Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

बाळ ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन मुंबई, ठाण्यात!
मुंबई, ५ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

 

मराठी माणूस आणि शिवसेना यांचे द्वैत कसे जमले ? महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतरही मराठी माणसाच्या मुंबईत होत असलेल्या घुसमटीला कोणी आवाज दिला ? १३ ऑगस्टपासून मुंबई आणि ठाण्यात आयोजिल्या जाणाऱ्या ‘मार्मिक’ प्रदर्शनात या अशा प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत ! शिवसेनेच्या जन्माआधीच्या घडामोडींत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ‘मार्मिक’ च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांच्या निवडक व्यंगचित्रांचे प्रदर्शन मुंबईत रवींद्र नाटय़ मंदिरात तर ठाण्यात गडकरी रंगायतनमधील नवीन कलादालनात आयोजिण्यात येणार आहे !
‘मार्मिक’च्या जन्माआधीची मुंबईतील सामाजिक स्थिती मराठी माणसासाठी अपमानास्पद होती. १९६१ च्या शिरगणतीनुसार मुंबईतील मराठी टक्का कमी झाला होता आणि शहरात बिगर मराठी माणसांचे प्रमाण ५७ टक्क्यांवर गेले होते. सरकारी नोकऱ्यांत या अमराठी माणसांना मोठा वाव मिळत होता. या पाश्र्वभूमीवर व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांनी ‘मार्मिक’ मधून हजारो व्यंगचित्रांच्या माध्यमातून आवाज उठवला आणि मराठी माणूस चेतवला. शिवसेनेच्या स्थापनेआधी मार्मिकने एक वातावरण उभे करण्याचे काम केले ! स्थानिक राजकारणाबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावरही बाळ ठाकरे यांनी आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी भाष्य केले आणि या क्षेत्रातील जाणकारांची दाद मिळवली. भल्याभल्यांची फिरकी घेणारा आणि तत्कालीन राजकारण्यांच्या उरात धडकी भरवणारा व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांचा कुंचला १९८५ साली विश्रांती घेता झाला. मात्र तोपर्यंत व्यंगचित्रकार बाळ ठाकरे या नावाचा प्रवास ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ येथपर्यंत झाला होता.
आजच्या पिढीपुढे हा सारा इतिहास जिवंत व्हावा, या उद्देशाने ‘मार्मिक’चे संस्थापक संपादक बाळ ठाकरे यांच्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन ‘मार्मिक’च्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनापासून म्हणजे १३ ऑगस्टपासून करण्यात आले आहे, असे ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांनी नमूद केले आहे.