Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

रुग्णालयांमध्ये गर्दी आणि संताप
पुणे, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

 

‘अहो, माझ्या मुलाला ताप, खोकला नि सर्दी आहे.. खासगी डॉक्टरांनी तुमच्याकडे तपासणीसाठी पाठवलंय.. तुम्ही म्हणता त्याला काही झाले नाही.. म्हणजे नेमके खरे कोणाचे समजायचे..?’, ‘सकाळपासून रांगेत उभा आहे मुलीला घेऊन.. ती तापलेली आहे.. तिची तुम्हाला तपासणी करावीच लागेल..’, ‘तुमच्या ओळखीच्या नागरिकांच्या मुलांची तपासणी पहिल्यांदा करता.. मग आमच्या मुलांची तपासणी कधी करणार..?’
.. या आणि अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे न मिळालेले आणि दोन-तीन तास केवळ मुलांच्या तपासणीसाठी रांगेत उभे राहिलेल्या पालकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्याचे रुपांतर संतापात झाल्याने पालकांनी चक्क नायडू रुग्णालयातील डॉक्टरांनाच धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास संतप्त पालकांना नियंत्रित करण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केले आणि परिस्थिती आटोक्यात आली. जहांगीर खासगी रुग्णालयात काल पुण्यातील सेंट अ‍ॅन्स शाळेतील चौदा वर्षांच्या रिदा शेख या मुलीचा ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू झाला आणि त्याचा परिणाम म्हणून आज दुसऱ्या दिवशी पालकांनी आपल्या मुलामुलींना ताप, सर्दी-पडसे, खोकला आल्याने त्या तक्रारी घेऊन नायडू रुग्णालयाकडे धाव घेतली. दरम्यान, शहरातील खासगी दवाखाना, क्लिनिकमध्ये जाणाऱ्या रुग्णांना तेथील डॉक्टरांकडून चाचणीसाठी नायडू रुग्णालयाकडे जाण्याच्या सूचना करण्यात येत होत्या. त्यामुळे सकोळपासून नायडू रुग्णालयात पालकांनी मुलांसह प्रचंड गर्दी केली होती. रुग्णालयाच्या आवारात लांबच लांब रांग लागल्याचे चित्र आज सकाळपासून सायंकाळपर्यंत पाहायला मिळत होते.
‘अहो, सकाळपासून रांगेत उन्हात उभा आहे, तुम्ही तुमच्या ओळखीच्या पेशंटची तपासणी करताय.. आमच्या मुलाची तपासणी करणार कधी? आम्ही वेडे म्हणून तुमच्याकडे आलो आहोत काय..’ असा सवाल संतप्त पालकाने नायडू रुग्णालयातील डॉक्टरांना केला. एका पालकाने टाकलेली ठिणगी ही दुसऱ्या पालकांपर्यंत पेटत गेली आणि त्याचा परिणाम अनेक पालकांच्या सहनशीलतेचा अंत होऊन संताप व्यक्त होऊ लागला. रांगेत उभे राहिलेल्या काही पालकांनी चक्क रांगेतून बाजूला जाऊन रु ग्णालयातील डॉक्टरांना धरण्याचा प्रकार करीत त्यांना ‘आमच्या मुलाला तपासणार कधी..’ अशीच विचारणा केली. यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता ती अयशस्वी ठरली. परंतु, पालकांच्या संतापापुढे ते आणि डॉक्टरसुद्धा हतबल झाले. हा प्रकार थेट माध्यमांसमोर घडल्याने त्याचे वृत्तवाहिन्यांनी थेट प्रक्षेपण केले. त्यामुळे तेथे काही राजकीय कार्यकर्त्यांनी धाव घेतली. पालकांच्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे डॉक्टरांचे ‘समुपदेशन’ही कमी पडत होते. ‘खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी ही चिठ्ठी दिली.. चाचणी करायला सांगितली. तुम्ही मात्र काही नाही कसे म्हणता..?’ असे अनेक प्रश्न पालक डॉक्टरांना विचारीत होते. आपल्या परीने डॉक्टर रुग्णांसह पालकांचे समाधान करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या पालकांसह मुलांना तेथील कर्मचाऱ्यांकडून ‘मास्क’ देण्यात येत होते. त्यामुळे प्रत्येक येणारा पालक, त्यांची मुले तोंडाला ‘मास्क’ लावूनच रांगेत उभी राहत होती.

पुण्यात सात तर मुंबईत चार रुग्ण
पुणे, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

पुण्यातील ‘स्वाइन फ्लू’च्या रुग्णांची संख्या वाढत असून आज आणखी सात नव्या रुग्णांची भर त्यात पडली आहे. चौदा वर्षांच्या एका मुलीच्या मृत्युची नोंदही त्यात झालेली आहे. पुण्यात आज रात्रीपर्यंत सात तर मुंबईत चार रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात एकूण १५९ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत चार रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या ही २६ झाली आहे. तर पुण्यात सात रुग्ण वाढल्याने १०७ वरून ११४ रुग्ण झालेले आहेत. पाचगणीमध्ये २५ रुग्ण आढळलेले आहेत. नाशिकमध्ये एक अशा रुग्णांची संख्या ही १५९ झाली आहे, असे स्वाइन फ्लू नियंत्रण कक्षाने कळविले आहे.