Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

स्वाइन फ्लू : जुन्या विषाणूची नवी साथ!
आजकाल आपल्या बोलण्यात स्वाइन फ्लूचा उल्लेख कशा ना कशा संदर्भात हमखास होतो. जगभर १४० हून अधिक देशांत याची लागण झाली आहे. याला मुख्य कारण म्हणजे मेक्सिकोतून सुरू झालेली आणि अमेरिकेत सर्वदूर पसरलेली स्वाइन फ्लूची साथ आहे. या साथीचा सगळाच प्रकार वेगळा. त्याची चाचणी वेगळी. त्याची काळजी वेगळी. त्याचा उपचार वेगळा. हे असे का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. स्वाइन फ्लूचा इतिहास तसा जुना आहे. १९१८-१९ मध्ये आलेली स्वाइन फ्लूची साथ त्यातल्या त्यात घातक होती. जगभर जवळजवळ पाच कोटी रुग्ण त्यात दगावले. विसाव्या शतकातच अशा तीन मोठय़ा साथी येऊन गेल्या. या साथीपासून अमेरिकेसारखा प्रगत देश साथीच्या मुळात न जाता, उपचारात्मक उपाय करून परत ‘ये रे माझ्या मागल्या’सारखे दुसऱ्या साथीला तोंड देत गेला.

 

स्वाइन फ्लूची संसर्गक्षमता कमी व्हावी किंवा साथच येऊ नये यासाठी मुख्य कारवाई म्हणून वराहसंवर्धन व्यवसायावर नियंत्रणात्मक उपाय सुचवले गेले. पण ते कागदावरच राहिले.
आताच्या स्वाइन फ्लूचा विषाणू १९१८-१९ पासून आजतागायत आपल्यात वावरत आहे. हे निरीक्षण आहे. अमेरिकेतील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅलर्जी अ‍ॅण्ड इन्फेक्झियस डिसिझेज’च्या शास्त्रज्ञाचे! स्वाइन फ्लू विषाणूबद्दलच्या अजून एका संशोधनात एडिनबर्ग येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इव्हॉल्युशनरी बायॉलॉजीचे शास्त्रज्ञ अँड्रय़ू रॅम्बो यांनी म्हटले आहे की, मानवाला होणाऱ्या मोसमी फ्लूबद्दल जेवढे संशोधन मागील काही वर्षांत झाले, त्या मानाने वराहसमूहात आढळणाऱ्या फ्लू विषाणूबद्दल झाले नाही. त्यामुळे त्या विषाणूत होणाऱ्या बदलाकडे दुर्लक्ष होत गेले. त्याचीच परिणती तो अतिसंसर्गजन्य होण्यात झाली. या विषाणूच्या बदलांकडे लक्ष ठेवले असते तर धोक्याची पूर्वसूचना आधीच मिळाली असती आणि योग्य ती लसही तयार ठेवता आली असती. मुख्य म्हणजे विसाव्या शतकात झालेल्या तीन मोठय़ा साथींत (पँडेमिक्स) एकाच विषाणूत क्रमश: घडलेले जनुकीय बदल दिसले असते. वरील संशोधकाने सध्याच्या स्वाइन फ्लू विषाणूबरोबर, आशियातील स्वाइन फ्लूच्या विषाणूंचे, तसेच मानवात, वराहात आणि पक्ष्यात खास करून आढळणाऱ्या विषाणूंचे नमुने तपासून नवीन विषाणू कसा प्रगत झाला हे दाखवून दिले आहे.
अमेरिकन स्वाइन फ्लूच्या साथीची अद्ययावत माहिती देण्यासाठी सेंटर्स फॉर डिसिझ कंट्रोल (उऊउ) तर्फे दर शुक्रवारी साप्ताहिक अहवाल दिला जातो. २४ जुलैला दिलेल्या माहितीनुसार ४४,००० रुग्णांना फ्लूची लागण आहे, तर जवळजवळ ३०० मृत्यू नोंदवले गेले आहेत. अर्थात हे आकडे केवळ रुग्णालयाचे असल्यामुळे प्रत्यक्ष संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या कितीतरी पटीने अधिक आहे. या साथीचे एक वैशिष्टय़ म्हणजे मृत्यू पावणारे रुग्ण लहान वयाचे आहेत. मृत पावलेल्या रुग्णांचे सरासरी वय १२ आहे. नव्या पिढीचे नुकसान अशाने होते आहे.
स्वाइन फ्लूचा विषाणू म्हणजे मूर्ती लहान, पण कीर्ती(?) महान अशा पद्धतीचा आहे. इन मिन आठ जनुकांचा बनलेला असूनही तो ३०,००० जनुके धारण करणाऱ्या मानवाला ‘त्राहि भगवान’ करून सोडत आहे. या विषाणूच्या पृष्ठभागावरील दोन प्रथिने, एक म्हणजे हेमॅग्ल्युटिनिन (ऌ) आणि न्यूरॅमिनीडेज एन्झाइम (ठ) विषाणूला शरीरात शिरकाव करून देण्यास मदत करतात. वरच्या हेमॅग्ल्युटिनिनचे परत सोळा उपप्रकार आहेत, तर न्यूरॅमिनिडेजचे ९ उपप्रकार आहेत. त्यामुळे हा विषाणू १४४ प्रकाराने आपली रूपे बदलू शकतो.
बास्केटबॉलसारख्या खेळात जसे खेळाडू जागा बदलून खेळतात तसे विषाणूतील जनुके संसर्ग केल्यानंतर बदलू शकतात. सध्याचा विषाणू ऌ आणि ठ प्रकारच्या प्रथिनांनी युक्त आहे. फ्लू विषाणूचे अनेक प्रकार होऊ शकत असले तरी सुदैवाने आपल्याला ऌ1ठ1, ऌ2ठ2 याच विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो. याखेरीज ऌ5ठ1 हा पक्ष्यांचा कर्दनकाळ असलेला फ्लूचा विषाणू त्याच्याशी फार संसर्ग झाला तर मानवालाही कधीमधी प्रसाद देतो, पण अजूूनही त्यापासून आपण सहीसलामत आहोत.
मानवी फ्लू विषाणू, वराह फ्लू विषाणू किंवा पक्ष्यातील फ्लूचा विषाणू अशाप्रकारे जेव्हा उल्लेख होतो तेव्हा ते विषाणू सहजी ज्या प्राणिमात्राच्या पेढींना संसर्ग करतात त्यानुसार त्यांचे वर्गीकरण होत असते. या वर्गीकरणाप्रमाणे मानवातील फ्लू विषाणू पक्ष्यांना सहजी त्रास देत नाही, तर पक्ष्यातील विषाणू मानवाच्या वाटेला जात नाही. वराहांच्या बाबतीत मात्र विषाणू प्रवेशाची मर्यादा एवढी कडक नसते. त्यांच्यामध्ये वराह फ्लू विषाणू संसर्ग करतोच, पण काही अंशी मानवी फ्लू विषाणू आणि पक्ष्यातील फ्लूचा विषाणूदेखील संसर्ग पोहोचवतात. हे तीन विषाणू त्यांच्या शरीरात एकत्र आले की, नव्या विषाणूची प्रयोगशाळा बनते! एकमेकांच्या संपर्कात आलेल्या विषाणूतील जनुकांची देवाणघेवाण (१ीं२२१३ेील्ल३) त्यात होते. अशाप्रकारे नव्या विषाणूत तीनही प्रकारच्या विषाणूंच्या जनुकांचे ‘कॉकटेल’ बनते. हा विषाणू मानवी फ्लू विषाणूपेक्षा जादा प्रभावी संसर्ग निर्माण करतो.
वरील माहितीवरून हे लक्षात येईल की, फ्लू विषाणूची संसर्गक्षमता कमी ठेवायची असेल तर मानवाचा, वराहांचा, तसेच पक्ष्यांचा परस्पर संपर्क कमी असायला हवा. त्यातल्या त्यात वराहांची आणि पक्ष्यांची (उदा. कोंबडय़ांची) त्यांच्या मांसासाठी निगा राखली जात असल्याने त्यांचे संवर्धन संपर्करहित व्हायला हवे. पण ते आर्थिकदृष्टय़ा किफायतशीर करण्यासाठी अमेरिकेतील प्राणी संवर्धन व्यवसायाने त्याकडे लक्ष दिलेले नाही. त्याचा परिणाम म्हणून मध्येच साथ उद्भवते आहे.
तेथील वराहसंवर्धन व्यवसाय स्वाइन फ्लूचे अस्तित्व वराहात भावायलाच तयार नाही. याउलट स्वाइन फ्लूच्या साथीची कारणमीमांसा करताच ती आशियातील संसर्गयुक्त व्यक्तीपासून किंवा आशियातील पक्ष्यांच्या तिकडे होणाऱ्या स्थलांतरापासून झाली असावी, अशी तर्कटे व्यक्त करीत आहेत. ‘न्यू सायंटिस्ट’ या विख्यात शास्त्रीय नियतकालिकाच्या पत्रकार डेबोरा मँकेझी यांनी वरील सर्व तर्क खोडून काढून हा विषाणू अमेरिकेतच फिरतो आहे आणि त्याला वराहसंवर्धन केंद्रांचा आसरा आहे, हे पुराव्यानिशी दाखवले आहे.
अमेरिकेतील अजून एक संशोधक रिचर्ड वेबी यांनी स्वाइन फ्लू विषाणूत १९९८ मध्ये घडलेल्या जनुकीय बदलाबद्दल पुरावा दिला आहे. त्यावर्षी स्वाइन फ्लू विषाणूत पक्ष्याच्या फ्लू विषाणूतील आरएनए पॉलिमरेज या एन्झाइमचे जनुक सामील झाल्याने स्वाइन फ्लू विषाणूची निर्मिती जलद व्हायला लागली आणि संसर्गक्षमताही वाढली. विषाणूची जलद ‘कॉपी’ करायला वरचे एन्झाइम मदत करते. आपण वापरत आलेल्या सायक्लोस्टाइल मशीन, झेरॉक्स मशीन आणि नंतरचे रोटा प्रिंट यामुळे जशी ‘कॉपी’ करायची प्रगती झाली तशीच प्रगती या एन्झाइम्सच्या प्रकाराने विषाणूंची ‘कॉपी’ करण्यात झाली.
स्वाइन फ्लूचा विषाणू जलद बदलत असल्याने त्याबद्दलची प्रतिकारक्षमता तरुण पिढीत कमी आहे. आपल्या रक्तात मोसमी फ्लूविषाणूविरुद्ध प्रतिपिंडे असली तरी ती नव्या विषाणूचा नाश करू शकत नाहीत. स्वाभाविकच संसर्ग शरीरात स्थिरावू लागतो. या विषाणूविरुद्धची प्रतिकारक्षमता रशियातील काही अतिवृद्ध लोकांत आढळली. त्यांच्यातील प्रतिकारक्षमता जुन्या स्वाइन फ्लूचा सामना करून आलेली होती. स्वाइन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना कसोशीचे प्रयत्न करीत आहे. जास्तीत जास्त कंपन्यांनी लसनिर्माणाचे काम हाती घ्यावे, असे आवाहन त्यांना करण्यात आले आहे. अर्थात लसनिर्माणातील अडचणीही त्यांच्या लक्षात आहेत. मुख्य म्हणजे लस निर्माण झाल्यानंतर ती टोचल्यामुळे योग्य ती प्रतिकारशक्ती निर्माण होत नसल्याचे हऌड च्या लससंशोधन विभागाच्या निदेशिका डॉ. मेरी काएनी यांना आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्या मते एक तर लसीचा डोस तरी वाढवावा लागेल किंवा लसीबरोबर प्रतिकारशक्तिवर्धक (अ‍ॅडज्युव्हंट) काही घटक टाकावा लागेल. या सर्व गोष्टी सिद्ध करण्यासाठी जादा चाचण्या घ्याव्या लागत आहेत. सध्या अमेरिकेत सॅनोफी-अ‍ॅव्हेंटिस, तसेच बॅक्स्टर इंटरनॅशनल अशा मोजक्याच कंपन्या ही लस तयार करत आहेत.
स्वाइन फ्लूच्या निमित्ताने लस निर्माण करणाऱ्या मोजक्या कंपन्यांवर मागण्यांचा अक्षरश: वर्षांव होत आहे. काही कंपन्यांनी उदा. बॅक्स्टर इंटरनॅशनलने नव्या ऑर्डर्स घेणे बंद केले आहे. मुख्य म्हणजे लसीचा मोठा पुरवठा अमेरिकेला आयात करूनच भागवावा लागणार आहे. स्वाइन फ्लूचे तांडव असेच चालू राहिले तर त्या पुरवठादार कंपन्या आपल्या देशातील लोकमनाचा प्रभाव पडून पुरवठा करतील की नाही अशीही शंका काहींच्या मनात डोकावते आहे. एवढे करूनही लस मिळायला वर्षांची अखेर होणार आहे. एकीकडे अमेरिकेतील शाळांची सुटी लवकरच संपून त्या पुढल्या महिन्यात सुरू होणार आहेत. शाळा सुरू होतील, पण लस नसेल आणि मुलांच्या एकत्र येण्याने संसर्गाची शक्यता परत वाढेल, अशा अनेक शंका आरोग्य अधिकाऱ्यांना भंडावत आहेत. वैद्यकीय उपचार करणाऱ्या व्यक्तींवरही स्वाइन फ्लूचा परिणाम होतो आहे. ब्रिटनमध्ये नुकताच एक जनरल प्रॅक्टिशनर स्वाइन फ्लूने गेला. त्यामुळे लस निर्माण झाल्यावर तिचा पहिला पुरवठा आरोग्य कर्मचाऱ्यांना व्हावा, अशी मागणी होत आहे. २५ जुलैला सेंटर्स फॉर डिसिझ कंट्रोलने लस परिणामकारक झाली नाही आणि इतर नियंत्रणाचे मार्ग थिटे पडले तर पुढच्या दोन वर्षांत हजारो हजार अमेरिकनांचे प्राण जाऊ शकतील, असा खळबळजनक इशारा दिला आहे. पण हे सांगताना वाईटात वाईट काय होऊ शकते, असाच त्याचा विचार करावा, असे म्हटले आहे. शेवटी जगातील स्वाइन फ्लूचा प्रसार पाहता साथ आणि संसर्ग रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वागीण सहकार्य हवे जे अजूनही दिसत नाही. योग्य त्या प्रतिरोधक उपायांखेरीज वराह व पक्षी संवर्धन केंद्रांच्या आरोग्याबद्दल सततची नजर हवी. यात उद्योजक आणि शासन यांची तितकीच जबाबदारी आहे. प्रतिबंधात्मक औषधे व लसपुरवठा यांचे योग्य वितरण हवे. सध्या तरी परिस्थिती निवळून स्वाइन फ्लू परत भूतकाळात जाईल, अशी आशा बाळगणे आपल्या हाती आहे.
डॉ. रमेश महाजन

कर्करोगग्रस्त पेशींना मारणारे प्रथिन
कर्करोगाच्या पेशींना मारणारे एक प्रथिन मूळचे मुंबईचे असलेले डॉ.विवेक रांगणेकर यांनी शोधून काढले आहे. केंटुकी विद्यापीठात ते प्रारण वैद्यकाचे प्राध्यापक आहेत. गेल्यावर्षी त्यांनी सर्व प्रकारच्या कर्करोगांचा मुकाबला करणारा महाउंदीर (सुपरमाईस) तयार केला होता. पीएआर-४ हे प्रथिन मानवी शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होते व सगळ्या अवयवात पसरते. कर्करोगाच्या पेशींना मारण्याचा त्याचा गुणधर्म हा पुढे कर्करोगावर चांगली औषधे तयार करण्यासाठी उपयोगी पडू शकतो. सुरुवातीला असे मानले जात होते की, केवळ पीएआर-४ जनुक आविष्कारित असलेल्या पेशींमध्येच हे प्रथिन असते, पण नंतर असे लक्षात आले की, ते शरीरात सर्वत्र उपलब्ध असते. मानव व उंदरांमध्येही कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी ते पेशीवरील संग्राहकांना चिकटून नंतर कर्करोगग्रस्त पेशींवर हल्ला करते. ‘सेल’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून, कर्करोगावरील उपचारांची दिशा त्यामुळे बदलू शकते. रांगणेकर यांनी सांगितले की, पेशींमध्ये हे प्रथिन साठवलेले असते हे पाहून आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. याचा अर्थ कर्करोगाच्या पेशींना मारण्यासाठी बाहेरून पीएआर-४ या जनुकाचा पुरवठा करण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे त्यासाठी विषाणूंचे रिकॉम्बिनंट जनुकही वापरण्याची गरज नाही. रांगणेकर यांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, पीएआर-४ प्रथिनाचे रेणू हे पेशींवरील जीआरपी-७८ या संग्राहकाला चिकटतात. त्यामुळे कर्करोगग्रस्त पेशींमध्ये अ‍ॅपॉपटॉसिस ही प्रक्रिया सुरू होते. यात पेशी आत्महत्या करतात. रांगणेकर यांनी याअगोदरही पीएआर-४ या प्रथिनावर संशोधन केले असून, आता त्यांना ते पेशीतच सापडले आहे. या प्रथिनाच्या रेणूचे वैशिष्टय़ म्हणजे ते कर्करोगग्रस्त पेशींना नष्ट करते, निरोगी पेशींना धक्काही लावत नाही. असे गुणधर्म दाखवणारे इतरही काही रेणू आहेत. ट्रेल नावाचा रेणूही कर्करोगग्रस्त पेशींपुरता असे गुणधर्म दाखवतो, असे सांगण्यात येते. या रेणूमुळेही अ‍ॅपॉपटॉसिसची प्रक्रिया होत असली तरीही त्यात पीएआर-४ हे प्रथिनच महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. रांगणेकर यांनी पीएआर-४ या प्रथिन रेणूचा शोध १९९३ मध्ये सर्वप्रथम लावला. त्यानंतर २००७ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली या रेणूवर अधिक संशोधन करण्यात आले. त्यांनी हाच रेणू उंदराच्या गर्भात टाकून कर्करोगाला प्रतिबंध करणारा सुपरमाईस (महाउंदीर) तयार केला होता. हे प्रथिन असलेला हा उंदीर प्रयोगशाळेतील उंदरांपेक्षा जरा जास्त जगत होता, पण त्याचे वाईट परिणाम मात्र कुठलेही नव्हते. असे असले तरी पीएआर-४ रेणू हा काही मॅजिक बुलेट नाही की, ज्याच्या मदतीने सर्व प्रकारच्या कर्करोग पेशी मारल्या जातात. असे असले तरी कर्करोगावर अतिशय प्रभावी, पण कमीत कमी दुष्परिणाम करणारी औषधे तयार करण्यासाठी या प्रथिनाच्या रेणूचा अभ्यास उपयोगी ठरणार आहे. रांगणेकर यांच्या मते कर्करोगाच्या रुग्णाला सध्याच्या उपचारपद्धतीत बऱ्याच वेदना सहन कराव्या लागतात. ते टाळण्यासाठी नवीन उपचार शोधून काढण्याची गरज आहे.
राजेंद्र येवलेकर