Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९


रुग्णालयांमध्ये गर्दी आणि संताप
पुणे, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

‘अहो, माझ्या मुलाला ताप, खोकला नि सर्दी आहे.. खासगी डॉक्टरांनी तुमच्याकडे तपासणीसाठी पाठवलंय.. तुम्ही म्हणता त्याला काही झाले नाही.. म्हणजे नेमके खरे कोणाचे समजायचे..?’, ‘सकाळपासून रांगेत उभा आहे मुलीला घेऊन.. ती तापलेली आहे.. तिची तुम्हाला तपासणी करावीच लागेल..’, ‘तुमच्या ओळखीच्या नागरिकांच्या मुलांची तपासणी पहिल्यांदा करता..

संपकरी बॅंक कर्मचाऱ्यांचा आजपासून ‘लाँग वीकएण्ड!’
मुंबई, ५ ऑगस्ट/ व्यापार प्रतिनिधी

भारतीय बँक महासंघाबरोबर वेतनवाढीविषयक वाटाघाटी फिसकटल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने ६ व ७ ऑगस्ट रोजी दोन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे बँकांचा ‘वीकएण्ड ब्रेक’ हा यंदा गुरुवारपासूनच सुरू होईल, तर धनादेश वठून पैसे हाती पडण्यासाठी ग्राहकांना पुढच्या बुधवापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

बाळ ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन मुंबई, ठाण्यात!
मुंबई, ५ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

मराठी माणूस आणि शिवसेना यांचे द्वैत कसे जमले ? महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतरही मराठी माणसाच्या मुंबईत होत असलेल्या घुसमटीला कोणी आवाज दिला ? १३ ऑगस्टपासून मुंबई आणि ठाण्यात आयोजिल्या जाणाऱ्या ‘मार्मिक’ प्रदर्शनात या अशा प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत ! शिवसेनेच्या जन्माआधीच्या घडामोडींत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ‘मार्मिक’ च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांच्या निवडक व्यंगचित्रांचे प्रदर्शन मुंबईत रवींद्र नाटय़ मंदिरात तर ठाण्यात गडकरी रंगायतनमधील नवीन कलादालनात आयोजिण्यात येणार आहे !

‘मुझे भी कोई राखी बांधने आयेगा क्या?
कसाबची विचारणा

मुंबई, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

सीएसटी स्थानक, कामा रुग्णालय परिसर, मेट्रो जंक्शन आणि गिरगाव चौपाटी येथे अनेक निष्पापांचे बळी घेणारा पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला आज त्याच्या हातावर राखी बांधायला कोणी येईल का? याचे वेध लागले होते. न्यायाधीश, सुरक्षेसाठी असलेले पोलीस, वकील आणि पत्रकार यांच्या हातावर रंगीबेरंगी राखी बांधल्याचे पाहून कसाबने अखेर आपल्या वकिलांकडेच ‘मुझे भी कोई राखी बांध ने आयेगा क्या’, अशी विचारणा केली.

मुद्रांकातून महसूल चोरीवर राजरोस शिक्कामोर्तब
सोपान बोंगाणे , ठाणे, ५ ऑगस्ट

देशभरात गाजलेला हजारो कोटींचा तेलगी स्टँप घोटाळा हळूहळू विस्मरणात जात असतानाच त्याच्या स्मृती पुन्हा ताज्या करणारा दस्तऐवज नोंदणीतील कोटय़वधी रुपयांचा दुसरा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड होण्याची चिन्हे आहेत. महसूल विभागातील अधिकारी आणि बडय़ा बिल्डरांच्या संगनमताने मुद्रांक शुल्क नोंदणीत नियमापेक्षा कमी मुद्रांक शुल्क लावून शासनाच्या तिजोरीला करोडो रुपयांची बिळे पाडण्याचा ‘मूषक उद्योग’ मुद्रांक शुल्क विभागात सुरू असल्याचे पुरावे हाती लागले आहेत. त्यातून गेल्या चार वर्षांंत एकटय़ा ठाणे जिल्ह्यातच नोंदणी झालेल्या दस्तांच्या व्यवहारात शासनाचे सुमारे १५० ते २०० कोटी रुपयांची आर्थिक नुकसान झाल्याचा संशय त्यातील जाणकार व्यक्त करीत आहेत.

‘जैश’, ‘लष्कर’ आदी २५ संघटनांवर पाकिस्तानची बंदी
इस्लामाबाद, ५ ऑगस्ट / वृत्तसंस्था

लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-महंमद आणि जमात-उद-दवा या तीन दहशतवादी संघटनांसह २५ धार्मिक संघटनांवर पाकिस्तान सरकारने बंदी घातली आहे. अंतर्गत मंत्रालयाच्या प्रवक्त्याने रात्री ही माहिती दिली. बंदी घालण्यात आलेल्या संघटनांची यादी जाहीर करण्यात आली असून, ‘सुन्नी तेहरिक’ या संघटनेवर बंदी घालण्यात आली नसली तरीही तिच्यावर कडक नजर ठेवण्यात येणार आहे.बंदी घालण्यात आलेल्या इतर संघटनांमध्ये तेहरिक-ई-तालिबान पाकिस्तान, तेहरिक-ई-निफाज-ई-शरिया-मोहम्मदी, लष्कर-ए-जांघवी, इस्लामिक स्टुडण्टस् मूव्हमेण्ट, खैर-उन-निसार इंटरनॅशनल ट्रस्ट, इस्लामी तेहरिक-ई-पाकिस्तान, लष्कर-ए-इस्लाम, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी, जमी-उन-निसार, खादम इस्लाम आणि मिल्लत-ए-इस्लामिया पाकिस्तान यांचा मुख्यत्वे समावेश आहे. यापैकी बहुतांश संघटनांचा पाकिस्तानातील दहशतवादी हल्ले आणि आत्मघाती बॉम्ब हल्ल्यांमध्ये हात आहे. भारतात २००१ साली संसद भवनावर झालेला दहशतवादी हल्ला, तसेच मुंबईवरील हल्ला या घटनांमध्ये जमात-उद-दवा, लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-महंमद या संघटनांचा हात असल्याचे भारतानेही पूर्वी अनेकदा म्हटले आहे. जमात-उद-दवा ही संघटना लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवादी कारवायांची अंमलबजावणी करण्यात सर्वात पुढे असल्याचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाने जाहीर केल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तानने जमात-उद-दवावर बंदी घातलेली होतीच. याशिवाय २००२ मध्ये लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-महंमद यांच्यावरही बंदी घालण्यात आली होती.

एक कोटी रुपयांचे लाच प्रकरण
सरबज्योत सिंगला न्यायालयीन कोठडी
मुंबई, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष बुटासिंग यांचा मुलगा सरबज्योत सिंग याच्यासह अन्य तीन आरोपींना अधिक काळ आपल्या ताब्यात ठेवण्याची मुभा द्यावी, ही सीबीआयने केलेली विनंती आज विशेष न्यायालयाने फेटाळली आणि या आरोपींची १२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सरबज्योत आणि अन्य तीन जणांना लाचखोरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या सर्व आरोपींनी केलेल्या जामीनअर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.सदर लाचखोरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तपास यंत्रणेला पुरेसा वेळ देण्यात आला असल्याचे कारण देऊन विशेष न्यायालयाने आरोपींना अधिक काळ सीबीआयच्या ताब्यात देण्यास नकार दिला. सीबीआयला अधिक चौकशीची गरज नाही, असे आपले मत असल्याचे न्या. एस. पी. हयातनगरकर म्हणाले.सरबज्योत सिंग याच्यासह अनुप बेगी, दुखसिंग चौहान आणि मदन सोळंकी यांना अटक करण्यात आली आहे. नाशिक येथील घंटागाडी कंत्राटदार रामराव पाटील याचे एक प्रकरण राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगापुढे प्रलंबित असून ते प्रकरण बंद करण्यासाठी एक कोटी रुपयांची मागणी सरबज्योत सिंग आणि अन्य आरोपींनी केली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पाटील यांनी बँकेतून १०० सफाई कामगारांच्या नावावर त्यांची परवानगी न घेताच १० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि ती रक्कम परत करण्यास पाटील असमर्थ ठरले. सरबज्योत सिंग चौकशीत सहकार्य करीत नसल्याचा आरोप सीबीआयने केला असून सरबज्योत याने गुन्ह्यांत सहभाग असल्याच्या आरोपाचा इन्कार केला, असे सीबीआयने न्यायालयास सांगितले.

काठमांडूत कारखाली चिरडून सहा भारतीय ठार
काठमांडू, ५ ऑगस्ट/पी.टी.आय.

एका १५ वर्षीय मुलाची वैद्यकीय तपासणी करून बाहेर पडलेल्या सहा भारतीयांचा एका भरधाव कारने ठोकरल्याने मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. मृतांमध्ये मुलाचाही समावेश आहे.
हे सर्व सात भारतीय नागरिक मूळ बिहारमधील असून सध्या ते काठमांडूत राहात आहेत. या मुलाला बीर रुग्णालयात तपासणीसाठी ते घेऊन गेले होते. रुग्णालयातून बाहेर पडल्यावर पदपथावरून जात असताना एका कारने त्यांना ठोकरले. मध्यरात्री पाऊणच्या सुमारास ही घटना घडली. ठोकर देऊन कार न थांबता निघून गेल्याने घटनास्थळी थोडय़ाच वेळात मोठा जमाव जमला. तर सकाळी ही घटना कळल्यावर अपराध्यांना पकडावे या मागणीसाठी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. अपघातग्रस्त कार पोलिसांना सापडली आहे. मात्र तिच्या चालकाचा पत्ता अद्याप लागलेला नाही. या अपघातात जखमी व मृत पावलेले सगळेजण बिहारमधील सीतामढी व मोतिहारी जिल्'ाांतील रहिवाशी आहेत.

 

प्रत्येक शुक्रवारी