Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

संपकरी बॅंक कर्मचाऱ्यांचा आजपासून ‘लाँग वीकएण्ड!’
मुंबई, ५ ऑगस्ट/ व्यापार प्रतिनिधी

 

भारतीय बँक महासंघाबरोबर वेतनवाढीविषयक वाटाघाटी फिसकटल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने ६ व ७ ऑगस्ट रोजी दोन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे बँकांचा ‘वीकएण्ड ब्रेक’ हा यंदा गुरुवारपासूनच सुरू होईल, तर धनादेश वठून पैसे हाती पडण्यासाठी ग्राहकांना पुढच्या बुधवापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
स्टेट बँकेसह सार्वजनिक क्षेत्रातील विविध बँकांच्या देशभरातील ६० हजारांहून अधिक शाखांमधील तब्बल १०लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या अनुक्रमे पाच आणि चार संघटनांनी एकत्र येऊन ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ या महासंघाची स्थापना केली आहे. नोव्हेंबर २००७ पासून महासंघाकडून २० टक्क्यांच्या वेतनवाढीचा पाठपुरावा केला जात आहे. याच मागणीसाठी महासंघाने यापूर्वी १२ जूनला मोठय़ा ‘वीकएण्ड ब्रेक’चे औचित्य साधूनच संपाची हाक दिली होती. परंतु, ९ जूनला झालेल्या वाटाघाटीत भारतीय बँक महासंघ (आयबीए)ने वेतनवाढीबाबत १५ टक्क्यांवरून १७.५ टक्क्यांपर्यंत सहमती दर्शविणारी शिथिल भूमिका घेतल्याने महासंघाने संप मागे घेतला. परंतु, १४ जुलैला झालेल्या बैठकीत आयबीएने पुन्हा घूमजाव केल्याने संप अपरिहार्य ठरला असल्याचे महासंघाच्या मुंबईतील प्रवक्त्याने स्पष्ट केले. यापूर्वी सहमती दर्शविलेली १५ टक्के वेतनवाढही आयबीएचे नवीन अध्यक्ष एम. व्ही. नायर यांना मान्य नसल्याचे महासंघाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
गुरुवार, शुक्रवारचे दिवस संपात गेल्याने शनिवारच्या अध्र्या दिवसाच्या कामकाजासाठी बँका खुल्या राहतील. त्यातही अनेक बँकांमध्ये शनिवारी आणि सोमवारीही चेक क्लियरिंगची कामे होत नाहीत. त्यामुळे बँकेत आज (बुधवारी) जमा केलेला धनादेश वठविला जाऊन पैसे खात्यात जमा होण्याला ग्राहकांना तब्बल एक आठवडय़ाची वाट पाहावी लागेल.