Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

लोकमानस

अभिजात कलांना प्रोत्साहन हे राष्ट्रीय प्रयोजन व्हावे
‘अभिजात स्पर्शासाठी’ हा मुकुंद संगोराम यांचा लेख (२९ जुलै) अनेक ‘भारत-सुहृदां’ची व्यथा सांगून गेला. ‘सौंदर्यद्रोही अर्धवट पुरोगामित्व’ आणि तितकेच ‘सौंदर्यविसरू अर्धवट हिंदुत्व’ यांमधील निर्थक संघर्ष तर ‘सौंदर्यसापेक्ष अभिजातते’च्या विरोधात गेला नसावा? तो संघर्ष मिटवणारे परिपूर्ण पुरोगामित्व भारतात का विकसित झालं नाही? ‘सौंदर्यसापेक्ष अभिजातता’ शाश्वत ठरावी म्हणून भारतात ‘नटराज’ हे प्रतीक निर्माण झाले. सौंदर्यभक्तीची समान बांधीलकी मानणारे ‘तांडव’ या प्रतीकाने आठवते, पण आम्ही काय केले?

 


तुलनेने आधुनिक काळातलेही उदाहरण पाहता येईल. १८५३ मध्ये सर जमशेटजी जीजीभॉयनी ‘सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या स्थापनेसाठी देणगी देताना म्हटले होते, ‘उत्तम प्रशिक्षण उपलब्ध झाले तर भारतीय उत्तम चित्र-शिल्पकार व कारागीर तर बनतीलच; पण त्या प्रशिक्षणातूनच व्यापक उद्यमशीलतेचा मार्ग तयार होईल. त्यासाठीच्या कसोटय़ा उत्तीर्ण करण्यासाठी आवश्यक ते वैचारिक अभिसरण देशात घडले, तर भारत पुन्हा एकदा प्रगत उत्पादक देशांच्या यादीत सर्वोच्च स्थानी पोहोचेल!’ अत्यंत सकारात्मक असा विचार देणाऱ्या या विधानाला भारताच्या संविधानात सर्वोच्च जागा मिळावयास हवी होती. त्या विधानाला अभिप्रेत अशा राष्ट्रीय प्रयोजनाची, वैचारिक अभिसरणाची सोबत देशाच्या सर्व व्यवहारांना, कलांना हवी होती. पण दुर्दैवाने इथे सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतपणा यांची नाळ तुटलेली राहिली. एका मर्यादित अर्थाने ही नाळ ब्रिटिशांच्या मेकॉले छाप शिक्षणाने तोडली. पण मूलत: ती तुटली, जेव्हा भारत सौंदर्यपूजावादी संस्कृतीपासून दूर होत पुराणांतील रहस्यकथांना प्रमाण मानून चालू लागला. त्यामुळेच सौंदर्यपूजक भीमसेनजी आणि सौंदर्यद्रोही हुसेनजी यांची जुगलबंदी (?) घडवून आणण्याचा धाडसी घाट ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ घालू शकली. हा एक ‘यिन-यँग’ प्रयोग होता, असे धरून चालू, पण त्या प्रयोगातून स्वातंत्र्योत्तर काळात विकृतीची वाट धरलेल्या भारतीय चित्रकलेने भीमसेनजींच्या अजोड संगीतातून काय वेचले? नग्न सरस्वती किंवा नग्न भारतमाता चितारण्याची प्रेरणा? इथे मी चित्रकलेतील नग्नतेवर टीका करत नाही, पण नग्नतेचे प्रदर्शन सकारात्मक मानसिकता बाळगणाऱ्या समाजातच क्षम्य ठरते, असे मला वाटते.
भारताला प्रगल्भ सांस्कृतिक धोरण देण्यात पुरोगामी-हिंदुत्ववादी राज्यकर्ते व विचारवंत पूर्णपणे अयशस्वी झाले आहेत. एरवी आपल्या थोर गायकीचा बुलंद कोट उभा करून, एका महत्त्वाच्या काळात, भारतीय संगीत परंपरेला संरक्षण पुरवणाऱ्या आदरणीय भीमसेनजींना ‘भारतरत्न’ मिळण्यात इतका उशीर लागला नसता. सौंदर्यसापेक्ष अभिजाततेचा स्पर्श हरवण्यामागे, घरासमोरील सडा-सारवण, रांगोळ्या, तुळशी वृंदावन, तोरण आदींबाबतच्या सांस्कृतिक धारणा हरवणे हे कारण आहे. त्या धारणांचे भारतीय संगीताशी असलेले नाते आम्ही सांगू शकलो नाही.
रवी परांजपे, पुणे
raviparanjape@gmail.com

शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवा
दहावीचा निकाल जाहीर होऊन दोन महिने होत आले तरी विद्यार्थ्यांच्या कॉलेज प्रवेशांचा ठावठिकाणा नाही. त्यामुळे पालकवर्ग व विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. पण याची जाणीव सरकारला होत नाही याचे आश्चर्य वाटते. शिक्षणमंत्री नव्याने पदावर आले की आपण काही सुधारणा करीत आहोत, या आनंदात वावरत असतात. पण यामुळे पालक व विद्यार्थी यांना कोणत्या दिव्यातून जावे लागेल याची त्यांना कल्पनाच नसते.
याबाबत तीन शिक्षणतज्ज्ञांची समिती नेमून शिक्षण खात्याचा कारभार त्यांच्याकडे सोपवावा. बुद्धिवादी विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करतील व शैक्षणिक घोळ थांबेल.
त्याचप्रमाणे ATKT पेक्षा जे विद्यार्थी मराठी व हिंदी भाषेत नापास होतील त्यांना उत्तीर्ण घोषित करावे म्हणजे त्यांची तारेवरची कसरत थांबेल. कारण एकदा कॉलेज प्रवेश मिळाल्यावर पुन्हा दहावीचा दोन विषयांचा अभ्यास होणे कठीण आहे व मानसिक अवस्था डळमळीत होऊन विद्यार्थ्यांना आपले उद्दिष्ट साधणे कठीण होईल. तेव्हा ATKT चा विचार थांबवून दोन विषयांत १/४ मार्क्‍स असल्यास त्या विद्यार्थ्यांला उत्तीर्ण करावे आणि पालक-विद्यार्थी यांचे धन्यवाद घ्यावेत.
रमाकांत गुळगुळे, विलेपार्ले, मुंबई

दुर्मिळ योग
तारीख-वार रोजचेच असले तरी उद्याचा, ७ ऑगस्टचा एक क्षण जगात आगळा योग ठरणार आहे. उद्याचा १२ वा. ३४ मि. व ५६ से. हा तो क्षण आणि तारीख आहे ७- ८- ९.. ते सरळ रेषेत मांडल्यास १ ते ९ आकडे अशा प्रकारे एका रांगेत येतील- १२. ३४. ५६- ७. ८. ९
असा योग शतकातून एकदाच येतो. तो यापुढे २१०९ साली येईल.
पण येत्या सप्टेंबरमध्ये तारखेचा वेगळा गमतीदार योग येणार आहे, तो म्हणजे ९वा. ९मि. व ९से. ही वेळ ९ सप्टेंबर रोजी एका रेषेत ०९.०९.०९-०९.०९.०९ अशी मांडली जाईल! असा योग मात्र शतकातील पहिल्या १२ वर्षांतच येतो.
शशिकांत काळे, डहाणू

असुनी खास मालक..
‘चिनी, जपानी की नेपाळी’ हा स्वानंद ओक यांचा लेख (२५ जुलै) वाचला. पूर्वाचल प्रदेशावर लेखकाने यथार्थ प्रकाशझोत टाकला आहे.
ईशान्येकडील सात राज्ये आजही सर्वार्थाने उपेक्षित आहेत. काश्मीरबाबत समस्त भारतीय सजग आहेत पण दुर्दैवाने ईशान्येकडील राज्यांबाबत आपण सर्वजण उदासीन आहोत. आंतरराष्ट्रीय जागतिक राजकारण हे बहुतांश ‘काश्मीर’भोवती फिरत असते. ज्या पोटतिडिकेने ‘काश्मीर’बद्दल बोलले, लिहिले, वाचले जाते त्या हिशेबात समस्त भारतीय, विशेषत: सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षदेखील मूग गिळून गप्प बसले आहेत याचे दु:ख होते.
‘काश्मीर’ प्रकरणास इस्रायलने तोडगा सुचविला होता की समस्त भारतीयांना काश्मिरात स्थायिक होण्यास, उद्योगधंदे, नोकरी करण्यास परवानगी द्यावी. हाच तोडगा ईशान्येकडील राज्यांत लावला गेला पाहिजे. पण तेथे आम्हाला पर्यटनाकरिताही पारपत्र (पासपोर्ट) लागतो! या विषयावर एक वेळ काँग्रेससहित समस्त मुस्लिम, तथाकथित पुरोगामी म्हणवून घेणारी विचारवंत, स्वत: समाजवादी मंडळी चक्क मूग गिळून बसली आहेत, पण इतर पक्षांबाबत न बोललेलेच बरे नाही का?
पूर्वाचलबद्दल समस्त भारतीयांची भावना बघता ‘असुनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला’ असेच म्हणावेसे वाटते.
नंदकुमार रोपळेकर, गोरेगाव, मुंबई

..हे तर वंचितावस्थेचे प्रशिक्षण
विजया चौहान यांचे धडगावच्या जीवनशाळांबद्दलचे पत्र वाचून फार वाईट वाटले. प्राथमिक शाळांच्या मान्यतेसाठी इतका खर्च, इतका कालापव्यय होतो, हे समजल्यावर धक्काच बसला. शिक्षणसम्राटांना अपुरा शिक्षकवर्ग, अपुरी साधनसामग्री असलेली, धड स्वरूपाचे हॉस्पिटल जोडीला नसलेली खासगी वैद्यकीय महाविद्यालये आरामात मान्यताप्राप्त करून घेता येतात. पण धडगावला साध्या प्राथमिक शाळांचे काम इतके अवघड का ठरावे?
दु:खाची गोष्ट म्हणजे या जीवनशाळेतील मुलांना शाळा मान्यताप्राप्त नाही, या कारणाने दुपारची खिचडी, पुस्तके या सरकारी सुविधांपासून वंचित राहावे लागते. पुढचे सर्व जीवन त्या बिचाऱ्यांना वंचितावस्थेतच जगायचे आहे.. तेव्हा त्याचे शिक्षण या जीवनशाळेतून त्यांना आत्तापासून मिळावे, असा यामागे सरकारी कारभाराचा उदात्त हेतू असावा!
मीना देवल, प्रभादेवी, मुंबई