Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

मराठवाडय़ाचे हक्काचे पाणी अडकले लवादाच्या निर्णयात
उस्मानाबाद, ५ ऑगस्ट/वार्ताहर

मराठवाडय़ाच्या हक्काचे २५ अब्ज घनफुट पाणी देण्याचा निर्णय कृष्णा पाणी तंटा वाटप लवादात अडकला असल्याची कबुली जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी आज दिली. तथापि लवादासमोर चांगले वकील आणि तंत्रज्ञ अभियंते यांची नेमणूक करून मराठवाडय़ाला २१ टीएमसी पाणी देण्यास राज्य सरकार बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले. भूम व परंडा तालुक्यात भूमिपूजनाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी राहुल मोटेंसाठी थेट प्रचार केला. जाहीर सभेत आणि पत्रकार बैठकीतही त्यांनी २५ टी.एम.सी. पाणी मराठवाडय़ाला देण्यासंदर्भात घेतलेला निर्णय बदलणार नसल्याचे सांगितले.

सुमारे २९ तालुक्यांत दुष्काळजन्य परिस्थिती!
* सरासरीच्या तुलनेत केवळ २६ टक्के पाऊस
*४७९ गावे, २६६ वाडय़ांवर टँकर वारी
* १५ दिवसांपासून पाऊस गायब
* ४ धरणे कोरडी
औरंगाबाद, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवडय़ात उत्तम पाऊस झाल्याने उत्साहित बळीराजाने पेरण्या केल्या खऱ्या, मात्र गेल्या १५ दिवसांपासून थोडादेखील पाऊस नसल्याने आलेल्या पिकांविषयी साशंकता निर्माण झाली आहे. पावसाच्या मोठय़ा अंतरामुळे विभागातील आठही जिल्ह्य़ात दुष्काळासारखी परिस्थिती बनत आहे.

विलासरावांचे चिरंजीव अमित देशमुख यांना उच्च न्यायालयाची नोटीस
औरंगाबाद, ५ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

लातूर जिल्ह्य़ातील वैशालीनगरच्या विकास सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमित विलासराव देशमुख यांचे संचालकपद रद्द करून त्यांना अपात्र ठरवावे अशी विनंती करणाऱ्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. पी. व्ही. हरदास व न्या. ए. व्ही. पोतदार यांनी सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावल्या आहेत.

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बोर्डीकर, उपाध्यक्षपदी आमदार देशमुख
परभणी, ५ ऑगस्ट/वार्ताहर

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व उपाध्यक्षपदी आमदार सुरेश देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे जिल्हा बँक काँग्रेसच्या ताब्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्य़ाला उपाध्यक्षपद न मिळाल्यामुळे सभासदांमध्ये निराशा पसरली असून जिल्ह्य़ातील संचालकांनी नाराजी व्यक्त करताना बोर्डीकरांनी दिलेला शब्द पाळला नाही,

‘‘ब्लॅकमेलिंग’ हेच संजय जगताप यांचे काम’
स्थायी समिती सभापतींचे विरोधी पक्ष नेत्यावर गंभीर आरोप
औरंगाबाद, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते संजय जगताप यांनी स्थायी समितीचे सभापती अब्दुल साजेद यांच्यावर काल भरसभागृहात आरोप केले होते. साजेद यांनी त्यांच्या आक्षेपाला आज प्रत्युत्तर दिले. ‘दिवसभर पैसे मागत फिरणे एवढेच जगताप यांचे काम आहे. त्यांनी अनेक अधिकाऱ्यांनाही पैशांसाठी त्रस्त केले आहे. गेल्या दहा महिन्यांपासून त्यांच्या ब्लॅकमेलिंगचा त्रास मी सहन करतोय. काल सभागृहातही त्यांनी पैसे मागितले होते.

ऋतुपर्ण, सानिका, तेजस, चैतन्य, मैत्रेयी, हिमांशु, अवनी यांना दुहेरी मुकुट
औरंगाबाद जिल्हा अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा
औरंगाबाद, ५ ऑगस्ट/खास प्रतिनिधी
जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे आयोजित व मोर्गनाईट कुर्सीबल इंडिया लिमिटेडतर्फे प्रायोजित औरंगाबाद जिल्हा अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत ऋतुपर्ण कुलकर्णी, सानिका उणे, तेजस चौधरी, अवनी डबरी, मैत्रेय बक्षी, चैतन्य भावे, हिमांशु गोडबोले यांनी आपापल्या गटात दुहेरी मुकुटाचा मान पटकाविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बॅडमिंटन सभागृहात रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ऋतुपर्ण कुलकर्णीने विजेतेपद मिळविले.

गावपातळीवर जाऊन सर्वेक्षण करा
राज्यमंत्री वरपूडकरांच्या अधिकाऱ्यांना सूचना
परभणी, ५ ऑगस्ट/वार्ताहर
जिल्ह्य़ात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाचा बोजवारा, पाणीटंचाई, चारा टंचाईच्या उपाययोजनांबाबत असलेली अनास्था, सद्यस्थितीत अधिकाऱ्यांमध्ये असलेली बेफिकिरी याचे दर्शन आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पहायला मिळाले. कृषी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांनी अधिकाऱ्यांना दिनांक १२ ऑगस्टपर्यंत गावपातळीवर जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या.

वृक्षवेडा सुधाकर; चौपदरीकरणात अडथळा
निर्माण करणाऱ्या वटवृक्षाचे पुनरेपण
अंबाजोगाई, ५ ऑगस्ट/वार्ताहर
‘प्रेम हे आंधळंअसतं’ या पाडगावकरांच्या कवितेचा प्रत्यय नुकताच अंबाजोगाईकरांना अनुभवायास मिळाला. शहरातील मुख्य रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम जोमात सुरू असून, या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या वृक्षाची कत्तल करण्यात येत आहे. याची कुणकुण वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांना लागताच त्यांनी शहर गाठून वृक्षतोड थांबविण्याची विनंती केली आणि संबंधित गुत्तेदाराने वटवृक्षाचे झाड जशास तसे यंत्राने काढून त्याचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात पुनरेपण केले. मात्र वृक्षमित्र सुधाकर शासनाकडून दुर्लक्षितच राहिला.

बँक अधिकारी देतात ग्राहकांना खोटी माहिती!
कर्जाची परतफेड होत नसल्याची भीती
लातूर, ५ ऑगस्ट/वार्ताहर
शैक्षणिक कर्ज घेणारी मंडळी पैसेच भरत नाहीत त्यामुळे वरिष्ठांना खुलासे करावे लागत असल्यामुळे तारण असल्याशिवाय शैक्षणिक कर्ज न देण्याची बँकेची भूमिका असल्याचे बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक विजयकुमार चौडेकर हे ग्राहकांना सांगत आहेत.गरीब वगैरे आम्हाला माहीत नाही, तुम्हाला परीक्षेत किती मार्क पडले याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही, कर्ज पाहिजे असेल तर तारण द्या, पालकांचा जामीन द्या अथवा कोणत्या त्रयस्थाचा जामीन द्या त्याशिवाय कर्ज मिळणारच नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे अनेक गरजू अस्वस्थ झाले.

शिक्षकांनी शिक्षा केल्यामुळे विद्यार्थिनी बेशुद्ध झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
औरंगाबाद, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी

अभ्यास केला नाही म्हणून शिक्षकांनी इयत्ता सातवीतील विद्यार्थिनीला शंभर बैठका मारण्याची शिक्षा दिली. यामुळे ताप येऊन मुलगी बेशुद्धावस्थेत गेल्याचा आरोप सुलीभंजन येथील मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. पूजा तुळशीराम जाधव (वय १३) असे त्या विद्यार्थिनीचे नाव असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.पूजा ही जिल्हा परिषदेच्या खुलताबाद येथील शाळेत इयत्ता सातवीत शिकते. शुक्रवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षकांनी पूजासह काही विद्यार्थ्यांंना शिक्षा केली. शंभर बैठका करण्याचे पूजाला सांगण्यात आले होते. तिने ही शिक्षा पूर्ण केली. सायंकाळी ती घरी आली असता तिने पाय दुखत असल्याची तक्रार केली शिवाय अंगात तापही आला होता. रात्री तिचा ताप वाढला. गावातील एका डॉक्टरला दाखविण्यात आले होते. तेथे त्याने मलेरिया झाल्याचे समजून काही औषधे दिली होती. मात्र रात्रीतून ताप वाढला म्हणून सकाळी तिला येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

अनमोल नब्बालला १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
श्रद्धा छाजेड खूनप्रकरण
वसमत, ५ ऑगस्ट/वार्ताहर

पुणे येथील सिमटेक कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या श्रद्धा छाजेड खूनप्रकरणी आरोपी अनमोल स्वर्गसिंग नब्बाल यास वसमत न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत. १९ जुलैला वसमत-कवठा रस्त्यावरील एका कडेला झुडपात एका अनोळखी तरुणीचा मृतदेह सापडला होता. पण या मुलीच्या मृत्युदेहाजवळ कोणत्याही प्रकारचे पुरावे न आढळल्याने पोलिसांनी या मुलीचा फोटो व तिचे संपूर्ण वर्णन महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांना ई-मेलद्वारे पाठविले. त्यामुळे पुणे पोलिसांना या ई-मेलवरून या मुलीची ओळख पटली व तिच्या नातेवाईकांना कळविण्यात आले. नातेवाईकांनी श्रद्धाचा मृतदेह ३ ऑगस्टला ताब्यात घेऊन तिच्यावर धुळे येथे अंत्यसंस्कारही केले. दरम्यान श्रद्धाचा मारेकरी अनमोल नब्बाल हा पुणे पोलिसांच्या स्वाधीन झाला. वसमत पोलीस ठाण्याच्या पथकाने अनमोलला पुणे येथून ताब्यात घेतले आणि आज सकाळी वसमतला आणले. आज वसमत न्यायालयात त्याला उभे केले असता १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. श्रद्धाचा खून का केला, खुनाआधी बलात्कार करण्याचे कारण काय, तसेच या कटामध्ये त्याचे साथीदार कोण याचा तपास करावयाचा आहे. त्यामुळे अनमोलला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली. न्यायालयाने ही विनंती मान्य केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार
शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत
औरंगाबाद, ५ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत स्थानिक पातळीवर होत असलेल्या गटबाजीला वरिष्ठांनी अभय दिले. वरिष्ठांना वारंवार तक्रारी करूनही गटबाजी आणि पक्षातंर्गत कलह थांबत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील औरंगाबाद शहर कार्यकारिणीतील प्रमुख पदावर काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री हडको टी. व्ही. सेंटरच्या सभेत मनसेचे कार्यालयप्रमुख अविनाश सुरडकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. शहर उपाध्यक्षा रेणुका गायकवाड, हौसा कांबळे, सतीश पवार, सचिन वाडे पाटील, अमरसिंग परदेशी, राजेश गाडेकर, भरत गायकवाड, सचिन सोमाणी, बाळू घोलप, नितीन पाथरुड, नटराज शुक्ला, नितीन साब्दे, सचिन दिग्रसकर, वाहन चालक सेनेचे शहराध्यक्ष बालाजी डबडे, दत्ता मानकापे, निवृत्ती खैरे, ज्ञानेश्वर कलवले, राजेंद्र गव्हाणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या सर्वाचे स्वागत करण्यात आले.

हिंगोलीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे शुक्रवारपासून बेमुदत उपोषण
हिंगोली, ५ ऑगस्ट/वार्ताहर
जिल्हा परिषदेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. रुणवाल यांचा पदभार काढून घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी जि.प. अंतर्गत वैद्यकीय अधिकारी सामूहिक रजेवर गेले असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ठप्प झाली असून, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने आता वैद्यकीय अधिकारी शुक्रवारपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांचा पदभार काढून घेणे, तालुका अधिकाऱ्यांच्या नियुक्तया संचालक आरोग्य सेवा यांच्या प्रपत्रकानुसार करणे आदी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेच्या वतीने १ ऑगस्टला जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. तसेच या प्रश्नावर २४ व २८ जुलैला वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करूनसुद्धा जिल्हा परिषद प्रशासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ३ व ४ ऑगस्टला काळ्या फिती लावून काम केले.आज (बुधवारी) वैद्यकीय अधिकारी दोन दिवसांच्या सामूहिक रजेवर गेले आहेत. तर शुक्रवारी सर्व वैद्यकीय अधिकारी बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

लातूर सिटी रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा
लातूर, ५ ऑगस्ट/वार्ताहर
रोटरी क्लब ऑफ लातूर सिटीचा पदग्रहण सोहळा रोटरी डिस्ट्रीक्टचे प्रांतपाल मोहन देशपांडे, उपप्रांतपाल लितेश शहा व नगरसेवक अशोक गोविंदपूरकर यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी नूतन अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांना माजी अध्यक्ष मनीष बंडेवार यांनी तर सचिव रवींद्र बारस्कर यांना माजी सचिव अमित ईटकर यांनी कॉलर व चार्टर प्रदान करून क्लबची सूत्रे प्रदान केली.येथील पूर्णानंद मंगल कार्यालयात माजी अध्यक्ष मनीष बंडेवार यांनी मागील वर्षांचा वृत्तांत सादर केला. यानंतर ‘गोपाळ समाज विकास परिषद’, अनसरवाडा या संस्थेतील डोंबारी समाजाच्या ४५ मुला-मुलींना गणवेशाचे वाटप करण्यात आले. या मुलांसाठी पुढेही मदत करण्याचे आश्वासन प्रकल्पप्रमुख दीपक कोटलवार यांनी दिले. याप्रसंगी क्लबचे मुखपत्र ‘संकल्प’चे प्रकाशन प्रमुख पाहुणे मोहन देशपांडे व अशोक गोविंदपूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. नूतन संचालक मंडळाचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. आभार राघवेंद्र ईटकर यांनी मानले. या वेळी सर्व रोटरी सदस्य उपस्थित होते.

अपक्ष नगरसेवकाने पाणीप्रश्न मार्गी लावल्याने मानवतमध्ये नागरिकांमध्ये समाधान
मानवत, ५ ऑगस्ट/वार्ताहर
मागील पाच वर्षांपासून प्रलंबित पाणी प्रश्न पालिकेचे अपक्ष उमेदवार डॉ. संतोष खडसे यांच्या प्रयत्नाने मार्गी लागल्याने पंचवटीच्या नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.येथील पंचवटी कॉलनीमध्ये पालिकेची नळयोजना कार्यान्वित झाल्यापासून अत्यंत कमी दाबाने नळाला पाणी येत होते. त्यामुळे नागरिकांना पाण्याविना रहावे लागत असे. भर पावसाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने काही नागरिक स्वत:चे घर असताना दुसरीकडे भाडय़ाने घर करण्याचा विचार करू लागले. परंतु या प्रभागाचे अपक्ष नगरसेवक डॉ. संतोष खडसे यांनी पुढाकार घेऊन पाणीपुरवठा विभागाचे विभागप्रमुख नरहरी दहे यांच्या प्रयत्नाने पंचवटी कॉलनीत प्रेशर लाईन टाकून नागरिकांचा पाणी प्रश्न मिटविला. वीस ते पंचवीस घरांच्या नळाला पाणीच येत नव्हते. आज त्या नळांना चांगल्या दाबाने पाणी येऊ लागले आहे. या सर्व नागरिकांनी नगरसेवक डॉ. खडसे आणि पाणीपुरवठा विभागाचे आभार मानले.

‘लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे नांदेडला उपकेंद्र स्थापन करावे ’
बिलोली, ५ ऑगस्ट/वार्ताहर
महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद विभागीय शिक्षणमंडळाचे विभाजन करून लातूर या ठिकाणी तीन जिल्ह्य़ांसाठी लातूर विभागीय शिक्षण मंडळाची निर्मिती केली. याचा फायदा नांदेड, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्य़ांतील शैक्षणिक संस्थांना काही अंशी सोयीचा ठरत असला तरी अनेक छोटय़ा छोटय़ा कामांसाठी नांदेड जिल्ह्य़ातील दुर्गम भागात असलेल्या शाळांना लातूर या ठिकाणी जाणे-येणे अतिशय अवघड होत आहे. किनवट आणि माहूर अशा ठिकाणच्या तालुक्यातील शाळांना ३०० - ४०० कि.मी.चा प्रवास करून जाणे अतिशय अवघड होत आहे. जिल्ह्य़ातील अनेक शिक्षणसंस्थांचा पैसा व वेळ वाया जाऊ नये म्हणून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या विषयात लक्ष घालून नांदेड या ठिकाणी लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे उपकेंद्र मान्य करावे अशी मागणी शिक्षक संघटना व शिक्षणसंस्थाचालकांची आहे.

केसापूरच्या अनुदान वाटपाच्या चौकशीची मागणी
हिंगोली, ५ ऑगस्ट/वार्ताहर
तालुक्यातील केसापूर येथील तलाठय़ाशी संगनमत करून कमी क्षेत्रफळ असलेल्या शेतमालकाच्या नावावर अधिक सोयाबीन अनुदानाची रक्कम एकाच घरातील मंडळीने लाटून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली व केसापूर येथील अनुदानवाटपाची चौकशी करण्याची मागणी केली. केसापूर येथील शेतकरी नारायण टेकाळे, प्रभू टेकाळे व नामदेव टेकाळे, तान्हाजी गणपती या शेतकऱ्यांनी ३१ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्याना दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, केसापूर येथील भाऊराव रूपाजी टेकाळे, कैशव रुपाजी टेकाळे व देवबा रुपाजी टेकाळे यांनी अनुदान वाटप यादीच्या नावाखाली गैरफायदा घेऊन तलाठी सज्जा धोटा देवी शेत गट क्र. १०८ केसापूर क्षेत्र ० हेक्टर ७६ आरमध्ये केवळ ०.४८ आरमध्ये सोयाबीन पेरले होते. परंतु पेरलेले क्षेत्रफळ व एकूण जमिनीचा अकार व उचलण्यात आलेली अनुदानाची रक्कम या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असून, अनुदान रकमेत गैरप्रकार झाल्याचा आरोप नारायण टेकाळे व इतरांनी केला आहे.

नोकरभरतीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची आरक्षणाची मागणी
जालना, ५ ऑगस्ट/वार्ताहर
जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १० टक्के आरक्षण देण्याची मागणी जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनने केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना युनियनच्या वतीने निवेदन दिले आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता व पदाची अर्हता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेतील रिक्त पदावर नेमणूक करण्यात यावी, असे शासनाने निर्देशित केले आहे. परंतु जिल्हा परिषद प्रशासन यांची अद्यापही अंमलबजावणी करीत नसल्याची तक्रार ग्रामपंचायत युनियनचे जिल्हाध्यक्ष पंडित सोनवणे यांनी यावेळी एका निवेदनाद्वारे केली.

गॅस ग्राहकांना न्याय देण्याची साळुंके यांची मागणी
तुळजापूर, ५ ऑगस्ट/वार्ताहर
घरगुती गॅस सिलेंडर वाटपाबाबत वारंवार तक्रार करूनही जिल्हा पुरवठा अधिकारी तक्रारीची दखल न घेता वितरकांना पाठीशी घालत असल्याची तक्रार जय अंबे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय साळुंके यांनी जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांच्याकडे केली असून दोषींविरुद्ध त्वरेने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विविध मागण्यांसाठी निराधारांचा मोर्चा
जालना, ५ ऑगस्ट/वार्ताहर
निराधारांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसोबतच राष्ट्रीयीकृत बँकांमध्येही निराधारांची खाती उघडावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तयार असली तरी त्यांना अर्थसाह्य़ मिळत नसल्याची तक्रार मोर्चेकऱ्यांनी केली.

सहकारी संस्था सचिवाला लाच घेताना रंगेहात अटक
तुळजापूर, ५ ऑगस्ट/वार्ताहर
पीक विम्याची रक्कम अदा करण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करणाऱ्या सहकारी संस्थेच्या सचिवास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडण्याची घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. पीक विम्याची रक्कम अदा करण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केल्याची मोठी तक्रार बोरी खेडय़ातील इटकरी कुटुंबातील शेतकऱ्यांकडून लाचलुचपत प्रतिबंधक खात्यास प्राप्त झाल्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातील उपअधीक्षक श्री. भांडवले यांनी संबंधित शेतकऱ्याशी संधान साधून सापळा रचला व सायंकाळी पाचच्या सुमारास देखरेख कार्यालयात रक्कम घेत असताना धाड टाकली. त्यानंतर चौकशी-जाबजबाब नोंदविणे व आवश्यक त्या कागदपत्राची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास हत्तेकर यांच्या विरुद्ध गुन्ह्य़ाची नोंद केली. हत्तेकर हे वि. का. सेवा संस्था, सिंदेफळ तसेच बोरी व जयभवानी सहकारी सेवा संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत होते. दरम्यान, मंगळवारी हत्तेकर यांना अटक करण्यात आल्याचेही समजते.

शिक्क्य़ाचा दुरुपयोग करून फसवणूक
हिंगोली,५ ऑगस्ट/वार्ताहर
सेनगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार शामराव खरात यांनी माजी सरपंचाच्या शिक्क्य़ाचा दुरुपयोग करून फसवणूक केल्याप्रकरणी सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मकोडी येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध गावकऱ्यांनी ८ ऑगस्ट २००८ रोजी सेनगाव तहसील कार्यालयात लेखी तक्रार दिली होती. त्यात बीपीएल, अंत्योदय कार्डधारकांना धान्याचे वाटप करताना गावात अस्तित्वात असलेल्या दक्षता समिती सदस्याच्या स्वाक्षऱ्या न घेता माजी सरपंच चंद्रभागा या सरपंचपदी नसताना त्यांच्या नावाचा व शिक्क्य़ाचा दुरुपयोग करून धान्यवाटपाचे खोटे अभिलेखे तयार केले होते. अशा प्रकारचे आरोप दुकानदाराविरुद्ध होते. याप्रकरणी पुरवठा विभागाचे तत्कालीन नायब तहसीलदार आर. डी. नाईक, मंडळ अधिकारी परसवाळे यांच्याकडे तहसीलदारांनी चौकशीचे काम सोपविले होते.

जिंतूर येथे सेतू केंद्रातून तीन सीपीयू लंपास
जिंतूर, ५ ऑगस्ट/वार्ताहर
जिंतूर येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील सेतू सुविधा केंद्रातून अज्ञात चोरटय़ांनी तीन सीपीयू, एक की-बोर्ड व एक कॉइन बॉक्स फोन असा एकूण ४५ हजार रुपयांचा माल लंपास झाला आहे. चार महिन्यांपूर्वीच याच सेतू सुविधा केंद्रातून दोन सीपीयू चोरीला गेले होते. त्या चोरीचा अद्याप तपास लागला नसताना पुन्हा आज भल्यापहाटे पुन्हा चोरी झाली. बनावटी किल्लीने सेतू केंद्राचे कुलूप उघडून चोरटय़ांनी आत प्रवेश मिळवून वरीलप्रमाणे सामान लंपास केले. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सेतू केंद्र उघडण्यास चालकमालक डॉ. दीपक देशमुख पोहोचले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी डॉ. देशमुख यांनी तक्रार दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘सिद्धार्थ’मधील काळविटाचा मृत्यू
औरंगाबाद, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील एका काळविटाचा आज सकाळी मृत्यू झाला. त्याचे वय १४ वर्षे होते. दीड वर्षांपासून हे काळवीट आजारी होते. अन्य सहकाऱ्यांकडून त्याला त्रास होत असल्यामुळे काही दिवसांपासून त्याला वेगळे ठेवण्यात आले होते. मधल्या काळात त्याला जखमा झाल्याने त्यावर उपचार करण्यात येत होते. या जखमा बऱ्या झाल्या होत्या. मात्र तीन दिवसांपासून त्याने अचानक खाणे बंद केले आणि आज त्याचा मृत्यू झाल्याचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले.त्याच्या मृत्यूनंतर येथील प्राणिसंग्रहालयात आता १७ हरिणे आणि ७ काळवीट शिल्लक राहिले आहेत. त्यातील चार हरिणे वृद्ध झाली आहेत.

विद्यार्थिनींनी बांधली कैद्यांना राखी
औरंगाबाद, ५ ऑगस्ट/खास प्रतिनिधी
औरंगाबाद नर्सिग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना राखी बांधून राखी पौर्णिमेचा सण साजरा केला. कारागृहाचे अतिरिक्त अधीक्षक भारत भोसले हे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नर्सिग कॉलेजच्या वतीने शिवा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार यांनी प्रास्ताविक केले. कैद्यांच्या वतीने दादासाहेब साबळे यांनी बहीण-भावाच्या प्रेमाबद्दल गीत सादर केले. या वेळी प्राचार्य श्रीसुंदर, जनसंपर्क अधिकारी संजय शेटे, रमेश राठोड उपस्थित होते.

परिचारिकांच्या संपामुळे रुग्णसेवा विस्कळित झाल्याचा दावा
औरंगाबाद, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी
सहावा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागणीसाठी परिचारिका आजपासून संपावर गेल्या असून यामुळे रुग्णसेवा विस्कळित झाली असल्याचा दावा संपकरी परिचारिकांनी केला आहे. तर आम्ही पर्यायी व्यवस्था केली असल्यामुळे दररोजच्या कामावर फारसा फरक जाणवला नसल्याचे अधिष्ठाता डॉ. नंदकुमार द्रविड यांनी स्पष्ट केले आहे. शासकीय रुग्णालयातील सुमारे साडेचारशे परिचारिका आज संपावर गेल्या. या परिचारिकांनी रुग्णालयाच्या परिसरात निदर्शनांद्वारे शक्तीप्रदर्शन केले. या संपामुळे रुग्णसेवा ठप्प झाली असल्याचे परिचारिकांच्या नेत्या इंदुमती थोरात यांनी सांगितले. संपात सर्वच संघटना सहभागी झाल्या नव्हत्या शिवाय पर्यायी व्यवस्था केली होती. त्यामुळे पहिल्या दिवशी या संपाचा फारसा परिणाम जाणवला नाही, असे डॉ. द्रविड यांनी सांगितले. उद्या हा संप मिटेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

भरदिवसा घर फोडून ३६ हजारांचे दागिने पळविले
औरंगाबाद, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी
सकाळी साडेआठ ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका शिक्षकाचे घर फोडून चोरटय़ांनी ३६ हजार रुपये किमतीचे सोन-चांदीचे दागिने पळविले. शिक्षक प्रदीप धनराज सोनार यांनी दिलेल्या तक्रार दिली आहे.
नऊ जुगारी अटकेत
गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये ९ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे सहायक फौजदार एस. जी. बिरुटे यांनी नूतन कॉलनी येथील शिवकृपा इमारतीच्या बाजूला असलेल्या मैदानावर छापा घालून सहा जणांना जुगार खेळताना अटक केली. त्यांच्याकडून १० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. दुसऱ्या घटनेत शेख हबीब खान मोहम्मद खान यांनी वाळूज औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा घालून तिघाजणांना अटक केली. त्यांच्याकडून सात हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

तुळजापूर रोटरीच्या अध्यक्षपदी नाईक, सचिवपदी मुरलीधर गुंड
तुळजापूर, ५ ऑगस्ट/वार्ताहर
तुळजापूर रोटरी क्लब अध्यक्षपदी सुजीत चंद्रकांत नाईक तर सचिवपदी प्रा. मुरलीधर गुंड तसेच सहसचिवपदी सतीश सोमाजी यांची निवड झाली. राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, रवींद्र साळुंके, रोटरीचे उपप्रांतपाल शैलेश मेहता यांच्या उपस्थितीत उत्साहात पदग्रहण सोहळा नुकताच झाला. तुळजापूर हे क्षेत्राचे ठिकाण असल्याने येथे येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी प्रस्थापित परंपरेप्रमाणे स्थानिक रोटरीच्या शाखेतर्फे विविध उपक्रम राबविण्याची इच्छा नाईक यांनी पदग्रहण सोहळ्यानंतर व्यक्त केली.

कोंढूरच्या पोस्टमास्तरांनी केला सव्वा लाख रुपयांचा अपहार
हिंगोली, ५ ऑगस्ट/वार्ताहर
कळमनुरी तालुक्यातील कोंढूर डिग्रस येथील पोस्टमास्तर पुंजाजी भिसे यांनी आर.डी. खातेदारांची सव्वा लाख रुपयांची रक्कम खात्यात न भरता रकमेचा अपहार केल्याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिसे यांनी १५ जानेवारी २००७ ते ११ नोव्हेंबर २००८ या दरम्यान एकूण १३० आर.डी. खातेदारांकडून जमा झालेली सव्वा लाख रुपयांची रक्कम स्वत: वापरली असल्याची तक्रार परभणी पोस्टाचे उपविभागीय निरीक्षक राजू विठ्ठल पालेकर यांनी आज बाळापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

‘वेदांत’च्या चिमुकल्यांची वृक्षासोबत राखीपौर्णिमा!
गंगाखेड, ५ ऑगस्ट/वार्ताहर
येथील वेदांत बालक मंदिरातील चिमुकल्यांनी एक वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे यांच्या वृक्षारोपण अभियानात लावलेल्या रोपटय़ास आज बुधवारी राखी बांधून वृक्षांसोबत आपले नाते सांगत रक्षाबंधन साजरे केले. एक वर्षांपूर्वी परभणीचे जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे यांच्या जिल्ह्य़ातील वृक्षारोपण मोहिमेस वेदांत बालक मंदिराने मोठा प्रतिसाद देत रक्षाबंधनच्या दिवशीच वृक्षारोपण केले होते. त्या एक वर्षांच्या रोपटय़ास आज पुन्हा चिमुकल्यांनी रक्षाबंधन करीत वृक्षांसोबत आयुष्यभराचे नाते जोडले. वेदांतच्या मुख्याध्यापिका मनीषा इदाते, संचालिका सुप्रिया भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

नवशिक्या सर्पमित्राच्या धाडसाचे उमरग्यात कौतुक
उमरगा, ५ ऑगस्ट/वार्ताहर

प्रबळ इच्छाशक्ती व आत्मविश्वास असेल तर धाडसाने कोणत्याही संकटाला सामोरे जाता येते. याचा प्रत्यय शहरामध्ये दहावीच्या एका विद्यार्थ्यांने दिला.शंकर सुदर्शन सुरवसे हा विद्यार्थी दहावीमध्ये शिकत आहे. शुक्रवारी चार वाजता शाळेशेजारील कांबळे नामक गृहस्थाच्या घरात साप निघाल्याने एकच गोंधळ उडाला. शेजारच्या काही लोकांनी सर्पमित्र बोलावण्याचा सल्ला दिला. सर्पमित्र बाहेरगावी असल्याने पंचाइत झाली. सर्पमित्र बनण्याचे (साप पकडण्याचे) शिक्षण घेत असलेल्या शंकरला ही घटना कळाली. क्षणभर वेळ न दवडता शंकरने संदीप चौगुले, सुरज खंडागळे, पवन जोगावार व प्रशांत अणूरकर या आपल्या सहकारी मित्रांना घेऊन सुरवसे यांचे घर गाठले. हे पाचही विद्यार्थी सर्प पकडण्यात तरबेज नसताना त्यांनी धाडसाने हा साप पकडायचाच असा निश्चय केला. कांबळे यांच्या घरातल्या आतल्या खोलीत साप असल्याचे सांगण्यात आले. संदीप चौगुले याला सापांच्या जातीची चांगली जाण असल्याने हा धामण जातीचा साप असल्याचे त्याने आपल्या सहकाऱ्यांना सांगितले. अतिशय काळजीपूर्वक व धाडसाने शंकर सुरवसे याने आपल्या मित्राच्या साहाय्याने सर्पाला पकडले व सर्वाना सुटकेचा निश्वास सोडला. हा साप ११ फूट लांबीचा असून अतिशय चपळ असतो. या विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या धाडसाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अ‍ॅड. सयाजी शिंदे, संतोष बिराजदार, ख्वाजा शेख यांनी अभिनंदन केले.

मुदत संपल्यानंतरही लाभार्थीचे अर्ज भरल्याची तक्रार
बीड, ५ ऑगस्ट/वार्ताहर
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतरही विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अर्ज भरून घेतले जात आहे. राजकीय दबाव आणून प्रकरणे नियमांना बगल देऊन मंजुरी केली जात असल्याची तक्रार नगरसेविका प्रेमलता आत्माराम चांदणे यांनी केली आहे.जिल्ह्य़ात संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थी निवडण्यासाठी प्रशासनाने २४ जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार निवड समितीची बैठकही झाली. मात्र राजकीय दबावातून मुदतीनंतरही अर्ज घेतले जात असून ते मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणला जात आहे. नियमांची पूर्तता न करता अर्ज मंजूर केले जात आहेत. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता व्यक्त करून केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून प्रस्ताव मंजूर केले जात असल्याचा आरोप श्रीमती चांदणे यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मांजरा नदीतून बेकायदा वाळू उपसा
बिलोली, ५ ऑगस्ट/वार्ताहर
आंध्र-महाराष्ट्रच्या सीमेवरील मांजरा नदीपात्रातील कार्ला (बु.) येथून एकाच्या नावे परवाना काढून आंध्रातील सतीशअण्णा हा ६,२८० ब्रास वाळूचे अधिक व नियमबाह्य़ उत्खनन केले असल्याचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी निशिकांत देशपांडे व जिल्हा गौणखनिकर्म अधिकारी मुराडी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे.तालुक्यात बोळेगाव, हुनगुंदा, गंजगाव या ठिकाणांहून अनेक दिवसांपासून रात्रंदिवस वाळूचा उपसा चालू असून या वाळू ठेकेदारीत विविध पक्षांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचाही सहभाग होता. त्यांनी उपविभागीय व तालुका महसूल अधिकाऱ्यांवर दबाव आणून अधिक वाळूचे उत्खनन चालविले होते. कार्ला (बु.) येथील क्ष्मण हनमंता गोणेपवार यास गट क्र. ९८ मध्ये फक्त २१२० ब्रास वाळू उपसा करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली होती. परवाना होता गोणेपवार यांच्या नावे, पण प्रत्यक्ष काम मात्र आंध्रातील निजामाबाद येथील सतीशअण्णा रेड्डी हा पाहत होता. त्याने परवाना २,१२० ब्रासचा असताना ६,२८० ब्रास अधिक वाळूचे उत्खनन केले, अशी बाब अधिकाऱ्यांना आढळली. तसा अहवाल त्यांनी प्रशासनाकडे सादर केला आहे. यावर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी काय कारवाई याकड लक्ष लागून आहे.

पोलिसांच्या बघ्याच्या भूमिकेमुळे लातूरमध्ये वाहतुकीची कोंडी
लातूर, ५ ऑगस्ट/वार्ताहर
बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्याचे काम काम सुरू असल्यामुळे सर्व वाहतूक गांधी चौक पोलीस ठाण्याच्या समोरून वळविण्यात आली आहे. लहान रस्ता, सर्वाना घाई व पोलिसांची बघ्याची भूमिका यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होतआहे.गांधी चौक पोलीस ठाण्यासमोरून वाहतूक वळविण्यात आली आहे. शेजारील लहान बोळातून ती चालू आहे. एरवी ऑटोरिक्षा, दुचाकी वाहन यांच्याकडे लक्ष देणारे पोलीस सध्या तंबाखू मळत समोरच होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीकडे मख्खपणे पाहत आहेत. रस्ता लहान असल्याने दुचाकी, ऑटो, चारचाकी वाहने पुढे जाण्यासाठी प्रयत्न करताना दिसत असून त्यामुळे लहानसहान अपघात घडण्याची शक्यता आहे. पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांना व दुचाकी वाहनधारकांना येथून जाणे जिकिरीचे झाले आहे. येथे चार-पाच पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

‘युवा स्पंदन’ला रक्तदाता कृतज्ञता पुरस्कार
तुळजापूर, ५ ऑगस्ट/वार्ताहर
रक्तदानासाठी शिबिरे आयोजित करून रुग्णांसाठी सर्वाधिक रक्तसंकलन करणारी संस्था या नात्याने सोलापूरच्या डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या वतीने देण्यात येणारा रक्तदाता कृतज्ञता पुरस्कार तुळजापूरच्या युवा स्पंदन संस्थेस देण्यात आला.राज्य रक्त संक्रमण परिषदेचे उपसंचालक डॉ. संजयकुमार जाधव, संघचालक कचेश्वर शहाणे, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे अध्यक्ष विजय मराठे, सचिव रमेश विश्वरूप यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार युवा स्पंदन संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कावरे व सचिव प्रा. प्रशांत भागवत यांना प्रदान करण्यात आला. तुळजाई सांस्कृतिक मंडळ, आप्पासाहेब पाटील ना. प. संस्था, जवाहर तरुण मंडळ, रोटरी क्लब या संस्थानाही या कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. २००८-०९ या काळात विविध संस्थांच्या माध्यमाने १५ शिबिरातून ६०३ बॅग रक्त संकलित करण्यात युवा स्पंदनचा सहभाग होता.

माउली बालक मंदिरची राखीपौर्णिमा सीआरपीएफच्या जवानांसमवेत
लातूर, ५ ऑगस्ट/वार्ताहर
अंबाजोगाई रोड भागातील माउली बालक मंदिराच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी चिंचोलीराव वाडी येथील केंद्रीय राखीव दलास भेट देऊन तेथील जवानांना राख्या बांधून राखी पौर्णिमेचा सण साजरा केला. कुटुंबापासून दूर राहून राष्ट्राची सेवा करणाऱ्या जवानांना राख्या बांधल्यानंतर आम्ही हा सण घरीच साजरा करत असल्याची जाणीव होते, अशी भावना जवानांनी व अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.याप्रसंगी मुख्याध्यापिका कविता आरडले, व्यवस्थापक गोपाळ कर्डिले, शिक्षिका मीनाक्षी देवमानकर, रजनी कुलकर्णी, उमा शर्मा, वैशाली देशपांडे, अर्चना कुलकर्णी आदी उपस्थित होते.
आगळे वेगळे रक्षाबंधन
वर्षभर शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या रिक्षावाले मामांना राख्या बांधून केशवराज विद्यालयातील मुली व शिक्षिकांनी रक्षाबंधन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केले. मुख्याध्यापिका चंचलाबाई नेत्रगावकर, शिक्षक बोठे यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले. रिक्षाचालक मधुकर कुलकर्णी यांनी सर्व रिक्षाचालकांना शाळेने जो सन्मान दिला त्याबद्दल त्यांनी शाळेचे कौतुक केले. प्रास्ताविक शिक्षक तानाजी सावंत यांनी केले.

बांधकाम व्यावसायिक बडेरा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
हिंगोली, ५ ऑगस्ट/वार्ताहर
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील शेत गट नं. १३९ मधील अकृषक केलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ वाढवून फिर्यादी सुरेश नवले यांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक प्रसन्न धरमचंद बडेरा व परभणीचे रामवल्लभ शर्मा यांच्याविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात सोमवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.जवळाबाजार येथील सुरेश नवले यांच्या मालकीची जमीन गट नंबर १३९ मधील सुमारे ३ हेक्टर ४० आर जमीन हिंगोली येथील प्रसन्ना धरमचंद्र बडेरा व रामवल्लभ शर्मा यांनी प्रवीण भंडारी यांच्याकडून २३ मे २००८ रोजी खरेदी केली. दरम्यान, खरेदीखताचा एक भाग म्हणून तहसीलदार औंढानागनाथ यांनी दिलेली एन.ए. ऑर्डर (क्रमांक २००८/एनए/सीआर-४ दि. २९ फेब्रुवारी २००८ ) अकृषिक आदेश दस्तावेजासोबत जोडून त्यामध्ये अकृषक वापरासाठी एकूण जमीन ३ हेक्टर ८० आर असा उल्लेख केला. या प्रकरणात दोन्ही आरोपींनी खोटे दस्तावेज तयार करून बनावट स्टॅम्प व स्वाक्षरीच्या साह्य़ाने जमिनीचे ४० आर क्षेत्र वाढवून जमिनीवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून फिर्यादी सुरेश नवलेची फसवणूक केल्याप्रकरणी हट्टा पोलिसात बडेरा व शर्मा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कुलदीप कारेगावकर यांच्या चित्रांचे मुंबईत आजपासून प्रदर्शन
परभणी, ५ ऑगस्ट/वार्ताहर

उदयोन्मुख चित्रकार कुलदीप सोपानराव कारेगावकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन ‘ट्रेडिशन आर्ट’ या नावाने मुंबई येथे संजय प्लाझामध्ये उद्यापासून (गुरुवार)भरणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या सायंकाळी ६ वाजता खासदार प्रिया दत्त यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे पंडित जसराज आहेत. दि. ७ ते २१ ऑगस्ट दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे. कारेगावकर यांच्यासह अच्युत पालव, लैला खान, मनोहर देसाई, शमीम कुरेशी, सालव रसूल, मनीषा नायक आणि ज्योत्सना पवळे यांच्या चित्रांचाही समावेश आहे.

हिंगोली जिल्ह्य़ाला १० नायब तहसीलदार
हिंगोली, ५ ऑगस्ट/वार्ताहर
औरंगाबाद विभागातील ८३ कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती मिळाल्याने आता हिंगोली जिल्ह्य़ाला १० नायब तहसीलदार मिळाले आहेत. औरंगाबाद येथील सी. डी. कुलकर्णी हे कळमनुरी येथे, एस. एस. लांडे, हिंगोली, जी. वाय. वाघ सेनगाव, बीड येथील श्रीराम पाचपुते सेनगाव, यू. आर. बोधीकर वसमत, औरंगाबादचे डी. ए. ठोंबरे हिंगोली, औरंगाबादचे अनर्थे हिंगोली, उस्मानाबादचे के. एन. व्हटकर सेनगाव, एन. एम. बोथीकर हिंगोली, व्ही. एन. पोले हिंगोली हे १० नायब तहसीलदार आहेत.

मातेकर यांना ‘शब्दगंध’ पुरस्कार जाहीर
लातूर, ५ ऑगस्ट/वार्ताहर
नगर येथील शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय शब्दगंध शैक्षणिक पुरस्कार अंबाजोगाई येथील ज्ञानेश मातेकर, प्रा. दिलीप जाधव, शेख मोहंमद रफी यांना जाहीर करण्यात आला आहे. शब्दगंध साहित्यिक परिषद, नगरच्या वतीने दरवर्षी साहित्य, पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शब्दगंध साहित्य संमेलनात गौरव करण्यात येतो.

बोरीत ७७ टन युरियाचे वाटप
बोरी, ५ ऑगस्ट/वार्ताहर
येथील चार कृषी केंद्रावर आज ७७ टन युरिया खताचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांनी पावत्या फाडण्यासाठी दुकानासमोर रांगा लावल्या होत्या.जगदंबा कृषी केंद्रात २७ टन, संजय ट्रेडर्स ३० टन, मनमोहन ट्रेडर्स १० टन आणि कैलास ट्रेडिंग कंपनीत १० टन याप्रमाणे आज एकूण ७७ टन युरिया उपलब्ध झाला होता. प्रत्येक शेतकऱ्यास दोन बॅगा देण्यात आल्या. २५० रुपयांप्रमाणे युरियाची बॅग विक्री करण्यात आली. पावती फाडताना सातबारा किंवा अन्य दस्ताऐवजी अट नसल्यामुळे शेती नसणाऱ्या बऱ्याच जणांनी रांगेत लागून नंतर प्रतिबॅग पन्नास ते शंभर रुपयांची विक्री केली.

‘विद्यार्थ्यांमधील बुद्धिमत्ता जोपासावी’
निलंगा, ५ ऑगस्ट/वार्ताहर
शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांमधील बुद्धिमत्ता जोपासल्यास ते आदर्श नागरिक व नीतीमान उच्च अधिकारी होऊ शकतात, असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी बालाजी बिरादार यांनी केले. एमपीएस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यातून पाचवा व जिल्ह्य़ातून पहिला आलेल्या आदित्य दत्तात्रय गिरी याच्यासह सौरभ सूर्यवंशी, प्रतिभा म्हेत्रे, श्रीनिवास सूर्यवंशी, अपर्णा माळी, ऋत्विक लगळी, स्नेहा रोळे, ऋषिकेश हेड्डे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

आगाराच्या गैरसोयी दूर करण्याची मागणी
सोयगाव, ५ ऑगस्ट/वार्ताहर
बस आगाराच्या विस्कळीत सेवेमुळे प्रवासी त्रस्त झाल्याने गैरसोयी दूर करण्याची मागणी बजरंग दलाचे अध्यक्ष योगेश मानकर यांनी केली आहे. आगारप्रमुखाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील फर्दापूर, बनोटी, शेंदुर्णी या मार्गावर धावणाऱ्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सोयगावातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी शेंदुर्णीला जातात. त्यांना शाळा, कॉलेज सुटल्यानंतर प्रदीर्घ काळ बसेसची वाट पाहावी लागते. त्यामुळे या मार्गावर जनता गाडी सुरू करण्याची मागणी केली आहे.

विकासकामांना सुरुवात
जालना, ५ ऑगस्ट/वार्ताहर
शेलगाव, केळीगव्हाण भागातील विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार अरविंद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. या कामामध्ये अकोला-निकळक येथील दूधना नदीवरील पूल असोला ते पिरपिंपळगाव रस्त्यावर कुंडलिका नदीवरील पूल व निकळक ते कंडारी रस्त्याचे डांबरीकरण करणे आणि शेलगाव-हालदोला-पीरसावंगी रस्ता, पीरपिंपळगाव- असोला व आमदार निधीतील पिंपरी डुकरी (ता. जालना) येथील सभागृहाचे लोकार्पण आदी कामांचा समावेश होता.

धारूर तहसील कार्यालयावर आंदोलन
धारूर, ५ ऑगस्ट/वार्ताहर

मानवी हक्क मोहीम, बालहक्क मोहीम व जमीन अधिकार आंदोलनाच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील गायरान जमिनीचे पंचनामे करावेत, निराधारांना अनुदान द्यावे, शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात, शासकीय रुग्णालयात सुविधा मिळाव्यात आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यात परमेश्वर आडागळे, मधुकर लोंढे, सीता बन्सोडे, राजेश क्षीरसागर, धोंडीराम वैरागे, सुदामती लोखंडे आदी सहभागी झाले होते.