Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

कोल्हापुरात संशयित स्वाइन फ्लूच्या रुग्णाचे नमुनेच चुकीच्या पद्धतीने घेतले
कोल्हापूर, ५ ऑगस्ट / विशेष प्रतिनिधी

मुंबई पाठोपाठ पुणे, सातारा इलाख्यावर स्वाइन फ्लूने आपली गडद छाया टाकली असली तरी या रोगाचा मुकाबला करण्यासाठी शासकीय यंत्रणा पुरेशा गांभीर्याने सतर्क झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्हापुरात स्वाइन फ्लूची संशयित रूग्ण म्हणून जाहीर केलेल्या एका तरूणीच्या रक्ताचे व घशातील स्त्रावांचे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने घेतलेले नमुनेच चुकीच्या पध्दतीने घेतल्याचे मत राष्ट्रीय विषाणू संस्थेने व्यक्त केले असून यामुळे रोगाच्या संशयाची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या एका तरूणीवर मात्र आठ दिवस स्वत:च्याच घरात कोंडून घेण्याची वेळ आली आहे.शीतल मनिष सूद या ३५ वर्षीय तरूणीला कोल्हापुरातील प्रशासनाने दिनांक २८ जुलै रोजी तपासणीअंती स्वाइन फ्लूची संशयित रूग्ण म्हणून जाहीर केले. तिच्या रोगाचे निदान करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने तिच्या रक्ताचे व घशातील स्त्रावांचे नमुने घेतले.

व्यापारी महासंघाची आज मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चा
जकातविरोधी आंदोलनाची दखल
सांगली, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी

जकात हटाव आंदोलन तीव्र करण्याचा इशारा व्यापारी महासंघाच्या कोल्हापूर येथील मेळाव्यात देण्यात आला होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यापारी महासंघाबरोबर गुरुवार दि. ६ ऑगस्ट रोजी मुंबई येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर ठरल्याप्रमाणे आंदोलन छेडण्यात येईल, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष अतुल शहा यांनी दिली. या बैठकीत अतुल शहा यांच्याबरोबर ललित गांधी, मोहन गुरुनानी, दिग्विजय कपाडिया, प्रकाश गवळी, सुभाष सारडा, अरुण कल्लोळे, प्रवीण जैन, मानसिंग पवार, अनिल पोखर्णा हे सहभागी होणार आहेत.

बनावट दूध तयार करणारी सात युवकांची टोळी गजाआड
फलटण, ५ ऑगस्ट/वार्ताहर

पैशाच्या हव्यासापोटी विषारी रासायनिक द्रव्य वापरून पाण्यापासून दूध तयार करणारी सात युवकांची टोळी पोलिसांनी गजाआड करीत ३ लाख १० हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. दुधाची फॅट व क्वांटिटी वाढविण्याची नामी शक्कल हुशारीने लढवून पांढरट पिवळसर रंगाचे लिक्वीड तयार करण्याचा फॉम्र्युला वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील समीर सुभाष मेहता (वय ३७) याने तयार केला होता. गेल्या दीड महिन्यापासून त्याचा उद्योग सुरू होता. ३५ एमएल लिक्वीड वापरून तो एक लिटर दूध तयार करीत असे, त्याने अनेक एजंट नेमलेले होते.

परिचारिका संपाने सोलापुरात वैद्यकीय सेवा कोलमडली
सोलापूर, ५ऑगस्ट/प्रतिनिधी

शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेताना परिचारिकांवर मात्र अन्याय केल्यामुळे महाराष्ट्र शासकीय परिचारिका संघटनेने बुधवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात सोलापुरातील शासकीय रुग्णालयातील सर्व परिचारिका सहभागी झाल्यामुळे वैद्यकीय सेवा कोलमडून रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.

वाळव्यात विधानसभेसाठी काँग्रेस महाआघाडीचा प्रयोग करणार
इस्लामपूर, ५ ऑगस्ट/ वार्ताहर

वाळवा तालुक्याच्या राजकारणात ‘हिंद केसरी’ ठरलेल्या गृहमंत्री जयंत पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीत चितपट करण्यासाठी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात एकास एक लढत व्हावी म्हणून सर्व विरोधकांना एकत्र आणून येथेही ‘महाआघाडी’चा प्रयोग करण्याचा निर्णय येथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या व्यापक मेळाव्यात घेण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वाळवा तालुक्यातील काँग्रेसची रणनीती ठरविण्यासाठी येथील पवार मंगल कार्यालयात तालुक्यातील काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक मंगळवारी रात्री आयोजित करण्यात आली होती.

नगरसेवक-पदाधिकाऱ्यांमधील वाद संपुष्टात
कोल्हापुरात प्रत्येक नगरसेवकाला सात लाखांचा विकासनिधी
कोल्हापूर, ५ ऑगस्ट / विशेष प्रतिनिधी

शहरातील गावठाण व उपनगरीय भागातील नगरसेवकांना प्रत्येकी सात लाख रुपयांचा विकासनिधी आणि प्रश्नथमिक शिक्षण मंडळाला एक कोटी रुपयांची तरतूद असे फेरनियोजन केल्यानंतर बुधवारी कोल्हापूर महापालिकेत दोन्ही आघाडय़ांतील पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्यादरम्यान उफाळून आलेला असंतोष अखेर शांत झाला. विकासनिधीसाठी दोन्ही आघाडय़ांतील नगरसेवकांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे पालिकेतील पदाधिकाऱ्यांना मात्र चपराक बसली आहे.

--------------------------------------------------------------------------

सारा खेळ प्रेमाचा, तरुणाईच्या घसरण्याचा, सावरण्याचा!
‘प्रेम’ या अडीच अक्षरी संकल्पनेने कथा, कादंबऱ्या, नाटक, चित्रपट या सगळ्यांना नेहमीच विषय पुरवला आहे. सध्याच्या दूरचित्रवाणीवरील वाहिन्यांच्या कल्लोळात व माहितीच्या विस्फोटात ‘प्रेम’ या विषयाबद्दल नको तेवढी आणि नको त्या वयात प्रचंड अशी माहिती आदळत असते. सभोवतालचे वातावरण इतके बदलले आहे की साधी, सरळ मुलेसुद्धा प्रलोभनाच्या जाळ्यात भोवंडून जातात. जीवनातील स्पर्धा आणि रोजचा संघर्ष यामध्ये आई वडील आपल्या व्यापात इतके हरवून गेले आहेत की मुलांचे काय चालले आहे.

‘आनंदडोह’- एक अप्रतिम प्रयोग!
नगरच्या चेरिश थिएटर्सच्या वतीने दिग्दर्शक योगेश सोमण यांच्या ‘आनंदडोह’ या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. तुकोबा इंद्रायणीच्या डोहात आपली गाथा बुडवितात. तेरा दिवसांनी कोरडीठाक गाथा डोहातून वर येते. या तेरा दिवसांतील तुकोबांच्या मानसिक आंदोलनाचा नाटय़ाविष्कार म्हणजे ‘आनंदडोह’! त्याविषयी.. हाती टाळ-चिपळय़ा, मुखी विठुनामाचा गजर अन् अंतरी विठ्ठलाच्या दर्शनाचा ध्यास घेतलेल्या तुकोबांच्या कवनांना, गाथेला धर्ममरतडांनी चौर्यकर्म ठरवले. त्यामुळे व्यथित झालेले तुकोबा इंद्रायणी नदीकाठी येतात. ‘तुझ्या अस्तित्वाची प्रचिती दे, नाहीतर माझी ही निरुपयोगी काया तरी झडू देत’ असे अंतिम आव्हान देत तुकोबा उराशी कवटाळलेली गाथा इंद्रायणीच्या डोहात भिरकावतात.

पुन्हा एकदा-‘ये जिंदगी उसी की है’
सत्तरेक हजार हिंदी चित्रपट गीतांमधून सर्वात श्रेष्ठ, अगदी पहिल्या नंबरच्या गाण्यांची निवड करायची असं ठरवलं तर त्या स्पर्धेत जी काही गाणी असतील त्यात ‘ये जिंदगी उसीकी है’ हे ‘अनारकली’ चित्रपटामधलं गाणं असणार हे नक्की. त्यामुळेच त्याच्या चालीच्या श्रेयाबाबत अलिकडे काही वाद निर्माण झाला असता सी. रामचंद्र यांचे चाहते व हाडाचे गानरसिक खूपच हळवे झाले. आज संगीतकार रोशन व सी. रामचंद्र दोघेही प्रतिवाद करायला हयात नाहीत. त्यामुळेच पं. हृदयनाथांनी सांगितलेल्या (चालीतल्या सत्तर टक्के श्रेयाच्या) आठवणींवर आयडिया सारेगामापाच्या दर्शकांचे आक्षेप आहेत. मनापासून ठरवले तर लतादीदीच खरं काय ते सांगू शकतील किंवा लिहू शकतील, दुसरं कुणीही नाही. अशा वेळी लिखित व प्रकाशित साहित्य हाच मोठा आधार असतो. सुदैवाने दक्षिण मुंबईत एन.सी.पी.ए.च्या वाडिया लायब्ररीमध्ये पुस्तके व मिळतील तितकी जुन्या दुर्मिळ वर्तमानपत्रातली कात्रणे मेहनतीने व नीटपणे जपून ठेवलेली असून अभ्यासकांना सदैव उपलब्ध असतात. त्यात या गाण्याच्या चालीविषयी काही जुनी माहिती नव्याने मिळाली. या वादाच्या संदर्भात ती जाणून घेणे आवश्यक आहे.खरं तर या माहितीचा उगम लतादीदींच्या एका जुन्या लेखात आहे.

मन चिंब चिंब करणारा ‘अक्षर पाऊस’
आजवरच्या अजरामर

गीत-संगीताची आठवण जागविणारा आणि शब्द, स्वर, सादरीकरण यांचा उत्कट आनंद देणारा कार्यक्रम म्हणजे कवी-गीतकार-संगीतकार वासुदेव फाटक यांचा ‘अक्षर पाऊस’. तुम्ही गीतांवर-कवितेवर प्रेम करता? शास्त्रीय बैठकीवर आधारलेली संगीतरचना आपल्याला भावते? शब्द-स्वर आणि गायन यांना आपल्या कलाजीवनात स्थान आहे? आपण जाणते रसिक आहात? जुन्या संगीताविषयी आदर आणि नव्या चांगल्याचे सुस्वागत करण्याची आपल्या मनाची तयारी आहे? या प्रश्नांची जर होकारार्थी उत्तरे असतील तर वासुदेव फाटक यांनी शब्दबद्ध आणि स्वरबद्ध केलेला ‘अक्षर पाऊस’ हा गीतसंगीताचा कार्यक्रम आपण आवर्जून अनुभवायला हवा.
--------------------------------------------------------------------------
स्वाइन फ्ल्यूबाबत सांगलीत दक्षतेचे आदेश
सांगली, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी

राज्यात काही ठिकाणी स्वाइन फ्ल्यूचे रूग्ण आढळल्याने सांगली जिल्ह्य़ातील सर्व प्रश्नथमिक आरोग्य केंद्रांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वाईन फ्ल्यू या रोगाबाबत जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले आहे. स्वाईन फ्ल्यू या संसर्गजन्य रोगाने पुण्यात एका १२ वर्षीय बालिकेचा बळी गेल्यामुळे ही दक्षता घेण्यात येत आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्य़ातील सर्व आरोग्य केंद्रामध्ये दक्ष राहण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक वाघमारे यांनी दिले आहेत. या रोगाचा रूग्ण कसा ओळखावा, त्याच्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत एक कार्यशाळा जिल्हा परिषदेत घेण्यात आली. या कार्यशाळेस जिल्ह्य़ातील सर्व प्रश्नथमिक व ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. डॉ. वाघमारे यांनी माहिती देताना सांगितले की, रूग्णास सर्दी, ताप, अंग दुखी, डोकेदुखी अशी लक्षणे असतील, तर स्वाईन फ्ल्यूची लक्षणे समजावीत व त्यानुसार अशा रूग्णांवर उपचार करावेत. शंका आल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी अथवा जिल्हा रूग्णालयाशी संपर्क साधावा.

पवनचक्क्य़ांच्या करवसुलीसाठी श्रमिक मुक्ती दलाचा मोर्चा
सांगली, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी

पवनचक्क्य़ांच्या मालकांकडून ग्रामपंचायतीचा कर वसूल करण्याची मोहीम वेगाने राबविण्यात यावी, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.
शिराळा तालुक्यातील आरळा, गुढे पाचगणी या गावांप्रमाणेच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार प्रत्येक पवनचक्कीमागे २७ हजार ५०० प्रमाणे ग्रामपंचायत कर वसूल करण्याची मोहीम वेगाने राबविण्यात यावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर यांनी केली. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संबंधित निर्णय घेतलेला होताच, परंतु त्याप्रमाणे वसुली झालेली नाही. त्यामुळे पवनचक्क्याग्रस्त शेतकऱ्यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून तातडीने वसुली करण्यात यावी. पवनचक्क्य़ांनी भाडेपट्टा वाढवून द्यावा, तसेच वाहतुकीमुळे झालेल्या रस्त्याचे नुकसान भरून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. या मोर्चात साहेबराव पाटील, शिवाजी शिंदे, तासगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रभाकर पाटील, कादर नायकवडी, अजित खराडे, बर्डे गुरूजी यांच्याबरोबर शिराळा, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ या तालुक्यातील शेतकरी मोठय़ा संख्येने आले होते.

देवस्थान जागेतील अतिक्रमण हटविण्यासाठी बेमुदत उपोषण
सांगली, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी

मोहित्यांचे वडगाव येथील लक्ष्मी देवस्थानच्या जागेत झालेले अतिक्रमणे काढण्यात यावीत, या मागणीसाठी नागरिकांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरूवात केली.
आंदोलकांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे, वडगाव येथील बौध्द समाजाकडे असणारे लक्ष्मी देवस्थानच्या जागेवर गावातील नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. यामध्ये असणारी विहीर बेकायदेशीररित्या कागदोपत्री हस्तांतर करून नावावर करून घेतली आहे. ती त्यांच्याकडून काढण्यात यावी. यापूर्वी या अतिक्रमणासंदर्भात कडेगाव तहसिलदार व विटा भूमी अभिलेख यांच्याकडे चौकशीसाठी मागणी केली होती. अधिकारी चौकशीला आल्यानंतर सदरची जागा मृत्यूपत्राच्याआधारे घेतली असल्याचा निर्वाळा चंद्रकांत मोहिते व दत्ताजी मोहिते यांनी दिला होता. प्रत्यक्षात हे मृत्यूपत्र कोणी केले, याचा उल्लेख नाही. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली. अतिक्रमण करून देवस्थानची जागा हडप करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या उपोषणामध्ये परशुराम काळे, शशिकांत काळे, दीपक लाटे, संजय भिसे, सुदाम भिसे, विठ्ठल भिसे यांच्यासह गावातील नागरिक सहभागी झाले आहेत.

संपकरी पालिका कर्मचाऱ्यांनी बाह्य़ रुग्ण विभाग बंद पाडला
इचलकरंजी, ५ ऑगस्ट / वार्ताहर

सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळावे यासाठी सुरू असलेले आंदोलन इचलकरंजीतील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आज पुढचे पाऊल टाकत अधिक तीव्र केले. नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीने आय.जी.एम. रूग्णालयातील ओपीडी विभाग काही काळ बंद पाडला तर एका संघटनेने मोटरसायकल वरून फेरी काढली. ६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून बैठकीकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सहाव्या वेतन आयोगाबरोबरच विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय विविध संघटनांनी घेतला आहे. महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संवर्ग संघटनेने आज गॅरेज विभागाच्या वतीने मोटरसायकल रॅली काढली होती. फेरीमध्ये एक बोधचिन्ह लावले होते. पाणी बंद, चाक बंद, झाडू बंद, लेखणी बंद, पाना बंद असा मजकूर त्यावर लिहिला होता. या फेरीत विकास लगारे, कृष्णात गोंदुकुप्पे, प्रकाश बुगड, पांडुरंग कोकरे, संजय कांबळे हे सहभागी झाले होते. नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीने जुन्या नगरपालिकेच्या दारात तोंडाला काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला. नगरपरिषद समन्वय समितीच्या वतीने आय.जी.एम मधील ओपीडी विभाग काही काळ बंद पाडला. आंदोलनात शंकर अगसर, हरिबा माळी, नरेंद्र देशपांडे, आनंदा गुरव, अरविंद पाटील यांनी सहभाग घेतला तर नगरपरिषद कर्मचारी संवर्ग संघटनेने पालिकेच्या दारातच ठाण मांडले होते.

गुणवंत क्षेत्रीय अधिकारी पुरस्कार फरास यांना
सांगली, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाच्यावतीने क्षेत्रीय विभागात असामान्य काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना दिला जाणारा गुणवंत क्षेत्रीय अधिकारी पुरस्कार सांगली जिल्हा परिषदेकडील ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग क्रमांक एकचे शाखा अभियंता असगरअली सिकंदर फरास यांना जाहीर करण्यात आला आहे. असगरअली फरास यांनी राज्य शासनाचे अनुदान न घेता १०० टक्के लोकवर्गणी उभी करून एक कोटी रूपयांच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. तसेच कमी खर्चात दुधगाव, सावळवाडी व माळवाडी नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. त्यांनी केलेल्या या असामान्य कामाची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. यापूर्वी सांगली जिल्हा परिषदेने आदर्श अभियंता हा पुरस्कार देऊन फरास यांचा गौरव केला आहे. सध्या फरास हे महाराष्ट्र जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे जिल्हा सचिव म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कर्मचारी आत्महत्येच्या चौकशीसाठी मोर्चा
सांगली, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी

महापालिकेचा अस्थायी कामगार शिवाजी आकनुरे याच्या आत्महत्येची चौकशी करावी, तसेच त्याच्या वारसांना सेवेत घ्यावे, या मागणीसाठी शंकर पुजारी यांनी कामगारांसह महापालिकेवर मोर्चा काढला. आयुक्त दत्तात्रय मेतके यांनी मुख्यमंत्र्यांच्या निधीतून मदत करण्याचे आश्वासन दिले.
महापालिकेचा अस्थायी कर्मचारी शिवाजी जगन्नाथ आकनुरे यांनी काल सेवेत कायम करत नसल्याच्या कारणावरून महापालिकेतच विष प्रश्नशन करून आत्महत्या केली होती. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच आकनुरे याच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी घ्यावे, या मागणीसाठी शंकर पुजारी यांनी महापालिकेवर बुधवारी मोर्चा काढला. आयुक्त दत्तात्रय मेतके यांनी आकनुरे यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांच्या निधीमधून मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच आकनुरे यांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत घेण्याची बाब ही धोरणात्मक असून त्यावर निर्णय घेता येत नाही. परंतु त्यांच्या वारसांना मानधनावर घेता आले, तर घेऊ, असे सांगून आयुक्त म्हणाले, सदरची घटना दुर्देवी असल्याची खंत व्यक्त करून महापालिकेकडे असणाऱ्या सर्व बदली कामगारांसंदर्भात कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी शासनाकडे मार्गदर्शन मागण्यात येईल. या वेळी उपायुक्त विजय कुलकर्णी, सहायक आयुक्त सुनील नाईक, जनसंपर्क अधिकारी चंद्रकांत आडके उपस्थित होते.

बादलीत पडून बालकाचा मृत्यू
इचलकरंजी ५ ऑगस्ट / वार्ताहर

खेळत असताना बादलीत पडून एक वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. नीरज सुनील प्रसादगौड असे त्याचे नाव आहे. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास इचलकरंजीतील जे.के.नगर येथे ही घटना घडली. इचलकरंजीतील जी.के.नगर येथील बालाजी पोहे फॅक्टरी येथे दिनकर खांडेकर यांच्या घरात सुनील प्रसाद गौड हे भाडय़ाने राहतात. मुळचे उत्तर प्रदेशातील दुलरू येथील सुनील प्रसाद हे यंत्रमाग कामगार म्हणून गेल्या पाच वर्षापासून इचलकरंजी येथे आहेत. पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी गावाहून आपली पत्नी आणि दोन मुलांना इचलकरंजी येथे आणले होते. आज सकाळी घरात खेळत असताना नीरज हा पाण्याच्या बादलीत पडला. काही वेळाने मुलाच्या आईच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर बाहेर काढून त्याला तातडीने आय.जी.एम. रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.