Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘मुझे भी कोई राखी बांधने आयेगा क्या?
कसाबची विचारणा
मुंबई, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

 

सीएसटी स्थानक, कामा रुग्णालय परिसर, मेट्रो जंक्शन आणि गिरगाव चौपाटी येथे अनेक निष्पापांचे बळी घेणारा पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला आज त्याच्या हातावर राखी बांधायला कोणी येईल का? याचे वेध लागले होते. न्यायाधीश, सुरक्षेसाठी असलेले पोलीस, वकील आणि पत्रकार यांच्या हातावर रंगीबेरंगी राखी बांधल्याचे पाहून कसाबने अखेर आपल्या वकिलांकडेच ‘मुझे भी कोई राखी बांध ने आयेगा क्या’, अशी विचारणा केली. बुधवारी रक्षाबंधन असल्याने न्यायालयाचे कामकाज लवकर संपले. त्यानंतर वकील अब्बास काझ्मी यांच्याशी बोलताना कसाबने आपली ही इच्छा व्यक्त केली. याबाबत न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना अ‍ॅड. काझ्मी म्हणाले की, त्याच्याशी झालेल्या चर्चेच्या सुरूवातीलाच कसाबने त्यांना विचारले की आज राखीचा सण आहे का? त्यानंतर तो स्वत:च बोलू लागला की, न्यायाधीशांनीही दोन राख्या बांधल्या आहेत. सुरक्षेसाठी असलेले पोलीस आणि काही पत्रकारांच्याही हातावर राख्या बांधलेल्या आहेत. पोलिसांनी मला राखीच्या सणाबद्दल सांगितले आहे. ‘मुझे भी कोई राखी बांधने आयेगा क्या?’, अशी विचारणा त्याने त्यानंतर माझ्याकडे केली. त्यावर आपण त्याला सांगितले की, जर कोणा बहिणीला तुला राखी बांधावीशी वाटली तर ती नक्की तुला राखी बांधायला येईल.
गेल्या रविवारी ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या न्यायालयातील व्यंगचित्रांबाबत आज न्यायालयात चर्चा झाली. न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर प्रत्येकजण नेमकी काय व्यंगचित्रे काढली आहेत हे पाहण्यासाठी वृत्तपत्र चाळत असताना कसाबही स्वत:चे व्यंगचित्र पाहून खूश झाला. मात्र एका व्यंगचित्रात आपल्याला रडताना का दाखविले आहे, अशी विचारणा त्याने अ‍ॅड. काझ्मी यांच्याकडे केली. त्यावर काझ्मी यांनी त्याला ते रडतानाचे नाहीतर विचार करतानाचे व्यंगचित्र असल्याचे त्याला सांगितले.