११.९६ कोटींवर
व्यापार प्रतिनिधी: येथील पायाभूत सुविधा विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या गायत्री प्रोजेक्ट्स लिमिटेड (जीपीएल) कंपनीने ३० जून २००९ रोजी समाप्त प्रथम तिमाहीत रु. २९१ कोटी उलाढाल साध्य केली आहे. गतसाली संबंधित तिमाहीत कंपनीने रु. २०७ कोटी उलाढाल साध्य केली होती. अशा प्रकारे यंदा कंपनीच्या उलाढालीत ४०.४७ टक्के वाढ झाली आहे. या उलाढालीवर कंपनीने रु. ११.९६ कोटी निव्वळ नफा कमावला आहे. गतसाली याच तिमाहीत कंपनीने रु. ११.२५ कोटी नफा कमावला होता. यामुळे कंपनीची सौम्यीकृत तिमाही प्रतिसमभाग मिळकत (ईपीएस) रु. ११.८४ झाली आहे. गतवर्षी संबंधित तिमाहीत ही मिळकत रु. ११.१४ होती. अशा प्रकारे यंदा कंपनीच्या ईपीएसमध्ये ६.२ टक्के वाढ झाली आहे.

बँक ऑफ राजस्थानला १७.०७ कोटींचा निव्वळ नफा
व्यापार प्रतिनिधी: बँक ऑफ राजस्थान या देशातील आघाडीच्या खासगी बँकेने यंदा ३० जूनपर्यंतच्या पहिल्या तिमाहीत १७.०७ कोटी रु. निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत बँकेला ३०.९५ कोटी रु. नफा झाला होता. बँकेच्या एकूण उत्पन्नामध्ये गेल्या वर्षीच्या ३४१.४० कोटी रुपयांमध्ये यंदा ३७९.२० कोटी रुपयांपर्यंत ११.०७ टक्के वाढ झाली. कर्ज विवरणात गेल्या वर्षीच्या २१,००० कोटी रुपयांवरून यंदा ८.५७ टक्के, म्हणजे २२,८०० कोटी रु.पर्यंत वाढ झाली. ठेवी १३,५०४ कोटी रुपयांवरून ११.६८ टक्क्याने, १५,०८२ कोटी रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. अ‍ॅडव्हान्सेसवरील उत्पन्नही यंदा १२.४ टक्क्याने वाढले. गेल्या वर्षी ते ११ टक्के होते. बँकेला मिळालेल्या व्याजावरील उत्पन्नात यंदा ७.२२ टक्के वाढ होऊन ते ३४३ कोटी रु. झाले. गेल्या वर्षी ते ३२० कोटी रु. होते.

‘ब्ल्यू स्टार’च्या नफ्यात १३ टक्के वाढ
व्यापार प्रतिनिधी: ब्ल्यू स्टार लिमिटेड कंपनीने वित्तीय वर्षांच्या ३० जून २००९ रोजी समाप्त प्रथम तिमाहीत एकूण रु. ५३९.८१ कोटी उत्पन्न मिळवले आहे. कंपनीने आधीच्या वर्षी संबंधित तिमाहीत रु. ६३९.०४ कोटी उत्पन्न मिळवले होते. या उत्पन्नावर कंपनीने ९ टक्के वाढीने रु. ६२.५० कोटी ढोबळ नफा कमावला आहे. या काळात कंपनीच्या प्रचालन मार्जिनमध्ये ११.६ टक्के वाढ झाली आहे. गतसाली ९.१ टक्के वाढ झाली होती. त्याचप्रमाणे कंपनीने यंदा प्रथम तिमाहीत एकूण रु. ४१.१७ कोटी निव्वळ नफा कमावला आहे. गतसाली कंपनीने रु. ३६.४१ कोटी निव्वळ नफा कमावला होता. त्यामुळे तिमाहीत कंपनीची प्रतिसमभाग मिळकत (ईपीएस) रु. ४.५८ झाली आहे. गतसाली ही मिळकत रु. ४.०५ होती. ३० जून २००९ रोजी कंपनीकडे रु. १७१७ कोटींच्या ऑर्डर शिल्लक आहेत. गतसाली याच दिवशी कंपनीकडे रु. १४१० कोटींच्या ऑर्डर शिल्लक होत्या. अशा प्रकारे कंपनीच्या ऑर्डरमध्ये यंदा २१ टक्के वाढ झाली आहे.